कलाकृती आणि त्यांवरील चित्रपट यांविषयीच्या वाद-विवादांचा मुन्शी प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर आणि सत्यजित राय यांच्यासंदर्भात वेध घेणारे हे पुस्तक अतिशय उद्बोधक आणि मार्गदर्शक असे आहे.
चित्रपट काढताना लेखकाच्या कलाकृतीत केले जाणारे बदल आणि त्यावरून लेखकाशी होणारे वाद सिनेसृष्टीला नवीन नाहीत. ‘फिल्मिंग फिक्शन’ हे या वादाशी सखोलपणे भिडू पाहणारं आणि त्यातून काही स्पष्ट अनुमानसदृश विधानं वाचकांसमोर ठेवू पाहणारं पुस्तक आहे. ‘टागोर, प्रेमचंद अ‍ॅण्ड राय’ असं या पुस्तकाचं उपशीर्षक आहे. दोन साहित्यिक आणि एक दिग्दर्शक अशा तीन दिग्गजांच्या कलाकृती समोर ठेवून सिनेमा आणि साहित्य यांच्यातलं नातं शोधण्याचा हा प्रयत्न आहे. साहित्याचं रुपेरी रूपांतर होताना जे बरे-वाईट बदल केले जातात त्याचं समीक्षकी नजरेतून केलेलं हे अभ्यासपूर्ण निरीक्षण आहे. माध्यम स्थित्यंतरात झालेल्या बदलांमुळे कलाकृतीच्या मूळ स्वरूपाला उठाव मिळाला की, त्याच्या आशयाला कसा धक्का पोचतो याची ही चिकित्सा आहे. मोठय़ा अजरामर कलाकृतीत लक्षणीय बदल केले जाणे हे नतिकदृष्टया योग्य की अयोग्य; आवश्यक आणि अनावश्यक यावर नेहमी चर्चा चालू असते. या पुस्तकात ती अधिक नेटकेपणानं केली आहे. चित्रपट आणि वाङ्मय या दोन्ही माध्यमांचा अभ्यास असलेल्यांनी केलेली ही चर्चा वाचनीय तर आहेच, पण विचारप्रवर्तकही आहे.टागोर आणि प्रेमचंद या दोन बुजुर्ग साहित्यिकांच्या कलाकृती पडद्यावर साकारताना सत्यजित राय यांनी बऱ्यापकी कलात्मक स्वातंत्र्य घेतलं आहे. या स्वातंत्र्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. वेळोवेळी साहित्यप्रेमींच्या शाब्दिक हल्ल्याला तोंड द्यावं लागलं, अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागली. राय यांनी यावरील आक्षेपांना आपल्या लेखातून समर्पक उत्तरं दिली आहेत. राय यांनी स्वत: ललित लेखन केलं असल्यानं कलाकृतीचं साहित्यिक मूल्य ते ओळखून होते. टागोर साहित्य वाचत राय लहानाचे मोठे झाले. त्यांना चित्रकलेतही रस होता. ते स्वत: उत्तम ग्राफिक आर्टस्टि होते. या दोन्ही माध्यमांची जाण त्यांना चित्रपट निर्मिती करताना उपयोगी पडली. साहित्यकृती पडद्यावर आणताना त्यांनी त्यावर केलेले संस्कार म्हणूनच नीट अभ्यासावेत असे आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगानं साहित्य अकादमीच्या सहकार्यानं २००६ साली एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यात सादर झालेल्या काही निबंधांचं संकलन म्हणजे हे पुस्तक.
या पुस्तकाची तीन भागांत वर्गवारी केली आहे. पहिल्यात साहित्याचं रुपेरी पडद्यावरल्या कलाकृतीत रूपांतर होतानाची प्रक्रिया आणि त्यातून साहित्यकृतीला अंतिमत: प्राप्त झालेलं चित्ररूप यांचा ऊहापोह आहे. टागोर आणि राय यांच्या बऱ्याच कलाकृती स्त्रीप्रधान आहेत. त्यांनी सादर केलेली स्त्रीरूपं हा दुसऱ्या भागाचा चर्चाविषय आहे. तिसऱ्या भागात प्रेमचंद यांच्या दोन साहित्यकृती आणि राय यांनी साकार केलेले त्यांचे पडद्यावरले आविष्कार यांची सखोल तपासणी आहे. मीनाक्षी मुखर्जी, विजया सिंग, अनुराधा घोष, शोहिनी घोष, प्रिया चौधरी, विष्णुपूर्ण सेनगुफ्त, दिफ्ती झुत्शी, जसबीर जैन यांसारख्या दिग्गज सिनेपंडितांची अभ्यासपूर्ण समीक्षा आणि साहित्य आणि सिनेमाध्यमावरले त्यांचे विचार या पुस्तकात एकत्रितपणे वाचायला मिळतात. सिनेमाध्यमाकडे गांभीर्यानं पाहणाऱ्या सिनेरसिकांच्या दृष्टीनं ही चांगलीच बौद्धिक मेजवानी आहे.
सिनेमा पाहणे आणि पुस्तक वाचणे हे दोन स्वतंत्र अनुभव आहेत हे सुरुवातीला प्रस्तावनेत स्पष्ट करून या दोन्ही माध्यमांची वैशिष्टय़ं, त्यांची बलस्थानं आणि मर्यादा संपादकांनी वाचकांपुढे ठेवल्या आहेत. दोन्ही माध्यमांच्या ताकदीतील तरतमभाव तपासून त्यांचं श्रेष्ठ-कनिष्ठत्व ठरवण्याची भूमिका या संपादकीयात नाही आणि पुस्तकातल्या कोणत्याही निबंध-लेखनामागेही ती नाही. प्रेमचंद, टागोर आणि राय यांचं उदात्तीकरण करण्यात न गुंतता अकादमिक शिस्तीनं माध्यमांतराचे हे प्रयोग हाताळण्याचा जो दृष्टिकोन या अभ्यासकांनी अवलंबला आहे तो विशेष उल्लेखनीय आहे. या दृष्टीनं हा या विषयावरला आदर्श ग्रंथ म्हणावा लागेल.
राय यांच्या ३० चित्रपटांपकी २३  साहित्यकृतींवर बेतलेले आहेत. उरलेल्या सात चित्रपटांमधल्या चार चित्रपटांच्या कथा राय यांनी स्वत: लिहिलेल्या आहेत. राय यांचं साहित्यप्रेम यातून आपल्यासमोर येतं. केवळ टागोर आणि प्रेमचंद यांच्या साहित्यावर आधारलेल्या चित्रपटातच नव्हे तर इतरांच्या साहित्यकृतीवर बेतलेल्या निर्मितीतदेखील हवे तसे बदल करण्याचं स्वातंत्र्य राय यांनी घेतलेलं आहे. थोर साहित्यकृतींचा दिग्दर्शकानं लावलेला अन्वय असं त्यांच्या या चित्रपटांचं वर्णन करावं लागेल. या पुस्तकात बहुतेक निबंधकारांनी हाच सूर प्रामुख्यानं आळवलेला आहे. तो या थोर साहित्यकृतींना न्याय देणारा ठरला आहे की त्यांच्यावर अन्याय करणारा याचं विश्लेषण या पुस्तकात आढळतं. मूळ साहित्यकृतीचा गाभा समजावून सांगणं, नंतर चित्रपटकारानं त्यात केलेल्या बदलांचा तपशील सादर करणं आणि त्यानंतर सखोल विश्लेषण करून हे बदल आशयाचा परिणाम वाढवण्यासाठी सहाय्यभूत ठरले की, त्यांनी आशयाचा केंद्रिबदूच भलतीकडे सरकवला हे उदाहरणासहित वाचकांसमोर ठेवणं अशा अकादमिक शिस्तीत पुस्तकातील जवळजवळ सर्व निबंधलेखन सिद्ध झालं आहे.
कादंबरी वाचणारे कादंबरीवर आधारलेला सिनेमा पाहायला जातात तेव्हा त्यांची सर्वसाधारण प्रतिक्रिया नाराजीची असते. सिनेमा चांगला आहे, पण मूळ कादंबरीची सर या सिनेमाला नाही; किंवा सिनेमा कादंबरीच्या जवळपास फिरकत नाही असे उद्गार ऐकायला मिळतात. सिनेमा हे स्वतंत्र कलामाध्यम आहे याची जाण आपल्या प्रेक्षकांना नाही याबाबत स्वत: राय यांनी आपल्या लिखाणातून अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. कादंबरीवर आधारलेला चित्रपट म्हणजे कादंबरीचं थेट भाषांतर नव्हे. काही वेळा साहित्यकृतीचं मध्यवर्ती सूत्र उचलून सिनेमावाले मन मानेल तशी त्याची मांडणी करताना दिसतात. सिने-दिग्दर्शकांना निर्मितीसाठी साहित्याकडे का वळावं लागतं; त्यामागे त्यांचे काय हेतू असतात यावरची चर्चा प्रस्तावनेत केली आहे.
दिग्दर्शकानं कथा-कादंबरीतल्या तपशिलाशी प्रामाणिक राहायला पाहिजे, अशी अपेक्षा पुस्तकातल्या निबंधात आढळत नाही, पण साहित्यकृतीमधल्या मध्यवर्ती आशयाला धक्का लावणं हे अनतिक असल्याचं प्रतिपादन बहुतेक निबंधांत आहे. लेखनामागील लेखकाचा दृष्टिकोन आणि चित्रपट दिग्दर्शकाचा दृष्टिकोन यात तफावत असेल तर आशयकेंद्रालाच कसा धक्का पोचतो हे काही निबंधांत दाखवून दिलं आहे. दिफ्ती झुत्शी यांनी अत्यंत कठोरपणे राय यांच्या ‘सद्गती’ या चित्रपटाबाबत हे घडलं असल्याचं प्रतिपादन केलं आहे. प्रेमचंद यांच्या ‘सद्गती’ कथेवर राय यांनी दूरदर्शनसाठी टेलि-फिल्म बनवली. दलितांच्या पिळवणुकीचं अत्यंत विदारक दर्शन प्रेमचंद यांनी या कथेत घडवलं आहे. ते पडद्यावर उभं करण्यात राय मात्र अयशस्वी ठरले आहेत हे झुत्शी यांनी बारकाव्यानिशी दाखवून दिलं आहे. कॅमेऱ्याच्या सौंदर्यपूर्ण चौकटी, लोभस प्रकाशयोजना यांवर आपले समीक्षक मोहित झाल्यानं हा चित्रपट दलितांच्या काळ्याकुट्ट जीवनावस्थेला नीटपणे भिडत नाही हे या समीक्षकांच्या लक्षात आलं नाही असं झुत्शी म्हणतात. अत्यंत तीव्र अशी सामाजिक समस्या दिग्दर्शकानं फार सौम्यपणे पडद्यावर मांडली असा त्यांचा दावा आहे.
प्रेमचंद यांच्या ‘शतरंज के मोहरे’ या कथेच्या आत्म्याचीही राय यांनी अशीच विल्हेवाट लावलेली आहे असं तरीनी पांडे याचं मत आहे. काहींच्या मते राय यांनी दोन व्यक्तींमधल्या बुद्धिबळाच्या खेळाला आपल्या चित्रपटात भव्य रूप दिलं आहे. तत्कालीन राजकीय पातळीवरला चाललेला खेळही पडद्यावर आणायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ‘चारुलता’ आणि ‘घरे बाहिरे’ या राय यांच्या गाजलेल्या कलाकृतीचं विश्लेषणही टागोर यांच्या मूळ साहित्यकृतीची आणि तिला पडद्यावर दिल्या गेलेल्या रूपाची सखोल चिकित्सा करणारं आहे. आपल्याकडे पूर्वी ‘मला उमजलेले बालगंधर्व’ असा कार्यक्रम व्हायचा. राय यांनी घडवलेले थोर साहित्यकृतीचे रुपेरी आविष्कार हे नेहमीच ‘मला उमजलेले रवींद्रनाथ’.. ‘मला उमजलेले प्रेमचंद’ या धर्तीचे राहिले आहेत. कलाकृतीत आपल्याला जे भावलं ते राय मांडत आले आहेत. आणि म्हणूनच साहित्यकृती आणि त्याचा रुपेरी आविष्कार या प्रक्रियेमागील व्याकरण आणि समीकरण जाणून घेण्यासाठी टागोर आणि त्यांच्या वाङ्मयावरले राय यांचे चित्रपट यांसारखा दुसरा चपखल बीजविषय सापडणार नाही.
या पुस्तकातले निबंधकार बव्हंशी बंगाली आहेत. त्यांच्या लेखनामागील अभ्यास आणि मांडणीतला परखडपणा दाद देण्याजोगा आहे. थोरामोठय़ांच्या कलाकृतीवरील लेख बऱ्याचदा दडपणाखाली लिहिल्यासारखे वाटतात. चिकित्सेऐवजी गौरवपर लिहिण्याची वृत्ती मराठी लेखकांत जास्त आढळते. तो प्रकार इथं नाही. सिनेअभ्यासकांबरोबरच आपल्याकडल्या या समीक्षकांनी, लेखकांनी, खास करून ज्यांच्या साहित्यकृती पडद्यावर सादर झाल्या आहेत अशा कथा-कादंबरीकारांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा.
फिल्मिंग फिक्शन – टागोर, प्रेमचंद अँड राय
– संपा. एम. असदुद्दीन, अनुराधा घोष,
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, नवी दिल्ली,
पाने : ३२०, किंमत : ४०३ रुपये.

Story img Loader