द इन्स्टिटय़ूट ऑफ डायरेक्टर्स, नवी दिल्ली या संस्थेने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीला दिलेला २०१४ चा सुशासनातील उत्कृष्ट गुणवत्तेचा ‘गोल्डन पीकॉक’ पुरस्कार काढून घ्यावा. याचे कारण असे की केरळ राज्य सरकारने राज्याच्या राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनेसाठी विमा सेवा पुरवण्याबाबत मागवलेल्या निविदेच्या प्रक्रियेत अन्य सरकारी कंपन्यांसमवेत संगनमताने एकत्र येऊन लुच्चेगिरी व फसवेगिरीने प्रक्रिया नियंत्रित करून आपला फायदा केल्याबद्दल भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने तिला दोषी ठरवून सर्वात जास्त म्हणजे २५१ कोटी सात लाख रुपये असा घसघशीत दंड ठोठावला आहे. आयोगाच्या तपासात कंपनीने आयोगाची दिशाभूल केल्याचा ठपका आयोगाने ठेवला असून अनेक वष्रे निविदा कंत्राटातून बाहेर पडून राज्य सरकारला पुन:पुन्हा निविदा मागवावयास भाग पाडण्याच्या अन्य कंपन्यांच्या कृतीस या कंपनीने साथ दिली असून ही राज्य सरकारची फसवणूक असल्याचे गंभीर निरीक्षणही आयोगाने आपल्या निकालपत्रात नोंदवले आहे. (लोकसत्ता दिनांक १७ जुल २०१५)
ही कंपनी घटनेच्या अनुच्छेद १२ प्रमाणे ‘शासन’ या संज्ञेच्या व्याखेत येते. या पुरस्काराचा कालावधी अजूनही संपलेला नाही. आपले ग्राहक व अन्य संबंधितांना कंपनीने मिळवलेल्या या अत्युच्च मानाची माहिती व्हावी यासाठी कंपनी आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी काढत असलेल्या सर्व छापील साहित्यावर ‘गोल्डन पीकॉक’ पुरस्काराची नाममुद्रा छापण्याची मुभा पुरस्काराच्या वर्षांपुढील संपूर्ण एक वर्ष असते. कंपनीच्या कृत्यामुळे पुरस्काराच्या प्रतिष्ठेस व देशाच्या इभ्रतीस धोका पोहोचून झालेले नुकसान काही अंशी भरून काढण्यासाठी हा पुरस्कार परत घेणे आवश्यक आहे.
अॅड. विजय त्र्यंबक गोखले, डोंबिवली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा