महापुरुषाचे विराट दर्शन जगाला घडवण्याची संधी..
अखेर मुंबईतील इंदू मिलची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली. एक महाराष्ट्रीय म्हणून आणि डॉ. बाबासाहेबांबद्दल अतीव आदर असल्यामुळे माझ्यासारख्या लाखो नागरिकांना याचा आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब हे केवळ आपल्या राज्यापुरते सीमित न करता, एका धर्म-जातीपुरते त्यांना न अडकवता त्यांच्या कार्याचे आणि दूरदृष्टीचे महत्त्व आपण या स्मारकाच्या माध्यमातून साऱ्या जगापुढे न्यायला हवे. एक सुसज्ज ग्रंथालय उभारून त्यांच्या भाषणाच्या ध्वनिफिती यात ठेवता येतील. याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. तेव्हा नेहमीचा ढिसाळ आणि लालफितीचा सरकारी कारभार बाजूला ठेवून पुढच्या अनेक पिढय़ांना प्रेरणा देईल अशा रीतीने त्याची उभारणी करायला हवी. समाजातील मागास वर्ग, आíथक मागास वर्ग, न्यायापासून वंचित स्त्रिया आणि बालके यांच्यासाठी ठोस कार्यक्रम या स्मारकाच्या माध्यमातून हाती घेता येतील. केवळ दगड-विटांतून स्मारक बनत नाही, तर त्या वास्तूत या थोर विभूतीच्या कार्याचा चालताबोलता इतिहास निनादला पाहिजे आणि या इतिहासाचे नाते सद्य परिस्थितीतील समस्या, गरजा आणि सामाजिक असमतोल दूर करण्याच्या उपयांशी जोडले गेले पाहिजे.
सर्वच संघटनांनी कृपया याचे श्रेय घेण्याच्या नादात या जिंकलेल्या लढय़ाचा वापर संकुचित राजकीय समीकरण तयार करण्यासाठी करू नये. संपूर्ण जगाला समतेची वाट दाखवण्याचे, न्यायाची दिशा दाखवण्याचे सामथ्र्य असलेल्या या महापुरुषाला एक चांगली आदरांजली वाहण्याची ही संधी आहे.. तिचे सोने करावे आणि जगाला या महनीय व्यक्तीचे विराट दर्शन घडवावे.
– अनघा गोखले, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा