‘चापलुसांच्या देशा’ (२१ नोव्हें.) या अग्रलेखातून महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा समर्पक शब्दात चितारल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद नि आभार. फेसबुकवर आपले मत प्रदर्शित करणाऱ्या दोन मुलींना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्याची पोलिसांची कारवाई अत्यंत अनुचित आणि अन्यायकारक आहे. जगातले सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारतीयांसाठी ही घटना खूपच दुर्दैवी आहे.
कोणाही राजकीय नेत्याच्या मृत्यूनंतर शहरात बंद पाळला जाऊ नये. लोकांनी आदरापोटी नव्हे तर भीतीपोटी दुकाने बंद ठेवली होती. बळाच्या जोरावर आदर मिळवता येत नाही तो प्राप्त करावा लागतो, अशा आशयाचे मत शाहीन नावाच्या मुलीने फेसबुकवर मांडले, यात आक्षेपार्ह ते काय? या मताशी शिवसेना असहमती दर्शवू शकते पण ताकदीच्या जोरावर कोणाच्याही अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करू शकत नाही. ज्या संविधानामुळे आणि लोकशाही प्रणालीमुळे शिवसेना आपले म्हणणे लोकांसमोर मांडत असते त्याच न्यायाने शाहीनलाही आपले मत मांडण्याचा संपूर्ण अधिकार आहे. शाहीनने जे मत फेसबुकवर व्यक्त केले आहे ते वास्तविक पाहता, एका मोठय़ा जनसमूहाचे एरवी खासगीत व्यक्त केले जाणारे मत आहे. पोलिसांनी विशीतल्या मुलीच्या टिप्पणीने घाबरून जात तिच्याविरोधात कायद्याच्या दुरुपयोगाचा गुन्हा दाखल करणे ही गोष्ट पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या प्रतिगामी मानसिकतेचेच द्योतक होय. पोलीसांची ही कृती निषेधार्ह आहे. पोलिसांनी ही कारवाई कोणाच्या दबावाखाली केली याचा शोध घेऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करायला हवे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्र पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग केला हे सांगणे म्हणजे राज्याच्या गृहखात्याची नाचक्की होय. आर. आर. पाटलांचा आपल्या गृहखात्यावर वचक नाही हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुलीच्या नातेवाईकांच्या हॉस्पिटल वर हल्ला करण्याची शिवसनिकांची कृतीही निषेधार्ह आहे. शिवसेना आणि तत्सम संघटनांनी आता वैचारिकदृष्टय़ा अधिक समंजस आणि सहनशील होण्याची गरज आहे. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्यायमूर्ती काटजू यांनी या बाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले हे बरेच झाले. आपल्या विरोधी मताचा आदर करणे आणी त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखले जाईल याची काळजी घेणे सुदृढ निकोप लोकशाहीसाठी अनिवार्य आहे. सडेतोड आणि थेट शब्दात मत मांडल्याबद्दल अभिनंदन!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा