संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे श्रीक्षेत्र देहूहून पंढरपूरकरिता प्रस्थान झाले. ज्यांनी तुकोबांना ‘जगद्गुरू’ ही पदवी दिली व त्यांचे माहात्म्य वाढविण्याचा जन्मभर प्रयत्न केला त्या डॉ. सर रामचंद्र गोपाळ भांडारकर यांचा १७८ वा जन्मदिन ६ जुलै रोजी संपन्न झाला. त्यांनीच स्थापन केलेली तुकाराम सोसायटी पंधरा वर्षे कार्यरत राहून १९१५ मध्ये विसर्जित करण्यात आली. त्या गोष्टीला शंभर वर्षे पूर्ण झाली. मराठी जीवन, मराठी संस्कृती आणि मराठी साहित्य या तीनही क्षेत्रांमध्ये तुकोबांचे स्थान उच्चस्थानी असून अढळ आहे. ते त्यांचे अभंग आणि त्यांची गाथा मराठी चर्चाविश्वाचे आणि मराठी मनोविश्वाचेही अविभाज्य भाग बनले आहेत.
ग्यानबा तुकारामाचा जागर आपण शेकडो वर्षे करीत आहोत आणि वारकरी संप्रदायामुळे संत तुकाराम घराघरांत पोहोचले आहेत; परंतु तुकोबांचा आवाज, त्यांचा उदारमतवाद शहरी अभिजन वर्गामध्ये पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य डॉ. भांडारकर आणि त्यांचे सहकारी रा. ब. मराठे, प्रो. वा. ब. पटवर्धन, प्रो. गणेश हरी केळकर यांना व त्यांनी स्थापन केलेल्या तुकाराम सोसायटीलाच द्यावे लागेल.
डॉ. भांडारकर यांच्या धुरीणत्वाखाली प्रार्थना समाजाच्या साथीने १९०१ साली तुकाराम सोसायटी- तुकाराम चर्चा मंडळाची स्थापना पुणे येथे झाली. डॉ. भांडारकर हे थोर प्राच्यविद्या संशोधक, संस्कृतचे प्रकांडपंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक म्हणून आपणा सर्वाना परिचित आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या मुंबईतील शिक्षणाने व परमहंस सभा आणि प्रार्थना समाज यांच्या प्रभावाने त्यांची कर्ते धर्मसुधारक आणि समाजसुधारक ही ओळखही महत्त्वाची आहे.
तुकाराम महाराज हे आद्य धर्मसुधारक गणले गेले पाहिजेत. त्यांनी पारंपरिक धर्माची मूलभूत चिकित्सा करून यज्ञयागादी, तपतीर्थाटने मनुष्य जातीस उपयोगी नसून ‘जे का रंजले गांजले’ यांच्या सेवेतच धर्म आहे, असे सांगितले. त्यांची ही तळमळ आणि उदारमतवाद त्या काळच्या समाजसुधारकांच्या मनास भावला. आपल्यातील दोषांचे सूक्ष्मतेने निरीक्षण करून त्या सुधारणेचे मार्ग तुकोबांनी सांगितले. त्याचे निरूपण आणि प्रसारण तुकाराम सोसायटीने केले. युरोपातील वर्डस्वर्थ व ब्राऊनिंग सोसायटीपासून प्रेरणा घेऊन डॉ. भांडारकरांनी ही सोसायटी स्थापन केली.
केवळ तुकोबांच्या अभंगांची चर्चा करण्यासाठी या मंडळाची सभा दर शुक्रवारी होत असे. साधारणत: दीड-दोन तासांमध्ये तीन ते सहा अभंगांची चर्चा होत असे. दहा ते पंधरा विद्वान, प्राध्यापक जमून तुकोबांचे अभंग, त्यामागची त्यांची भूमिका, त्यांना अभिप्रेत असलेला अर्थ आणि त्याचा आजचा संदर्भ याचा सखोल खल होत असे. या चर्चेचा तपशील भांडारकरांच्या सल्ल्याने व अनुमतीने निश्चित करीत असत. या सभेला तरुण अभ्यासक प्रा. ग. ह. केळकर हेही उपस्थित असत. ही टिपणे पुढे दैनिक ‘ज्ञानप्रकाश’मध्ये व बरीच वर्षे अधूनमधून ‘सुबोध पत्रिका’मध्ये प्रसिद्ध होत असत. ही टिपणे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचा प्रा. पटवर्धनांनी बराच प्रयत्न केला, परंतु ते करणे त्यांना जमले नाही. त्यांच्या पश्चात ती कार्यसिद्धी प्रा. ग. ह. केळकर यांनी पूर्णत्वास नेली. १९१५ च्या सुमारास वार्धक्यामुळे डॉ. भांडारकरांना दर शुक्रवारच्या सभेस उपस्थित राहणे अशक्य होऊ लागले. परिणामत: चर्चासभांचे काम बंद पडले. तोपर्यंत १८०० अभंगांची चर्चा होऊन त्यांची टिपणे तयार झाली होती.
पुढे १९२७ च्या सुमारास प्रा. केळकर यांच्या प्रयत्नांनी आणि डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीच्या मदतीने या टिपणांवरून ग्रंथनिर्मिती झाली. या खंडामध्ये केवळ ७५० अभंगांचा समावेश आहे. तुकाराम चर्चा मंडळाने पंधरा वर्षे सातत्याने अभ्यास करून ठेवलेल्या १८०० अभंगांपैकी केवळ ७५० अभंगांच्या टिपणांचेच प्रकाशन झाले आहे. उर्वरित १०५० अभंगांचे इतिवृत्त तयार असूनही ते प्रसिद्ध होऊ शकले नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे.
या शताब्दी वर्षांमध्ये तुकाराम सोसायटीने केलेल्या कष्टाचे फलित म्हणून हे १०५० अभंग प्रकाशित करण्याचे प्रयत्न व्हावेत, ही सदिच्छा! आणि तीच डॉ. भांडारकर, तुकाराम सोसायटी आणि संत तुकाराम महाराज यांच्या उदारमतवाद या त्रिवेणी धारेस वाहिलेली प्रार्थना होईल.
सुरेश पिंगळे, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा