अखेर पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा जेलमध्ये २१ नोव्हेंबर रोजी फाशी देण्यात आली. देशभर एकच जल्लोष झाला. पेढे-मिठाई वाटून झाले. अनेकांना ‘न्याय’ मिळाला असे वाटून गेले. तशी मते प्रसारमाध्यमांत आली. कसाबला दया वगरे दाखविण्याचा प्रश्नच नव्हता. सुमारे १६६  निरपराध नागरिकांना निर्घृणपणे ठार करणाऱ्याला दया दाखविणे म्हणजे दयाभावनेचा तो अपमान ठरला असता. तरीही एक प्रश्न विचारण्यात येतो आहे आणि तो रास्तही आहे.. दहशतवाद्याला फाशी दिली – दहशतवादाला कधी देणार?
अगदी फाळणी झाल्यापासून भारताने देशाबाहेरून होणाऱ्या आणि देशांतर्गत दहशतवादी कारवायांना सातत्याने तोंड दिले आहे. जागतिकीकरणाबद्दल वाद असले तरी दहशतवादाचे जागतिकीकरण झाले आहे हे कोणी नाकारणार नाही. खऱ्या अर्थाने भारतात दहशतवादी कारवायांना उत्तेजन मिळाले ते १९९२ मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली तेव्हापासून. त्या वेळी मुंबईतील निरपराध गरीब मुस्लिमांना ठार करण्यात आले. त्याचा वचपा १९९३ मध्ये दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट मालिका घडवून सरसकट ७५० सर्वधर्मीय नागरिकांना मुंबईभर मारून टाकले. त्यानंतरच्या काळातही हे दहशत सत्र सुरू राहिले आणि त्यामागे स्थानिक ‘अन्य’ धर्मीय नसून स्थानिक स्वधर्मीय असल्याचेही उघड होऊ लागले. २६.११.२००८ मध्ये मुंबईत ज्या दहशतवादय़ांच्या टोळीने (यात कसाबही होता) मुंबईत दहशत माजवली, त्यामागे केवळ तिकडील दहशतवादी गट नव्हते, तर त्यांना स्थानिक गटांचीदेखील मदत होती हे उघड झाले आणि नंतर ते गुप्तदेखील झाले. त्याआधी फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा येथे रेल्वेगाडीचा एक डबा जाळण्याचे प्रकरण झाले. त्यात ५७ प्रवासी मरण पावले आणि पाठोपाठ गुजरातभर मुस्लीम हत्याकांड राज्य शासनाने सुरू केले, त्यात ३००० मुस्लीम ठार करण्यात आले. म्हणजे १९९२-९३ पासून ते २००८ पर्यंत उभय धर्मीय दहशतवादी गटांनी स्वदेशी नागरिकांनाच नष्ट केले. कसाब तर अलीकडचा आहे. त्याला जाहीरपणे फाशी द्यावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी नव्हे, तर सामान्य नागरिकांनीपण केली होती; पण या मंडळींनी प्रज्ञा सिंग ठाकूर वगरे कट्टर िहदुत्ववादी दहशतवाद्यांनादेखील फाशी द्यावी, अशी मागणी केली नाही. त्यामागे एकच मानसिकता असते; आपला तो देशप्रेमी दुसऱ्या धर्माचा तो दहशतवादी! दहशतवादी कारवाया वाढण्यामागे ही सामान्य जनांमध्ये खोलवर रुजलेली भावना असते. म्हणून तर आपल्याला  दहशतवादाचे बालिश आकर्षण असते आणि भीतीदेखील वाटत असते.
दहशतीचे वातावरण नष्ट न होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असून कसाबला फाशी दिल्यानंतर झालेला जल्लोष हा अ-नागर स्वरूपाचा ठरतो, कारण या फाशीमागील कारण मीमांसा किती गंभीर आणि जीवघेणी असते याचा आपण विचार करीत नाही. आपल्याला तात्कालिक आनंद हवा असतो. वास्तविक, तसा आनंद क्रिकेटमध्ये जिंकलो तरी मिळतो!  ही एक विकृती असून आपण अजूनही सभ्यतेपासून कैक योजने दूर आहोत हेच यावरून दिसून येते.
शेवटी एक प्रखर वास्तव लक्षात घेणे हिताचे ठरावे; युद्ध म्हणजे अधिकृत आणि व्यापक दहशतवाद असतो, तर दहशतवाद म्हणजे छुपे अनधिकृत असे युद्ध असते. दोन्हीचा अंतिम हेतू मानव अधिकार नाकारण्याचा आणि प्रसंगी मानवाचे अस्तित्वच नाकारण्याचा असतो.
हे असेच चालू राहणार असेल तर असा जल्लोष करण्यासाठी एकही माणूस पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही!

भारतीय वृत्तवाहिन्यांचे गर्वहरण
ब्रेकिंग न्यूज’चा घोष २४ तास करणाऱ्या सर्वच वृत्तवाहिन्यांना कसाबच्या फाशीची बातमी आधी समजली नाही, ही भारतीय माध्यम-जगतातील एक चांगली तात्पर्यकथा म्हणावी लागेल. कसाबला फाशी देणार हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनाही  ठाऊक नव्हते हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसू शकतो, पण एकदा राष्ट्रपतींनी दया अर्ज नाकारल्यानंतर बाकीची केवळ औपचारिकता होती, हे वास्तव समजायला भारतीय मनांना जड जाईल हे खरेच, पण यानिमित्ताने केंद्र सरकारने कमालीची गुप्तता पाळत या देशाच्या प्रशासकीय शिस्तीची चुणूक दाखवली!
गल्लीमध्ये एखादा साप निघाला तरी त्याची ब्रेकिंग न्यूज करणाऱ्या आचरट वाहिन्यांची  शोधपत्रकारिता कशी सत्त्वहीन आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात धूळ फेकणारी आहे हेही या प्रसंगाने उघड झाले. कसाबला फाशी ही प्रत्येक भारतीय मनाला आनंद देणारी घटना  आहेच, पण आपल्या व्यावसायिक कौशल्याचा सतत टेंभा मिरवणाऱ्या या वाहिन्यांचे वस्त्रहरण यानिमित्ताने झाले, ही समस्त भारतीय वाहिन्यांच्या कायम लक्षात राहील अशी बोधकथा आहे.
अनघा गोखले, मुंबई</strong>

फाशी योग्यच; मराठीचे काय?
चार वर्षांपूर्वी २६/११ रोजी मुंबईवर केल्या गेलेल्या अतिरेकी हल्ल्यात सामील असलेल्या कसाबला फाशी दिली हे योग्य झाले. पण त्या घटनेचे सूत्र धरून सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘राज्य सरकारने कसाबला  फाशी देऊन बाळासाहेबांना चांगली श्रद्धांजली दिली,’ असे विधान करून चुकीची (गुणवत्तादर्शक) शब्दरचना केली आहे. ज्याप्रमाणे वैद्यकशास्त्रात एक्स रे, अ‍ॅन्जिओग्राफ ‘यशस्वी झाले’ असे न म्हणता ‘ठीक’ किंवा ‘माहितीदायक’ असे म्हणतात त्याप्रमाणे दिलेल्या श्रद्धांजलीस ‘चांगली’ किंवा ‘वाईट’ म्हणत नाहीत. श्रद्धांजली भावपूर्ण असते आणि एखादे कृत्य हे जणू श्रद्धांजलीच ठरेल असे म्हणताना ‘योग्य श्रद्धांजली’ किंवा ‘उचित श्रद्धांजली’ ही शब्दयोजना प्रसंगास अनुसरून ठरते.
मराठी अस्मितेचा जाता-येता उदोउदो करणाऱ्या शिवसेना संघटनेच्या प्रमुख प्रवक्त्यास मराठी भाषेतील अनुरूप शब्द सुचू नयेत याचा माझ्याप्रमाणे इतर मराठी भाषकांना निश्चितपणे खेद होईल!
नंदकिशोर पेडणेकर, अहमदनगर</strong>

सरकारने कर्तव्य केले, कौतुक नको!
निष्पाप भारतीय नागरिकांना निर्दयपणे ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा अजमल कसाबला फाशी दिले हे योग्य केले असले तरी त्यात शासनकर्त्यांचे कौतुक करण्यासारखे काही नाही आणि शासनकर्त्यांनीही आपण फार मोठा शूरपणा केला असे मानण्याचे कारण नाही. शासनाने आपले कर्तव्य केले एवढेच. परंतु हे कर्तव्य इतके उशिरा केले की, चार वर्षांत जनतेचे कोटय़वधी रुपये खर्च झाले. या काही कोटी रुपयांत अनेक कुपोषित बालकांचे प्राण वाचवता आले असते, अनेक झोपडपट्टय़ांत पाणी, वीज, संडास यांची सुविधा देता आली असती.
अमेरिकेने ज्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये शिरून अत्यंत गुप्तपणे क्रूरकर्मा ओसामा बिन लादेनला ठार मारले, तसे शासनाने केले असते तरच ते शूरपणाचे आणि कौतुकास पात्रतेचे ठरले असते.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते, ‘मोहम्मद अफझलचा २२ वा नंबर आहे आणि त्यामुळे आधीच्या २१ जणांच्या नंतर मोहम्मद अफझलबाबत निर्णय घेण्यात येईल.’ मनमोहन सिंग त्या वेळी खोटे बोलले हे आता सिद्ध झाले आहे.
– केशव आचार्य, अंधेरी

Story img Loader