गोंधळ हाच इतिहास!
‘गोंधळ आवडे सर्वाना’ हा आपला अग्रलेख (२३ नोव्हेंबर) या देशाच्या तमाम जनतेचे व्यथित मन उघड करणारा आहे. भारतातील १२० कोटी जनतेच्या कल्याणकारी योजना चर्चेद्वारे मार्गस्थ लावण्यासाठी लोकनियुक्त प्रतिनिधींना जनता संसदेत पाठविते. परंतु हे प्रतिनिधी संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भांडत असतात. पंतप्रधानांनी राजीनामा दिला की, देशाच्या सर्वागीण प्रगतीचे चाक धावू लागेल हे यांना सांगितले कुणी? एखादा गरीब कामगार कामावर जाऊ शकला नाही की त्याचा पगार बुडतो; पण संसदेचे कामकाज बंद पाडले तरी यांचे दरदिवशीचे भरमसाट भत्ते चालूच राहतात. मिळणाऱ्या भत्त्यांत वाढ करण्याचा प्रस्ताव होतो, तेव्हा मात्र शत्रुत्वाला मित्रत्वाचे रूप येते. हे असेच चालू राहिले तर काही प्रमाणात अजूनही लोकांची या प्रतिनिधींवर/पुढाऱ्यांवर असलेली विश्वासार्हता संपुष्टात येईल. भारतीय लोकशाहीचे अशा कृत्याने दरदिवशी निघणारे वाभाडे पुढच्या पिढीला इतिहास म्हणून वाचावयास मिळतील. महापालिका, विधानसभा, लोकसभा ही संविधानाने निर्माण केलेली सभागृहे मग केवळ शक्तिप्रदर्शनार्थ कुस्तीचे आखाडे किंवा मनोरंजनाची नाटय़गृहे बनतील.
– सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा