कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारावे!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना नेते प्रिं. मनोहर जोशी (व इतर) यांनी बाळासाहेबांचे शिवतीर्थावरच स्मारक व्हावे अशी आग्रही मागणी केलीय.
प्रिं. जोशी यांनी याच भागातून नगरसेवक, आमदार, खासदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे ‘दादरकर’ किंवा ‘शिवाजी पार्क’ परिसरात राहणाऱ्या ‘जनतेचं’ मत त्यांना माहीत असावं. कदाचित बाळासाहेब आणि शिवतीर्थ, बाळासाहेब आणि दादर, मराठी माणूस या ऋणानुबंधासाठी पार्काची अथवा क्रीडांगणाची थोडीशी जागा गेली तर ते खळखळ करणार नाहीत.
शिवतीर्थावर ‘अपवादात्मक’ परिस्थितीचा विचार करून सरकारने बाळासाहेबांच्या ‘अंत्यसंस्कारास’ परवानगी दिली. परंतु स्मारकास परवानगी देताना दहा अडथळे येऊ शकतात म्हणून काहींनी ‘इंदू मिल’च्या जागेचा ‘अर्धा’ पर्याय सुचवलाय! कदाचित त्यामागे सध्याच्या शिवशक्ती- भीमशक्ती महायुतीचा दृष्टिकोन असावा आणि बाबासाहेबांच्या भेटीला बाळासाहेब अशी भावनिक किनारही असावी! पण एक झालं, इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी द्या, या मागणीला, ‘स्मारक उभारून काय करणार? विचार पुढे न्या’ असं सांगणाऱ्यांनाच आता ‘स्मारकाची’ गरज भासू लागलीय. त्यामुळे आता इंदू मिलची ‘वाटणी’ करण्याचा प्रस्ताव पुढे येईल.
शिवतीर्थावरील कायदेशीर अडचणी आणि इंदू मिलवर शिवसैनिकांआधी भीमसैनिकांनी दाखवलेला हक्क यांतून बाळासाहेबांचे स्मारक वादविवादात रेंगाळणार, यावर पर्याय म्हणून, सेनाभवन समोरील कोहिनूर मिलच्या जागेत बाळासाहेबांचे स्मारक उभारले तर अनेक प्रश्न सुटतील आणि साहेबांचे स्मारक कुठल्याही वादविवादाविना उभे राहील. कारण कोहिनूर मिलची जागा सध्या प्रिं. मनोहर जोशी यांच्या मुलाच्या ताब्यात आहे. त्यामुळे जागेवरून ‘वाद’ होणार नाही. जागा दादरमध्येच, सेनाभवनाच्या समोर आणि शिवतीर्थाच्याही जवळच आहे!
यामुळे शिवाजी पार्कमधील ‘पार्क’, क्रीडांगण यांचा ‘संकोच’ होणार नाही आणि इंदू मिलमध्ये वाटण्या कराव्या लागणार नाहीत!
प्रिं. मनोहर जोशी आजवर कायम बाळासाहेबांचे ऋ ण मानत आलेत. ते म्हणतात, ‘माझ्यासारख्या वारावर जेवणाऱ्या माणसाला बाळासाहेबांनी नगरसेवक, आमदार, विरोधी पक्ष नेता, मुख्यमंत्री, लोकसभा अध्यक्ष केलं.’ परवाच एका वृत्तवाहिनीवर त्यांनी अलीकडेच ते बाळासाहेबांना उपराष्ट्रपतीपदासाठी माझा विचार करा म्हणून भेटायला गेल्याचेही सांगितले. याचा अर्थ १९६७ पासून २०१२ पर्यंत मनोहरपंतांनी बाळासाहेबांकडे मागितले, अथवा बाळासाहेबांनीच त्यांना दिले. इतकं भरभरून देणाऱ्या लोकोत्तर नेत्यासाठी आपल्या खासगी मालकीतली थोडीशी जागा देऊन, मनोहरपंतांनी बाळासाहेबांना मरणोत्तर काही तरी ‘द्यावे’ आणि बाळासाहेबांना उचित आदरांजली वाहावी. ज्यामुळे बाळासाहेबांचे उत्तुंग स्मारक दादरमध्येच शिवतीर्थाजवळ, सेनाभवन समोरच उभे राहील.
– संजय पवार, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा