नुकतेच असे वाचनात आले की, मुंबईतील हाजीअली दग्र्यात मुस्लीम महिलांना आंतरभागात जाऊन दर्शन घेण्यास तिथल्या प्रमुखांकडून मनाई करण्यात आली. त्याचा निषेध म्हणून भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या महिला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे वक्फमंत्री नदिम यांच्याकडे सदर प्रवेशबंदीबाबत तक्रार केली असता त्यांनी सरकार यात काही दखल देणार नाही. तिथे महिलांना जाऊ न देण्याचा अधिकार धर्मगुरूंचा आहे, असे सांगितल्याचेही वाचनात आले. स्त्री-पुरुष समानतेच्या या काळात महिलांचा धार्मिक अधिकार नाकारण्याचा हा प्रकार निंदनीयच नव्हे तर आधुनिक लोकशाही मूल्यांचा अधिकार मान्य करणाऱ्या भारतासारख्या देशात मुस्लीम महिला आजही किती दयनीय अवस्थेत जगते आहे याचा पुरावा आहे. मुस्लीम महिलांना दग्र्यात जाण्यास मज्जाव करणारे धर्मगुरू व त्यास अप्रत्यक्ष पाठिंबा देणाऱ्या वक्फमंत्र्यांचा निषेध करावा तितका थोडाच.
सगळे जग स्त्री-पुरुष समानतेसाठी प्रयत्नशील असताना व राज्यात महिलांना ३३ टक्के जागा राखीव असण्याच्या काळात मुस्लीम महिलांना धार्मिक हक्कापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे, याची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन वक्फमंत्र्यांना व हाजीअली दग्र्याच्या प्रमुखांना जाब विचारला पाहिजे आणि त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली पाहिजे. मुस्लीम महिलांनीही आता संघटित होऊन या विरोधात आंदोलन उभारले पाहिजे.
अन्यथा हाजीअली दग्र्यापाठोपाठ जेथे अजून मुस्लीम महिलांना प्रवेश आहे, तेथपर्यंत हे लोण पोहोचणार नाही याची दखल घेऊन आपले अधिकार अबाधित ठेवण्यासाठी मुस्लिम महिलांनी संघर्षांस तयार राहिले पाहिजे. इस्लाममध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार आहेत, असे म्हणणाऱ्यांची तोंडे का बंद आहेत? ते या विरोधात का बोलत नाहीत? याचेही आश्चर्य वाटते.
अॅड. यास्मिन शेख, पुणे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा