सांस्कृतिक उद्गारांमागे कसली चळवळ नाही, माध्यमांनी मनोरंजनाचं व्यापारीकरण केलंच आहे, अशा ‘बीभत्स गारठय़ा’तून बाहेर पडण्यासाठी मागे वळून पाहतानाच पुढेही पाहायला हवं. चळवळी आणि लिट्लि मॅगेझीन यांत रमलेल्यांनी साहित्याच्या पलीकडे पाहून धर्मासकट, राजकारणासकट आजच्या स्थितीचा विचार करायला हवा; यासाठी हे एका ज्येष्ठ सांस्कृतिक कार्यकर्त्यांचं आवाहन..
एकविसाव्या शतकाचे पहिले तप संपताना आपण सगळे एकेकाळचे क्रांतिसूर्य, पावसाळय़ात धग कमी झालेल्या सोलर पॅनेलसारखे इतिहासातल्या प्रकाशाची गाणी आठवत ‘काय ते दिवस होते’ असं म्हणत सत्काराच्या शाली जमवत स्थितिशील झालो आहोत काय?
साहित्य भरपूर प्रसिद्ध होतंय, पण साहित्यिक किती तयार होताहेत? साहित्य हे चळवळ राहिले नाही आणि चळवळीच्या साहित्याकडे आपण आपलाच तरुणपणाचा फोटो पाहिल्यासारखे पाहातो!
दि. के. बेडेकरांनी ज्याला ‘बीभत्स गारठा’ म्हटले होते तशीच सद्यस्थिती दिसते काय?
ज्या प्रस्थापित साहित्य व्यवहाराला, तथाकथित अखिल भारतीय साहित्य संमेलनाला आव्हाने देत, त्यांच्या मांडवात त्यांना राजकीय- सामाजिक ठराव मांडायला लावून ते पार अध्यक्षपदाची खुर्ची आपण मिळवून झाली; त्या संमेलनांना उत्सवी, ब्राह्मणी लग्नसोहळे ठरवत आपण दलित, आदिवासी, स्त्री, विद्रोही, परिवर्तन, सम्यक अशी पर्यायी संमेलने उभी केली. पण आता या संमेलनांचे स्वरूपही उत्सवी, दरवर्षी पार पाडायची एक कृती असेच व्हायला लागलेय काय?
या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गरज, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून मला थोडे अंतर्मुख होऊन मागच्या पंचवीस-तीस वर्षांत आपण नेमके कुठे होतो, याचा विचार करावासा वाटतो. कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा मुळात साहित्यच टिकेल काय? टिकले तर काय स्वरूपात टिकेल, याचा विचार करण्याची गरज आहे. मागच्या काही शतकांत धर्म, राज्य, साहित्य, संस्कृती यांत विचारांच्या व कृतींच्या पातळीवर अनेक चळवळी झाल्या. विचारांचे खंडन-मंडन झाले तसेच हिंसेचे पाटही वाहिले. धर्म आता जीवनाच्या अनेक क्षेत्रांतून बाद होईल असे वाटत असतानाच, जगभरच मूलतत्त्ववादय़ांनी डोके वर काढले आणि प्रचंड सार्वजनिक हिंसाचारासाठी या अफूचे व्यसन लागलेली नवी तरुण पिढी निर्माण झाली. बलाढय़ रशियाचे विघटन झाल्यानंतर अमेरिकेने जगाचा राजकीय भूगोल बदलण्याचा विचार सोडून सांस्कृतिक आक्रमण सुरू केले. आज चीनसारख्या देशातला तरुणही अमेरिकन मायाजालात अडकत चाललाय. तर भारतात मतदानाला न जाता सुट्टय़ांत मश्गूल होणारा नवश्रीमंत व श्रीमंत वर्ग ओबामांच्या निवडणुकीवेळी टीव्हीला डोळे लावून बसू लागला नि सोशल नेटवर्कच्या आभासी जाळय़ात भ्रष्टाचाऱ्यांना पकडण्याचे उद्योग करू लागला आहे.
विसाव्या शतकाच्या शेवटच्या पाव शतकात माध्यम क्रांतीची सुरुवात झाली आणि बघता बघता या क्रांतीने प्रबोधनाच्या चळवळीतील प्रमुख लोकमाध्यमे – वर्तमानपत्रे, रेडिओ, चित्रवाणी, नाटक, चित्रपट यांना निव्वळ मनोरंजनाचे व ‘मनोरंजनाच्या व्यापारा’चे स्वरूप दिले. त्यापाठोपाठ झालेल्या संगणक व दूरसंचार क्रांतीने तर लिखित शब्दाचे अस्तित्वच धोक्यात आणले. त्याचबरोबर संगणकासाठी इंग्रजी भाषेची अनिवार्यता निर्माण करून जगभरातल्या जवळपास दोन ते तीन हजारांहून अधिक भाषा बोलीभाषा संपवणारी एक सांस्कृतिक त्सुनामी आणली.
‘खाउजा’ (खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण) धोरणामुळे दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होणारा श्रीमंत वर्ग व अधिक गरीब होणारा गरीब वर्ग एवढे दोनच वर्ग आता शिल्लक राहिले आहेत. कामगार व मध्यमवर्ग संपल्याचे परिणाम आपल्या सांस्कृतिक जीवनावरही झालेले दिसतात. आपली भाषा, जात, धर्म, संस्कृती यांविषयी हे दोन्ही वर्ग मुळातून संवेदनशील होते. त्यांच्यावर अस्मितावाद लादला गेला नव्हता. त्या मूळच्या संवेदनशीलतेतूनच नाटक, चित्रपटांसारख्या कलांचा निर्माता व आस्वादक जसा तो झाला, तसाच तो साहित्यावर आपला वैचारिक पिंड पोसू लागला. निव्वळ मनोरंजन, स्मरणरंजन ते प्रबोधनाच्या गरजेतून संशोधन, प्रभंजन अशी आवर्तने या तिन्ही माध्यमांतून तो हिरिरीने करायचा आणि त्यांचे प्रतिबिंब त्याच्या राजकीय विचारांतही उमटे.
यातूनच महाराष्ट्रापुरते पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेबांची धर्मातराची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती, कम्युनिस्टांच्या कामगार चळवळी ते नक्षलवाद, शिवसेनेचा जन्म, पँथरची निर्मिती ही सारी वर उल्लेखलेल्या काळाची अपत्ये होती आणि स्वातंत्र्यानंतर सामाजिक क्रांतीच्या वेडाने साठच्या दशकातला तरुण ऐंशीच्या दशकापर्यंत झपाटून गेला होता. मात्र आणीबाणीनंतरच्या राजकीय भूमिकांतून उद्भवलेल्या राजकीय, वैचारिक आणि व्यक्तिगत संघर्षांतून हा – दोन दशकांत उभा केलेला- परिवर्तनाचा लढा क्रमश ढासळत गेला. आणि हळूहळू जमीनदोस्त झाला.
हा आमच्या मागच्या पंचवीस-तीस वर्षांचा इतिहास आहे. साहित्यापुरतं बघायचं ठरलं तर साठोत्तरी काळातली पिढी आता वयाच्या सत्तरीत आली आहे. लिट्लि मॅगझीनची चळवळ, दलित साहित्याचा उद्गम व विकास, स्त्रियांचे साहित्य, आदिवासी भटक्यांचे साहित्य हा साठोत्तरी साहित्यिक परिवर्तनाचा पुढचा टप्पा १९७० ते १९८० या दशकात पार पडलेला दिसतो. या काळात लेखकाचा लेखकराव का होतो असा सवाल विचारणारे कालांतराने हत्तीवरून स्वाक्षरीयुक्त प्रत वितरित करणारे लेखकराव तर झालेच पण प्रसंगोपात्त त्यांनीही समया प्रज्वलित केल्या.
साठ सालची एकी विसावं शतक संपतानाच ‘बेकी’वर आली. आज नव्या पिढीला एकाच वेळी त्यांचे कसदार साहित्य समग्र स्वरूपात वाचायला मिळते आणि नेमाडे- सारंग वा ढाले-ढसाळ असा कलगीतुराही वाचायला मिळतो!
विसाव्या शतकाच्या अखेरीस चाळिशीत आलेल्या माझ्या पिढीने ही सांस्कृतिक अडगळ, एकविसाव्या शतकातही सांभाळलीय पण इथून पुढच्या काळात, पुढल्या पिढय़ा माझ्यासकट ही सांस्कृतिक अडगळ सांभाळतील का? त्यांना हे लेखन, हे साहित्य, त्यातील प्रश्न, माणसं भावतील का? कारण साठोत्तरी दलित, ग्रामीण, भटके, आदिवसी यांच्या साहित्यातून दिसणारे गाव, खेडे, तालुके, जिल्हे झपाटय़ाने बदलत आहेत. तिथल्या माणसांचे भौगोलिक, सांस्कृतिक जीवन एका वेगळय़ा सपाटीकरणात सापडले आहे. दूरसंचार आणि माध्यम क्रांतीने, शहरीकरणाची स्वस्त मनोरंजनाची लालूच त्यांना घरबसल्या दिलीय. एकेकाळी भेळेच्या, भजीच्या पुडीतून आलेला कागद उत्सुकतेने वाचणारा वर्ग, रोड टच धाब्यावर बसून खाल्ल्यावर टिश्श्यू पेपर मागतो आणि मोबाइल कानाला लावतो हा सगळा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे; अन्यथा पुढल्या पिढीच्या दृष्टीने आपण आज ‘ऐतिहासिक’ ठरलोय, लवकरच अश्मयुगीन ठरू!
म्हणूनच एकविसाव्या शतकाचे पहिले तप संपताना मी जेव्हा थोडे रिवाइंड आणि फास्ट फॉरवर्ड पद्धतीने पाहातो, तेव्हा मला काय दिसते?
उद्याच्या क्रांतीचं नेतृत्व दलित करेल असा आशावाद आम्ही ऐकला होता; पण उद्याच्या क्रांतीचं सोडा, दलितांच्या क्रांतीचं नेतृत्वही दलितांना जमत नाही. बाबासाहेबांपासूनचा काळ जर धरला तर दलित नेतृत्त्वाचा प्रवास महाकाव्य ते चारोळी असा उतरत्या भाजणीचा झाला आहे. धर्मातर, राखीव जागा, सरकारी नोकऱ्या यांमुळे आत्मसन्मानित दलित विसाव्या शतकाच्या अखेरीस पांढरपेशा होत क्रीमीलेयरमध्ये स्थिरावलाय, गावगाडा ते चौकोनी कुटुंब असा त्यांचा प्रवास झालाय. त्यांची मुलं बहुतांश इंग्रजी माध्यमात शिकतात. ही मुलं कुठलं साहित्य वाचतात? त्यांच्या संवेदना कशाशी जुळतात? त्यांना आपल्या पालकांच्या पूर्वायुष्यात सर आहे?  
याच चळवळींच्या काळात आंतरजातीय/ धर्मीय लग्नं मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यांची मुले आज विशी-तिशीत आहेत. त्यांचे पालन-पोषण, वाढ एका विशिष्ट विचाराच्या घरात झाली असली तरी बाहेरचे वातावरण इतक्या झपाटय़ाने बदलते आहे, भौगोलिक, भौतिक, सांस्कृतिक पर्यावरणावर ‘जागतिक खेडय़ाचा’ वाढता दबाव या पिढीला स्वीकारावा लागतो आहे. त्यामुळे कॉम्रेड वडील इथे अमेरिकेच्या साम्राज्यशाही, युद्ध आणि नफेखोरीवर तावातावाने बोलत असताना, त्यांचा मुलगा वा मुलगी अमेरिकेत शिकत अथवा जगत असतात!
याच पद्धतीचा विरोधाभास हिंदू धर्मावर कठोर टीका करत, व्रतवैकल्यांची चेष्टा करत, तीर्थस्थळांना नावे ठेवत डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचा स्वीकार केलेल्या दलितांमध्ये दिसतो. बाबासाहेबांनी धर्म नव्हे तर धम्म दिला. एक तत्त्वज्ञान या अर्थाने त्याकडे पाहायला हवे. पण अलीकडे बौद्धांमध्येही व्रतवैकल्ये सुरू झालेली दिसतात. काशी, बनारसला जाणाऱ्या तीर्थयात्रेसारख्या धार्मिकतेनेच बौद्ध तीर्थयात्रा सुरू झाल्या आहेत. एक नवीच धर्मप्रणाली, नियमावली तयार होत असून बौद्ध तत्त्वज्ञानाला कर्मकांडाकडे नेणारा हा अभिनिवेश फुले- शाहू- आंबेडकरी विचारधारेला छेद देणारा तर नाही ना, याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
आम्ही इतरांच्या धर्मग्रंथांपासून, नेत्यांपासून, देवदेवता यांच्यावर अगदी शिवराळ भाषेत लिहू, बोलू पण आमच्या बाबासाहेबांना ‘ठाकरे परंपरेत’ आणून बसवणार आहोत काय?
मला याची जाणीव आहे की आजही भारताच्या लाखो खेडय़ांत दलितांचे जीवन काडीमात्र बदललेले नाही. खरलांजीसारख्या घटना घडताहेत. त्यामुळे जातींचे प्रश्न उरले नाहीत असे म्हणण्याचा भाबडेपणा मी करणार नाही.
आज बुद्धिप्रामाण्याऐवजी आंधळे, धार्मिक होण्याकडे कल वाढतो आहे. बुवा, बापू, साध्वींचे प्रस्थ वाढते आहे. महागायक, महानायक यांत महायुती अशीही भर पाडून शब्दासोबत आशयाचेही अवमूल्यन होत चालले आहे. माध्यमांना जी भाषा कळते, चालते, त्या भाषेत बोलणारे एका रात्रीत महापुरुष होतात. हा सगळा कोलाहल म्हणजे एक भोवरा आहे.
यातून सुटायचं तर नव्या समाजरचनेतील नवी वर्ग- वर्ण व्यवस्था नव्या पिढीला समजावून सांगावी लागेल.
धर्माच्या नावाने चालवलेली अस्मितेची आणि मनशांतीची नौटंकी, निव्वळ सुमार मनोरंजन आहे हे सप्रमाण दाखवावे लागेल.
अर्थनियंत्रणातून संपूर्ण मानवी जीवनावर नियंत्रण करू पाहणाऱ्या पैशाचे चलनी महत्त्व मर्यादित असल्याचे दाखवून देणे आणि विचारांचेही विनयमन होऊ शकते हे सिद्ध करणे जरुरीचे आहे.
आत्मकेंद्री होत चाललेल्या पिढीला समाजाभिमुख करायचे असेल, तर त्यांच्या माध्यमांतून आपल्याला त्यांची भाषा बोलत त्यांच्याशी संवाद साधत, आपल्या खांद्यावरचे संचित त्यांच्या खांद्यावर अलगद देता यायला हवे.
(१४, १५ व १६ डिसेंबरला पुण्यात झालेल्या तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनात संजय पवार यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश)

Story img Loader