बँक कर्मचाऱ्यांना १५ टक्के पगारवाढ झाली आहे. मात्र हा फायदा निवृत्त बँक कर्मचारी यांना मिळालेला नाही. त्यांची पेन्शन वाढलेली नाही. निवृत्त होताना जी मूळ (बेसिक) पेन्शन होती ती तशीच राहिलेली आहे. जी पेन्शन वाढलेली दिसते ती केवळ महागाई भत्ता वाढ झाल्यामुळे. वास्तविक पाहता बँक कर्मचारी यांच्या पगारवाढीच्या मागणीच्या वाटाघाटी होत असताना निवृत्त कर्मचारी यांच्या मूळ पेन्शन वाढीचीही मागणी केलेली होती. मात्र ‘आयबीए’ आणि ‘यूएफबीयू’ ही बँक कर्मचाऱ्यांची संयुक्त संघटना यांच्यात पगार वाटाघाटीच्या झालेल्या करारात निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या कोणत्याच मागण्यांचा विचार केला गेला नाही. कारण सांगताना ‘आयबीए’ या संघटनेने स्पष्ट केले आहे की, निवृत्त बँक कर्मचारी हे बँकेचे कर्मचारी नाहीत, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या पगार वाटाघाटीच्या वेळी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवाढीचा विचार करता येत नाही.
खरे म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांना बँक दरमहा पेन्शन त्यांच्या खात्यात जमा करते. केंद्राने वाढ केलेला दर सहामाही महागाई भत्ता बँक देते. बँक कर्मचारी पेन्शन स्कीम ही केंद्र सरकारची आहे. तरीसुद्धा आयबीए म्हणते की तुमचा आणि बँकेचा कोणताही करार नाही, तुम्ही बँकचे कर्मचारी नाहीत. निवृत्त झालेले राज्य/केंद्र कर्मचारी तसेच रिझव्र्ह बँकेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचीही मूळ पेन्शन वाढते. मात्र आम्हा राष्ट्रीयीकृत बँकांतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हा नियम का लागू नाही हे कळत नाही. दहा वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांची पेन्शन आज निवृत्त झालेल्या बँक कर्मचाऱ्यांपेक्षा कमी आहे; कारण मूळ पेन्शन वाढतच नाही. आज ना उद्या मूळ पेन्शन वाढेल, हाल कमी होतील, अशी वाट बघत अनेकांनी प्राण सोडले आहेत.
बँक निवृत्त कर्मचारी संघटना याबाबत कोर्टात गेलेल्या आहेत, मात्र कोर्टाच्या कामाला काळाचे बंधन नाही. प्रकरणे वर्षांनुवष्रे प्रलंबित आहेत. मुळात रीतसर हक्कासाठी बँक कर्मचाऱ्यांना कोर्टात जाण्याची वेळच येता कामा नये. आता मात्र सर्व निवृत्त बँक कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. मोच्रे, उपोषण, धरणे आदी मार्ग शरीराची साथ नसतानाही करावे लागणार आहेत. पेन्शनवाढीचा हक्क मिळवावाच लागणार आहे. एस. आर. कुलकर्णी, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा