केंद्र शासनाने नुकतेच ‘डिजिटल इंडिया’ या योजनेचे लोकार्पण केले. थोडक्यात या योजनेचा मुख्य उद्देश हा संपूर्ण भारताला संगणक व इंटरनेट साक्षर करून त्याचा दैनंदिन कामासाठी जास्तीत जास्त वापर करण्यास नागरिकांना सक्षम करणे हा असेल, तर ती योजना फलद्रूप करण्यासाठी काही मुद्दे विचारात घेणे गरजेचे आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकतीच एक सामाजिक, आíथक आणि जातीनिहाय सर्वेक्षणानुसार केलेल्या जनगणनेची (२०११) संपादित प्रत प्रकाशित केली. त्यानुसार देशामध्ये आजही २५% जनता निरक्षर आहे. आजच्या काळात संगणकावरील बहुतेक सर्व सुविधा या इंग्रजीमध्ये असतात. सुमारे ३०% जनता दारिद्रय़रेषेखालील गटात मोडते. आपल्याकडे इंटरनेटची सर्वोत्तम सेवा देणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांचे दर पाहिले तर ते नक्कीच सर्वसामान्यांच्या आटोक्यात नाहीत.
ज्या सोयी ‘डिजिटल इंडिया’तून शासनाच्या विचाराधीन आहेत, त्यासाठी तर थ्री-जी इंटरनेट किंवा ब्रॉडबँड सेवा आवश्यक असेल. जरी शासनाने खेडय़ापाडय़ांत ब्रॉडबँड पोहोचवण्याचे नियोजन केलेले असले तरीही त्याला किमान दोन वष्रे लागतील. तोपर्यंत लोकांना इंटरनेट साक्षर करण्याच्या दृष्टीने सरकार निश्चितपणे काही पावले उचलू शकेल. हल्लीच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतातील लोकांकडे एक वेळ खायला काही नसेल (बांधीव शौचकूपही नसेल), मात्र खिशात मोबाइल नक्की असतो, अशी भारतातील परिस्थिती आहे. यासाठी इंटरनेट माफक दरात उपलब्ध करावे आणि सर्व सेवा प्रादेशिक भाषेतून उपलब्ध कराव्यात, जेणेकरून त्या खेडय़ातील लोकांनाही वापरता येतील. एकूणच यातून लोक मोबाइलवर इंटरनेट वापरास सुरुवात करतील. त्यामुळे इंटरनेट साक्षरतेबरोबरच बरेच ज्ञानही लोकांना मिळेल. यातूनच ऑनलाइन साक्षरता अभियानही राबवता येईल. या ठिकाणी आवर्जून सांगावेसे वाटते की, आपल्याकडील खासगी क्षेत्रातील बऱ्याच कंपन्या या उपक्रमात सामील होण्यासाठी उत्सुक आहेत. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांनीही ग्रामीण भागातील स्त्रियांना इंटरनेट साक्षर करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. यात ई-कॉमर्स कंपन्यांनीही पुढाकार घेण्यास हरकत नसावी, कारण यातून निश्चित त्यांचाही फायदा आहेच. नुसतेच सरकारने घोषणा करून भागणार नाही, तर लोकांचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.
शुभांगी सोनवणे, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा