अखेर पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाब याला पुण्यातील येरवडा जेलमध्ये २१ नोव्हेंबर रोजी फाशी देण्यात आली. देशभर एकच जल्लोष झाला. पेढे-मिठाई वाटून झाले. अनेकांना ‘न्याय’ मिळाला असे वाटून गेले. तशी मते प्रसारमाध्यमांत आली. कसाबला दया वगरे दाखविण्याचा प्रश्नच नव्हता. सुमारे १६६ निरपराध नागरिकांना निर्घृणपणे ठार करणाऱ्याला दया दाखविणे म्हणजे दयाभावनेचा तो अपमान ठरला असता. तरीही एक प्रश्न विचारण्यात येतो आहे आणि तो रास्तही आहे.. दहशतवाद्याला फाशी दिली – दहशतवादाला कधी देणार?
अगदी फाळणी झाल्यापासून भारताने देशाबाहेरून होणाऱ्या आणि देशांतर्गत दहशतवादी कारवायांना सातत्याने तोंड दिले आहे. जागतिकीकरणाबद्दल वाद असले तरी दहशतवादाचे जागतिकीकरण झाले आहे हे कोणी नाकारणार नाही. खऱ्या अर्थाने भारतात दहशतवादी कारवायांना उत्तेजन मिळाले ते १९९२ मध्ये बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली तेव्हापासून. त्या वेळी मुंबईतील निरपराध गरीब मुस्लिमांना ठार करण्यात आले. त्याचा वचपा १९९३ मध्ये दाऊद इब्राहिमने बॉम्बस्फोट मालिका घडवून सरसकट ७५० सर्वधर्मीय नागरिकांना मुंबईभर मारून टाकले. त्यानंतरच्या काळातही हे दहशत सत्र सुरू राहिले आणि त्यामागे स्थानिक ‘अन्य’ धर्मीय नसून स्थानिक स्वधर्मीय असल्याचेही उघड होऊ लागले. २६.११.२००८ मध्ये मुंबईत ज्या दहशतवादय़ांच्या टोळीने (यात कसाबही होता) मुंबईत दहशत माजवली, त्यामागे केवळ तिकडील दहशतवादी गट नव्हते, तर त्यांना स्थानिक गटांचीदेखील मदत होती हे उघड झाले आणि नंतर ते गुप्तदेखील झाले. त्याआधी फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा येथे रेल्वेगाडीचा एक डबा जाळण्याचे प्रकरण झाले. त्यात ५७ प्रवासी मरण पावले आणि पाठोपाठ गुजरातभर मुस्लीम हत्याकांड राज्य शासनाने सुरू केले, त्यात ३००० मुस्लीम ठार करण्यात आले. म्हणजे १९९२-९३ पासून ते २००८ पर्यंत उभय धर्मीय दहशतवादी गटांनी स्वदेशी नागरिकांनाच नष्ट केले. कसाब तर अलीकडचा आहे. त्याला जाहीरपणे फाशी द्यावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी नव्हे, तर सामान्य नागरिकांनीपण केली होती; पण या मंडळींनी प्रज्ञा सिंग ठाकूर वगरे कट्टर िहदुत्ववादी दहशतवाद्यांनादेखील फाशी द्यावी, अशी मागणी केली नाही. त्यामागे एकच मानसिकता असते; आपला तो देशप्रेमी दुसऱ्या धर्माचा तो दहशतवादी! दहशतवादी कारवाया वाढण्यामागे ही सामान्य जनांमध्ये खोलवर रुजलेली भावना असते. म्हणून तर आपल्याला दहशतवादाचे बालिश आकर्षण असते आणि भीतीदेखील वाटत असते.
दहशतीचे वातावरण नष्ट न होण्यामागे हे एक महत्त्वाचे कारण असून कसाबला फाशी दिल्यानंतर झालेला जल्लोष हा अ-नागर स्वरूपाचा ठरतो, कारण या फाशीमागील कारण मीमांसा किती गंभीर आणि जीवघेणी असते याचा आपण विचार करीत नाही. आपल्याला तात्कालिक आनंद हवा असतो. वास्तविक, तसा आनंद क्रिकेटमध्ये जिंकलो तरी मिळतो! ही एक विकृती असून आपण अजूनही सभ्यतेपासून कैक योजने दूर आहोत हेच यावरून दिसून येते.
शेवटी एक प्रखर वास्तव लक्षात घेणे हिताचे ठरावे; युद्ध म्हणजे अधिकृत आणि व्यापक दहशतवाद असतो, तर दहशतवाद म्हणजे छुपे अनधिकृत असे युद्ध असते. दोन्हीचा अंतिम हेतू मानव अधिकार नाकारण्याचा आणि प्रसंगी मानवाचे अस्तित्वच नाकारण्याचा असतो.
हे असेच चालू राहणार असेल तर असा जल्लोष करण्यासाठी एकही माणूस पृथ्वीवर शिल्लक राहणार नाही!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा