आज मराठा आणि ओबीसी समाज भाजपमध्ये समावेशनासाठी तयार असल्याचे दिसते. हे केवळ सत्तांतरामुळेच घडते आहे की आणखी कशामुळे?
तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब या राज्यांमधून काँग्रेस सत्तेमधून बाहेर पडली. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र, हरयाणा, आसाम, केरळमधून काँग्रेस बाहेर पडली. यापकी महाराष्ट्र, हरयाणा, आसाम अशी राज्ये भाजपने जिंकली. यांचे कारण भारतात राजकीय सत्तेकडे जाण्याचे आíथक, सामाजिक व धार्मिक (आसाधा) असे तीन स्रोत आहेत. राजकीय क्रांती घडते; त्याअगोदर सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडलेली असते, असे म्हटले जाते. ‘समकालीन दशकात राजकीय हिंदुत्व क्रांती (राहिंक्रां) घडली, त्याआधी भारतात हिंदू एकसंघीकरणाची सामाजिक आणि धार्मिक क्रांती झाली होती’ असा अर्थ होतो. तसेच राहिंक्रांविरोधी सामाजिक व धार्मिक चळवळीचा ऱ्हास झाला, असा दुसरा अर्थ होतो. वर नोंदविलेल्या राज्यांत बदल आसाधा स्रोतांच्या संयोगातून घडला. त्यांची चर्चा या लेखात केली आहे.
कर्मकांडाचा राजकीय व्यवहार
काँग्रेस समकालीन दशकात सातत्याने पराभूत तसेच नाउमेददेखील होत आहे. त्याचे कारण नेतृत्व हे आहे. परंतु केवळ नेतृत्व हा वरवरचा पापुद्रा म्हणता येईल. खरे कारण नेतृत्व आणि धर्म यांचे संबंध वरवरचे उरले आहेत. याआधी नेतृत्व आणि धर्म यांचे संबंध अतूट होते. त्या नेतृत्वाला सत्तेचा स्रोत आसाधा हा आहे याचे आत्मभान होते. मात्र नेतृत्व आणि धर्म यांच्या संबंधातील सखोलपणाचा ऱ्हास झाला. आरंभीच्या काँग्रेस नेतृत्वाने धर्माशी नाते जोडले होते याची चार ठळक उदाहरणे दिसतात. (१) न्या. रानडे यांनी भागवत धर्माची सांधेजोड केली होती. (२) टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथात भगवद्गीतेतील कर्मयोगाची समीक्षा केली. (३) गांधींच्या राजकारणाचा स्रोत धार्मिक होता. (४) नेहरू परंपरागत अर्थाने धार्मिक नव्हते. मात्र त्यांनी विविधतेत एकतेचे सूत्र मान्य करण्यामुळे ते धर्माचे बलस्थान जाणून होते. हे नेते सतत धार्मिक व्यवहार करत होते, असे दिसते. तसेच िहदू धार्मिक सुधारणा करण्याचा प्रयत्न करत होते. या उदाहरणानंतर काँग्रेस व धर्माचा संबंध केवळ राजकीय समीकरणे मांडण्यापुरता शिल्लक राहिला. काँग्रेसमध्ये आजही नेते धार्मिक आहेत; परंतु ते कर्मकांडापुरते मर्यादित झाले. त्यांचा समाजाच्या धार्मिक श्रद्धांशी असलेला संबंध तुटला. नेहरूंनंतर तुलनात्मक आणि समतोल धार्मिक आकलन असलेले नेतृत्व विरळ झाले. केवळ नेतृत्व आधुनिक असण्यामध्ये सत्तेचा स्रोत नाही. तसेच गरिबीविरोधी कार्यक्रम सत्तेचा स्रोत ठरत नाही. त्याची सांधेजोड खऱ्या धार्मिक श्रद्धांशी केली गेली नाही. या कारणामुळे बहुमताचे समीकरण साध्य करण्यासाठी गरजेपुरती धार्मिक ओळख हा बनाव ठरू लागला. परिणामी, धर्मप्रवण व्यक्तींना हा खोडसाळपणा, अपमान किंवा बदनामी वाटत होती. थोडक्यात केवळ गरिबांचे वा श्रीमंतांचे समर्थन करण्यातून सत्तेचा रस्ता तयार होत नाही. सततच्या धार्मिक व्यवहारांशी त्यांचा संबंध जोडावा लागतो. शिवाय त्यामध्ये पुनर्रचना असावी लागते. या गोष्टी सत्तरीच्या दशकापासून काँग्रेसने केल्या नाहीत. म्हणून पोकळी तयार झाली. त्यामुळे काँग्रेस आणि धर्म यांचा सांधा निखळत गेला. त्या पोकळीत भाजपने शिरकाव केला.
सामाजिक-धार्मिक संबंधात दुरावा
काँग्रेस आणि समाज यांचे संबंध धर्माप्रमाणे वेगवेगळे होत गेले. काँग्रेसच्या आरंभीच्या काळात राजकीय सुधारणा आणि सामाजिक सुधारणा यांचा एकत्रित विचार होत होता. सामाजिक परिषद हे याचे उदाहरण. विसाव्या शतकाच्या आरंभी या दोन गोष्टी वेगवेगळ्या झाल्या. तरीही काँग्रेसशी संबंधित एक गट सामाजिक क्षेत्राशी जुळलेला होता (गोपाळ कृष्ण गोखले, वि. रा. िशदे). काँग्रेसच्या बाहेर धार्मिक सुधारणा आणि सामाजिक सुधारणा चळवळी सुरू होत्या (प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, ब्राह्मणेतर चळवळ, दलित चळवळ). यांचा थेट लाभ काँग्रेसला मिळत गेला. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात गांधींनी काँग्रेसचा संबंध सामाजिक घटकांशी सुस्पष्ट जोडला. गांधींनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम राबविला. तसेच िहदू-मुस्लीम सुसंवादाचा पुरस्कार केला. समाजात भांडणतंटय़ांचा अभाव असेल अशी दूरदृष्टी ठेवली होती. ही काँग्रेसची भूमिका नेहरू काळात राहिली. तसेच नेहरूंनी सत्तेमध्ये सामाजिक घटकांचे समावेशन केले. सार्वजनिक धोरणात त्याप्रमाणे फेरबदल केले. तरीही नेहरूंच्या काळापासून ओबीसी काँग्रेसविरोधी गेले (कर्पुरी ठाकूर, लोहिया). नेहरूंनंतरच्या काळात काँग्रेसचे सामाजिक संबंध तुटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आणि समाज यांच्यातील संबंध केवळ राजकीय वळण घेऊ लागले. त्यामुळे काँग्रेस आणि समाज यांच्यात सततचा व्यवहार होत नव्हता. दलित, ओबीसी, शीख, तमीळ यांच्यामध्ये काँग्रेसविरोध वाढत गेला. याचे कारण काँग्रेसच्या नेतृत्वाच्या आसाधा आत्मभानाचा अंत झाला होता. या पोकळीमध्ये काँग्रेसेतर पक्षांचे नेतृत्व आसाधाशी सांधेजोड करत होते. त्यामधून राहिंक्रां घडण्यासाठी सामाजिक आणि धार्मिक क्रांतीसदृश परिस्थिती घडत गेली.
सामंजस्याच्या स्रोताचा अभाव
काही राजे व काँग्रेसच्या लोककारणात धर्मनिरपेक्षतेपेक्षा धार्मिक सामंजस्य हा मुद्दा जास्त महत्त्वाचा होता. मात्र साठीच्या उत्तरार्धापासून िहदू-अल्पसंख्याक समूहातील संबंध निवडणुकीच्या संदर्भात केवळ धर्मनिरपेक्ष चौकटीमध्ये काँग्रेस नेतृत्व मांडत गेले. मात्र समाजातील वस्तुस्थितीचे प्रतिबिंब धर्मनिरपेक्षतेमध्ये पडले नाही, कारण धर्मनिरपेक्षतेपेक्षा वेगळे संबंध हिंदू-मुस्लीम यांचे आहेत (धार्मिक सामंजस्य). याची काही उदाहरणे : (१) टिपू सुलतान श्रीरंगपट्टमच्या मशीद आणि मंदिरात जात असे. आरतीचा मान हिंदू लोक या सुलतानाला देत होते. (२) सांगली जिल्हय़ातील कडेगाव येथे मोहरममधील ताबूतांमध्ये हिंदूंचा सहभाग असतो. (३) सोलापूर जिल्हय़ातील महूद येथे मशिदीभोवती हिंदूंच्या जमिनी आहेत. तेथेही मोहरमच्या ताबूतांमध्ये हिंदूंचा सहभाग असतो.(४) कोल्हापूर शहरातील दर्गाच्या सुरुवातीस गणपतीची प्रतिमा आहे. हे संबंध शाहू महाराजांनी घडवलेले आहेत. (५) गुजरातमधील बडोदे येथील सयाजीराव गायकवाड यांच्या राजवाडय़ाच्या मनोऱ्याच्या रचनेत हिंदू, मुस्लीम आणि ख्रिस्ती अशी तीन प्रतीके स्पष्ट दिसतात. या उदाहरणाचा अर्थ धार्मिक सामंजस्याचा आहे. या चौकटीत गांधी-नेहरूंनी काँग्रेस व धर्म यांची सांधेजोड केली होती. हा धागा हिंदू-मुस्लीम यांना जोडणारा होता. याचे विस्तृत आत्मभान सत्तरीच्या दशकापासून कमी कमी होत गेले. या कारणामुळे पोकळी तयार झाली. तो अवकाश भाजपने व्यापला, असे दिसते.
हिंदू चौकटीतील आसाधा
संघपरिवारात धार्मिक कार्यक्रम हा आरंभीपासून होत होता (१९२५). परंतु काँग्रेसने सातत्यपूर्ण धार्मिक व्यवहार करण्यामुळे संघपरिवाराला पोकळी उपलब्ध नव्हती. ती पोकळी साठीच्या दशकाच्या उत्तरार्धानंतर वाढत गेली, तसतशी भाजप संघटना ती पोकळी भरत गेली. विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता मंच, वनवासी कल्याण आश्रम अशा संघपरिवारातील संघटनांनी पोकळी भरून काढली. त्यानंतर धार्मिक व आरोग्य या दोन क्षेत्रांचे संबंध जोडत विविध बाबांनी त्या पोकळीत शिरकाव केला. काँग्रेसशी संबंधित नेतृत्व अशा बाबांशी सांधेजोड करत होते. त्यामुळे काँग्रेसच्या अंतर्गत काँग्रेसविरोधी व भाजप समर्थक एक वर्ग तयार झाला. काँग्रेसमधील अनेक नेते धार्मिक बाबांशी संबंधित होते. मात्र हिंदुत्वापेक्षा ते वेगळे कसे आहेत, ही भूमिका हे नेते मांडू शकले नाहीत. काँग्रेसच्या नेतृत्वाला िहदूची नवीन व्याख्या सांगता आली नाही. त्यामुळे संघपरिवाराची उपलब्ध िहदूची व्याख्या त्यांनी मूक पद्धतीने प्रमाण मानली, असा अर्थ होत गेला. संघपरिवाराने विविध धार्मिक समूहांशी राजकीय गरज म्हणून जुळवून घेतले. उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात बौद्ध लोकसंख्या २०६२८५ आहे (पकी दलित बौद्ध १३७२६७). यांचे संघटन करण्यासाठी सारनाथ येथे राजनाथ सिंह यांनी धम्म चेतना यात्रेला झेंडा दाखवून रवाना केले. भारिपच्या रामदास आठवलेंनीही समता रथयात्रा काढली होती. याचा अर्थ लालकृष्ण अडवाणींच्या कार्यक्रमांशी सुसंगत कार्यक्रम बौद्ध धार्मिक समूहातून राबविले जात आहेत. यामुळे भाजप आणि बौद्ध यांच्यामध्ये दैनंदिन व्यवहार होत आहे. याखेरीज महाराष्ट्रात भाजप व शिवधार्मिक नेते यांच्यात एकमेकांशी जुळवून घेण्याची प्रक्रिया घडत आहे (२०१४-१६). तसेच मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडणारे विनायक मेटे (बीड) व संभाजी राजे (कोल्हापूर) यांचे भाजपने समावेशन केले. थोडक्यात मराठा समाजात िहदुत्वाची स्वीकारार्हता वाढली. हे चित्र अभिजनाच्या पातळीवरील आहे. तसेच मास बेस पातळीवर विविध प्रकारच्या धार्मिक बठकांमधून वस्ती, वाडी, खेडे अशा पातळीवर शेतमजूर, छोटे शेतकरी, महिला यांनीदेखील संघपरिवारातील दैनंदिन कार्यक्रमांशी महाराष्ट्रात जुळवून घेतले. भटके विमुक्त परिषद, सामाजिक समरसता मंच या संघटनांशी नव्वदीच्या दशकापासून ओबीसीचे संबंध सातत्याने येत गेले. बिहारमध्ये ओबीसींची मागास व अतिमागास अशी वर्गवारी करण्यास भाजपचाही पािठबा होता. सध्या उत्तर प्रदेशात भाजप ओबीसींतर्गत मागास व अतिमागास अशी वर्गवारी करण्याच्या विचारात आहे. याचा अर्थ भाजपचा ओबीसी समूहांशी सातत्याने व्यवहार होत आहे.
या तपशिलाच्या आधारे असा निष्कर्ष काढता येतो की, रािहक्रांच्या आधी भारतात हिंदू धार्मिक व सामाजिक क्रांती घडली आहे. त्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या सत्तेचा हमरस्ता तयार झाला. शेवटी असे म्हणता येते की, ही प्रक्रिया दोन-तीन वर्षांत घडली नाही. ही प्रक्रिया घडण्यास काँग्रेसने चार दशकांचा अवकाश उपलब्ध करून दिला होता. तसेच या प्रक्रियेत आरंभी नोंदविलेल्या आसाधा स्रोतामधून रािहक्रां घडण्यास ताकद मिळत गेली. म्हणून पाच वर्षांनी घडणाऱ्या सत्तांतरासारखा हा बदल नाही. हा बदल राजकीय संस्कृती व राजवटीमधील आहे. त्यांची व्याप्ती आसाधाशी संबंधित दिसते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा