मुख्यमंत्री अजून विचार करताहेत!
बिल्डर व डेव्हलपर यांच्यावर लावलेला दिनांक २० जून २००६ ते ३१ मार्च २०१० या काळातील पाच टक्के ‘व्हॅट’चा दर कमी करण्याचा मुख्यमंत्री विचार करत आहेत ही बातमी वाचली. दुर्दैवाची गोष्ट अशी की, ‘व्हॅट’ भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी संपली आहे. वृत्तपत्रांमधून कितीही लिहून आले तरी बिल्डर हा ‘व्हॅट’ ग्राहकांकडून वसूल करणार यात शंका नाही आणि एवढय़ा दिवसांपासून हे प्रकरण चालले असताना मुख्यमंत्री अद्याप केवळ विचार करीत आहेत याची खंत वाटते. बहुतेक बांधकाम व्यावसायिकांनी ‘व्हॅट’
३१ ऑक्टोबर रोजी भरलादेखील असेल. आता त्यानंतर विचार करून मुख्यमंत्री काय साध्य करणार आहेत?
आज सर्वसामान्य माणूस कराच्या ओझ्याखाली दबून गेला आहे. जागांचे भाव गगनाला भिडले आहेत. आज जागा खरेदी करायला गेल्यावर सामान्य माणसाला एक टक्का ‘व्हॅट’, ३.०९ टक्के सेवा कर, ‘स्टॅम्प डय़ुटी’, एक टक्का नोंदणी फी मिळून जवळपास १० टक्क्यांहून अधिक रक्कम वाढीव भरावी लागते. वाढत्या महागाईत घराच्या किमतीच्या दहा टक्के ही रक्कम खूप महत्त्वाची आहे याची सरकारला जाणीव नाही का?
किरण दामले, कुर्ला (प.)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा