गेल्या महिन्यात झालेल्या पालिका निवडणुका म्हणजे सामाजिक शक्ती व राजकीय सत्ता यांच्यातील हा सत्तासंघर्ष होता. मराठवाडा, कोकण व प. महाराष्ट्रात सामाजिक शक्ती भाजपविरोधी गेली, तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात राजकीय शक्ती भाजपच्या फायद्याची ठरली. याचा अर्थ दोन्ही शक्ती वेगवेगळ्या विभागांत यशस्वी झाल्या.
भाजपचे पालिका निवडणुकीवर वर्चस्व दिसले, कारण भाजपला विदर्भात सर्वात जास्त जागा आणि नगराध्यक्ष निवडून आणता आले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा फायदा दोन्ही काँग्रेस पक्षांना झाला. अन्यथा भाजपचा या प्रदेशांमध्ये दमदार शिरकाव झाला असता. हा मुद्दा निवडणुकीचे स्वरूप बदलवणारा ठरला आहे.
सत्तेचा प्रभाव
भाजपला २१.८५ टक्केमते व ३७२७ पकी ८९३ नगरसेवक निवडून आणता आले (२३.९६ टक्के). या आकडेवारीचा असा अर्थबोध होतो की, भाजपच्या नियंत्रणाखाली एकचतुर्थाश नगरसेवक आहेत. हा स्थानिक पातळीवरील भाजपचा विस्तार आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या तीन विभागांत भाजपला १९२८ पकी २५६ जागा मिळाल्या आहेत (१३.२८ टक्के). उत्तर महाराष्ट्र व विदर्भ या विभागात भाजपला १७९९ पकी ६३७ जागा मिळाल्या (३५.४१ टक्के). पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण या विभागांच्या तुलनेत भाजपची ताकद उत्तर महाराष्ट्र व विदर्भ विभागात केंद्रित झालेली दिसते. भाजपच्या नंतर काँग्रेस पक्षाने दुसऱ्या क्रमांकाच्या जागा जिंकल्या आहेत (१८.४२ टक्के). परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या जागांमध्ये ११२ जागांचा फार फरक दिसत आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसला १६.५० टक्के नगरसेवक निवडून आणता आले. म्हणजेच दोन्ही काँग्रेसची छोटय़ा शहरांमध्ये समान ताकद दिसते. शिवसेना मात्र नगरसेवक पातळीवरील ताकदीच्या संदर्भात तिसऱ्या स्थानावर आहे. भाजप-शिवसेनेचे एकत्रित ३८.१५ टक्के तर दोन्ही काँग्रेस पक्षांचे ३६.०१ टक्के नगरसेवक निवडून आले. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी एकूण ताकदीच्या संदर्भात छोटय़ा शहरांमध्ये दोन्ही काँग्रेसने सत्तांतरानंतर ताकद कमावलेली दिसते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा विभागांतून १३ व उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ विभागातून ३८ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले आहेत. हा फरक भाजपचा असंतुलित विस्ताराचा मुद्दा ठरतो.
पूर्व विदर्भातील वर्धा व चंद्रपूर जिल्ह्य़ांमध्ये निवडणूक झाली होती. या जिल्ह्य़ांमध्ये भाजपचे वर्चस्व दिसते. कारण भाजपने २५७ पकी १५७ जागा जिंकल्या आहेत (६१.०९ टक्के). भाजपेतर पक्षांच्या एकूण १०० जागा निवडून आल्या आहेत (३८.९१ टक्के). भाजप विरोधी इतर असे येथे ध्रुवीकरण झाले. शिवसेना (१३ जागा), काँग्रेस (४९ जागा) व राष्ट्रवादी काँग्रेस (१३ जागा) निवडून आल्या. आकडेवारीच्या अर्थाने भाजपेतर पक्षांची ही हद्दपारी झालेली दिसते. पूर्व विदर्भातील १० पकी ९ नगराध्यक्ष भाजपचे निवडून आले. केवळ राजुराचा एक नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाचा निवडून आला आहे. पूर्व विदर्भाप्रमाणे पश्चिम विदर्भातदेखील सर्वात जास्त जागा (२९१) व नगराध्यक्ष (१७) भाजपला जिंकता आले. भाजपची ही कामगिरी सर्वच पक्षांत तसेच पक्षाच्या इतिहासातील चांगली कामगिरी ठरते. पूर्व विदर्भात भाजपने ६१.४१ टक्के तर पश्चिम विदर्भात ३४.१५ टक्के जागा जिंकल्या. आकडेवारीतील सारांश असे सूचित करतो की, पश्चिम विदर्भाच्या तुलनेत पूर्व विदर्भात दुप्पट जागा भाजपने जिंकल्या. शिवसेनेचे मोठे नुकसान या विभागात झाले. कारण १०० जागा शिवसेनेच्या निवडून आल्या (१२.१२ टक्के). यानंतरचा दुसरा मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. कारण त्यांच्या जागा केवळ ८३ निवडून आल्या आहेत (१०.०६ टक्के). नगराध्यक्ष ३४ पकी १७ भाजपचे निवडून आले. शिवसेनेचे पाच व काँग्रेसचे सहा नगराध्यक्ष निवडून आले. पुसद येथे केवळ एक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडून आला आहे. दोन्ही विदर्भाचे चित्र एकत्रितपणे भाजपचा प्रभाव असलेले दिसते.
विदर्भाप्रमाणे उत्तर महाराष्ट्राला भाजपने सत्ता दिली. त्यामुळे या विभागात भाजप सर्वात मोठा म्हणून पुढे आला. या पक्षाला १८९ जागा जिंकता आल्या (२६.३६ टक्के). शिवसेनेला ७१७ पकी १३२ जागा जिंकता आल्या (१८.४१ टक्के). नाशिक व जळगाव जिल्ह्य़ांमध्ये शिवसेना सर्वात प्रभावी ठरली. या दोन्ही पक्षांचे ७१७ पकी ३२१ नगरसेवक निवडून आले आहेत (४४.७७ टक्के). दोन्ही काँग्रेस पक्षांना मिळून शिवसेना-भाजपच्या तुलनेत निम्म्यापेक्षा कमी जागा मिळाल्या आहेत (१९२ जागा). तिसऱ्या स्थानावर काँग्रेस पक्ष गेला आहे (१६.७४ टक्के) व चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस (१०.०४ टक्के) गेला. जळगाव व नाशिकमध्ये शिवसेना सर्वच पक्षांच्या पुढे सरकलेली दिसते. येथे मराठा मोर्चाचा लाभ शिवसेनेला मिळाला. नगराध्यक्ष भाजपचे सर्वात जास्त निवडून आले (२५ पकी ११). भाजपची नगराध्यक्ष जिंकण्याची कामगिरी शिवसेनेपेक्षा जास्त चांगली झाली आहे. शिवसेनेचे सहा नगराध्यक्ष निवडून आले. भाजप व शिवसेनेचे मिळून २५ पकी १७ नगराध्यक्ष निवडून आले. दोन्ही काँग्रेस पक्षांच्या तुलनेत भाजप व शिवसेनेची ही कामगिरी प्रभावी ठरणारी दिसते. काँग्रेसचे दोन, आघाडीचे पाच व एक अपक्ष असे केवळ आठ नगराध्यक्ष भाजप व शिवसेनेतर पक्षांमधून निवडून आले आहेत. सर्वात जास्त ढिसाळ कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेसची ठरली आहे.
सामाजिक ताकदीचा राजकीय परिणाम
सामाजिक शक्तीचा मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुकीवर विलक्षण परिणाम झाला (मोर्चा). पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप, दोन्ही काँग्रेस, शिवसेना व आघाडय़ा अशी एक प्रकारची धरसोड झाली आहे. कारण कोल्हापूर व सोलापूर या दोन जिल्ह्य़ांत सर्वात मोठे पक्ष म्हणून अनुक्रमे भाजप व शिवसेना ठरले आहेत. परंतु सत्तांतराच्या पाश्र्वभूमीवर आधारित दोन्ही काँग्रेस पक्षांची कामगिरी भाजप-शिवसेनेच्या तुलनेमध्ये चांगली झालेली दिसते. यांची दोन कारणे दिसतात- १) सांगली व सातारा जिल्ह्य़ांत सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आला आहे. २) नगरसेवक काँग्रेसचे सर्वात जास्त निवडून आले (नगरसेवक १५३). दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले आहेत (नगरसेवक १३६). तसेच आघाडय़ांमध्ये दोन्ही काँग्रेसचा संबंध दिसतो. या आकडेवारीचा अर्थ असा होतो की, ३३.८४ टक्के नगरसेवक दोन्ही काँग्रेस पक्षांचे निवडून आले आहेत. तर दोन्ही काँग्रेस पक्षांचे नगरसेवक (२८९) भाजप-शिवसेनेच्या (१७२) तुलनेत दुपटीपेक्षा जास्त निवडून आले आहेत. भाजप-शिवसेनेचे २०.१४ टक्के नगरसेवक निवडून आले आहेत. हे चित्र दोन्ही काँग्रेसचा पूर्ण पराभव दर्शविणारे दिसत नाही. मात्र भाजप-शिवसेना पक्षांनी दोन्ही काँग्रेसच्या पुढे आव्हान उभे केले आहे. नगराध्यक्ष निवडणुकीमध्येदेखील दोन्ही काँग्रेस पक्ष शिवसेना-भाजपच्या पुढे दिसतात. आघाडी व अपक्षांमध्ये भाजप-शिवसेनेच्या तुलनेत दोन्ही काँग्रेस पक्षांशी संबंधित नगराध्यक्ष जास्त निवडून आले आहेत. मराठा व मुस्लीम असे नवीन समीकरण या निवडणुकीत यशस्वी ठरले . हा फेरबदल मराठा मोर्चामुळे झाला.
मराठवाडय़ात दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व छोटय़ा शहरांवर दिसून आले. कारण त्यांचे ६०.२४ टक्के नगरसेवक निवडून आले. भाजप-शिवसेनेच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त नगरसेवक दोन्ही काँग्रेसचे निवडून आले. पक्षीय स्पध्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वरचढ ठरला, कारण या पक्षांच्या ६७९ पकी २५१ जागा निवडून आल्या (३६.९७ टक्के), तर १५८ जागा मिळवून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर राहिला (२३.२७ टक्के). सत्तांतराच्या नंतरची ही मोठी कामगिरी दोन्ही काँग्रेस पक्षांनी केलेली दिसते. सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे हे सुस्पष्ट अपयश दिसते. २८ पकी ९ नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले. त्यानंतर आठ नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले. भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी केवळ नऊ नगराध्यक्ष निवडून आले.
कोकण विभागामध्ये शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. शिवसेनेने ३९५ पकी १२९ जागा जिंकल्या (३२.६६ टक्के). भाजपच्या तुलनेत शिवसेना पक्षाला तिप्पट जागा मिळाल्या. भाजपला केवळ ५३ जागा जिंकता आल्या (१३.४२ टक्के). भाजपच्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी वरचढ ठरली. कारण दोन्ही काँग्रेस पक्षांना मिळून १३५ जागा जिंकता आल्या (३४.१० टक्के). शिवसेना व भाजपची एकत्रित ताकद मात्र दोन्ही काँग्रेसपेक्षा जास्त आहे. १६ पकी पाच नगराध्यक्ष शिवसेनेने जिंकले, तर भाजपला प्रत्येक जिल्ह्य़ात एक अशी तीन नगराध्यक्षपदे जिंकता आली. एकूण शिवसेना व भाजपने आठ नगराध्यक्षपदे जिंकली. काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी तीन नगराध्यक्षपदे जिंकली. मनसे व शेकापला प्रत्येकी एक नगराध्यक्ष जिंकता आला. दोन्ही काँग्रेसची ताकद या विभागात फार घटली नाही. दोन्ही काँग्रेस कोकण विभागात स्पध्रेत आहेत, असे स्पष्टपणे दिसते. विदर्भ व उत्तर महाराष्ट्रावर भाजपचे, मराठवाडय़ावर दोन्ही काँग्रेसचे, कोकण विभागावर शिवसेनेचे नियंत्रण दिसते. पश्चिम महाराष्ट्रात अस्पष्ट निकाल लागला आहे. दोन्ही काँग्रेस पक्षांना मराठा मोर्चाचा फायदा झाला, तर मराठाबहुल नसलेल्या भागात भाजपकडे ओबीसी सरकले. याशिवाय शेकाप, जनता दल, भारिप यांची ताकद दिसून आली. मथितार्थ, सामाजिक शक्ती व राजकीय सत्ता यांच्यामधील हा सत्तासंघर्ष होता. मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात सामाजिक शक्ती भाजपविरोधी गेलेली दिसते. तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात राजकीय शक्ती भाजपच्या फायद्याची ठरली. या अर्थी, दोन्ही शक्ती वेगवेगळ्या विभागांत यशस्वी झाल्या.
लेखक शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
ई-मेल prpawar90@gmail.com