‘ उत्सव, उन्माद, उच्छाद’ हा अग्रलेख (१ जुल) वर त्यावरील प्रतिक्रिया यांतून उत्सव साजरे करण्याच्या सध्याच्या बेफाम व गुंडगिरी पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त झाली आहे. पण दरवर्षी आषाढ महिना आला की, याच प्रकारे लिहिले जाते. प्रत्यक्ष कठोर कारवाई होतच नाही आणि होणार तरी कशी ? मूलत: धर्माच्या आधारे राजकारण करणाऱ्या भाजप, शिवसेनेसारख्या पक्षांना जोपर्यंत जनतेतून मतांच्या रूपाने पाठबळ मिळत राहील, तोपर्यंत हे असेच चालणार. देवेंद्र फडणवीस वैयक्तिक कसे आहेत, हा मुद्दा नसून ते ज्या विचारधारेचे प्रतिनिधी आहेत, तिथे खरी समस्या आहे. त्यामुळे, सध्या बोकाळलेल्या धार्मिक उन्मादाला राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने फडणवीस आळा घालण्याचे मनावर घेतील, अशी अपेक्षा करणे देखील भाबडेपणाचे ठरेल.
अग्रलेखात नवरात्रोत्सवाचा उल्लेख आला आहे म्हणून लिहितो. पूर्वी हा उत्सव मुंबईमध्ये मुख्यत: गुजराती वस्त्यांतच अतिशय साधेपणाने साजरा केला जायचा. रात्री एक-दीड तास लाकडी टिपऱ्यांच्या तालावर लाउडस्पीकरशिवाय गरबा चालायचा. बघायलाही प्रसन्न वाटायचा. पण पुढे किरिट सोमय्या विधानसभेच्या िरगणात उतरले व त्यांनी पध्दतशीरपणे त्याचे इव्हेंटमध्ये रूपांतर केले. सामाजिक जाणिवा बोथट झालेल्या, विवेक गमावून बसलेल्या व विज्ञानवादी दृष्टिकोन विसरून गेलेल्या समाजात या उत्सवाला आताचे बेधुंद स्वरूप आले नसते, तरच नवल. हेच कमी-अधिक फरकाने दहीहंडी व महाराष्ट्राचे खास वैशिष्टय़ असलेल्या गणेशोत्सवाच्या बाबतीतही लागू पडते. त्यामुळे, असे म्हणावेसे वाटते की, उत्सवातील धांगडिधगा हा सामाजिक-राजकीय व्यवस्थेशी निगडित प्रश्न आहे.
संजय चिटणीस, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा