उत्सव साजरे करण्यासाठी रस्त्यावर मंडप घालण्यास न्यायालयाने मनाई केल्यानंतर नेहमी प्रमाणेच स्वत सरकारी ‘झेड सुरक्षा’ घेणारे राजकीय नेते प्रक्षोभक विधाने करून भिन्न धर्मीयांना झुंजवणे या आवडत्या उद्योगाची खेळी खेळू लागली आहेत. मुळात राजकीय नेते मंडळींनी ‘ते’ रस्त्यावर प्रार्थना करतात मग मीही आरत्या करणार, मंडप उभारणार म्हणजे ‘ते’ रस्त्यावर रहदारीला व्यत्यय आणत आहेत मग मीही आणणार अशी भूमिका घेणे हेच अश्लाघ्य व गर आहे . कारण येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीला व्यत्यय आणणे हा कोणाचाही हक्क नाही की जो एका विशिष्ट समाजाने घेतला म्हणून दुसऱ्या समाजाने झगडून मिळवावा. तसेच करदात्या जनतेच्या कररूपी महसुलातून बांधण्यात आलेले रस्ते ही नेते मंडळींची खासगी आमदानी नाही की तेथे नेते मंडळींच्या इच्छेनुसार धार्मिक सण उत्सव जनतेची कुचंबणा, कोंडी करत न्यायालयाचा आदेश धुडकावून बिनदिक्कत साजरे करावेत.
मात्र देव, धर्म वगरे समाजातील संवेदनशील दुखऱ्या बाबी आल्या की बहुतेकांची सारासार विचारशक्ती खुंटते व बुद्धीपेक्षा भावनेला, श्रद्धेला प्राधान्य देत सुशिक्षित मंडळीदेखील नेत्यांनी दाखविलेल्या चुकीच्या रस्त्याने बेशक जातात; तिथे निम्नस्तरातील अशिक्षितांची काय कथा? प्रगत देशांतील शहरांत इमारतीखालील बांधकामे,उद्याने व रस्ते यांचे क्षेत्रफळातील प्रमाण ६० : ४० असे असते. आपल्याकडे गजबजलेल्या शहरात रस्त्यांचे क्षेत्रफळ १५/ १० टक्के इतके खाली येऊन काही ठिकाणी ते ६ टक्के इतके कमी आहे. साहजिकच वाहतूक कोंडी ही प्रमुख समस्या भेडसावत असताना व पालिका त्यावर उपाय योजना काढत असताना नेते मंडळी मात्र या समस्या सोडविण्यापेक्षा करदात्या सामान्य जनतेच्या धार्मिक उठाठेवी करण्यात अधिक रस घेतात..तेही निर्लज्जपणे लोकमान्य टिळकांसारख्या थोर विभूतीचे नाव घेऊन, त्यांचे दाखले देत.
रजनी अशोक देवधर, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा