मराठी साहित्य महामंडळ या संस्थेचे काम एकच. ते म्हणजे सतत साहित्य संमेलने आयोजित करणे. अशा संमेलनांचे सारे संयोजन त्या त्या शहरातील साहित्य संस्था करते. महामंडळाने फक्त ‘मम’ म्हणायचे असते. महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये अखिल भारतीय स्तरावरची साहित्य संमेलने आयोजित करून झाल्यावर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना परदेशीही अशी संमेलने भरवण्याची कल्पना सुचली. एरवी आपापल्या शहराबाहेर दुसऱ्याच्या खर्चाने पंचतारांकित सुविधांसह जाण्याचा योग महामंडळाच्या अधिकाऱ्यांना येण्याची शक्यता कमी. परदेशी गेलेल्या मराठी बांधवांची मुले घरादारात इंग्लिशचा जयघोष करत असले, तरी ते मात्र मराठीसाठी सतत गळा काढण्यास तत्पर असतात. त्यामुळे टोरांटो, लंडन यांसारखी शहरे फक्त नकाशात पाहणाऱ्या मराठी साहित्यिकांना तेथे संमेलनाच्या निमित्ताने दुसऱ्याच्या खर्चाने जाण्याची संधी नामीच म्हटली पाहिजे. महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासारख्या प्रज्ञावान आणि हरहुन्नरी व्यक्तीने पहिल्यांदा असले परदेशी संमेलन भरवण्याचे स्वप्न पुरे करून दाखवले. लग्नातल्या मानपानाप्रमाणेच याही संमेलनातील वाद सतत गाजत राहिले. आपल्या मराठीचे आपल्याच राज्यात निघत असलेले धिंडवडे पाहवेनासे झाल्यामुळे की काय न कळे, साहित्यिकांना परदेशी नेऊन त्याचा विसर पाडण्याचे काम या कौतिकरावांनी केले. त्यांच्यानंतरच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी तो एक आदर्श ठरल्यामुळे परदेशी संमेलने भरवणे हा एक प्रतिष्ठेचा विषय होऊन राहिला. साहित्य महामंडळाने मग दर तीन वर्षांनी असे संमेलन आयोजित करता यावे, यासाठी घटनादुरुस्तीच करून टाकली आणि ही विश्व साहित्य संमलनेही अधिकृत करून टाकली. मागील वर्षी टोरांटो या शहरात होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने झालेला संगीत मानापमानचा प्रयोग मराठीजनांनी आपुलकीने पाहिला. अखेर हे संमेलन रद्द करावे लागले. यंदा ते लंडन शहरी करण्याचे घाटले होते. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दर वर्षी राज्य शासनाकडून भरघोस आर्थिक मदत मिळत असते. ती अपुरी पडू नये, म्हणून हे संमेलन एखाद्या ‘इव्हेंट’सारखे आयोजित केले, तर संबंधित आयोजक संस्थेच्या पदरात चार पैसे उरतात. पुण्यात झालेल्या साहित्य संमेलनात असे ब्याऐंशी लाख रुपये शिल्लक राहिले होते. ठाण्यातही असेच काही पैसे उरले. परदेशी असलेल्या मराठी लोकांना असे संमेलन म्हणजे पदराला खार. साहित्यिक दमडीही देणार नाहीत, वर त्यांच्या नाना अटी. इतकेच लोक येणार, त्यांना अमुकच सोयी हव्यात वगैरे. लंडनवासीयांनी संमेलनासाठी भारतातून काही निधी देण्याची मागणी केली, तेव्हा महामंडळाने थेट राज्य शासनाकडे पदर पसरला. आधीच दुष्काळ, त्यात साहित्य संमेलन, अशी सरकारची कोंडी झाल्याने, आर्थिक मदत देण्यास शासनाने नकार देणे स्वाभाविक होते. पाटबंधारे खात्याने आजवर खर्च केलेल्या सत्तर-ऐंशी हजार कोटी रुपयांमधून राज्यातील एकाही दुष्काळी गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला नसल्याने आधीच अडचणीत आलेल्या शासनाने साहित्यिकांच्या पंचतारांकित संमेलनासाठी मदत देणे म्हणजे टीकेच्या आगीत तेल ओतण्यासारखे होते. टोरांटोपाठोपाठ लंडनचेही संमेलन हुकल्यामुळे आता बुद्रूक साहित्यिकांना स्वप्नभंगाच्या दु:खाला सामोरे जावे लागणार आहे. आता म्हणे मलेशियाचे निमंत्रण कौतिकरावांकडे आले आहे. त्यांचा हट्ट असा, की आपण महामंडळाचे अध्यक्ष होईपर्यंत थांबा. सध्याच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांचे म्हणणे असे, की आणखी एक वर्ष कुणाकडून निमंत्रण येते काय, याची वाट पाहावी. सगळाच मामला दुसऱ्याच्या पैशाने साहित्यिकांची चैन करण्याचा. साहित्याची उंची वाढावी, त्यासाठी वातावरण निर्माण करावे, असल्या फालतू गोष्टीत रसच कुणाला आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा