‘डिस्काऊंट’चे नुकसान कोण सहन करते?
दिवाळीच्या दिवसांत विविध ‘डिस्काऊंट’ ऑफर बाजारात झळकतात. कुठलाही व्यापारी ‘ग्राहकहितासाठी’ आपले नुकसान करून माल विकणार नाही हे साधे सूत्र. या सूत्रावर मात करण्यासाठी वाढीव ‘एमआरपी’चा जाणीवपूर्वक वापर केलेला दिसतो. उदाहरणच घ्यावयाचे झाले तर फॉच्र्युन सनफ्लॉवर १५ लिटर तेलाची ‘एमआरपी’ रु. १८०५ तर डीमार्ट विक्री किंमत रु. १२७५, सनडे सनफ्लॉवर एमआरपी १२५ तर विक्री किंमत रु. ८६. .. हे झाले वानगीदाखल उदाहरण. कपडय़ांच्या एमआरपीवर (* अप-टू) ५० टक्के सूट किंवा आजची स्पेशल सवलत ४२ हजारांचा टीव्ही फक्त ३६९९९ रु. यासम अनेक फसव्या ‘ऑफर’ आज बाजारात दिसतात.
एमआरपी म्हणजे कमाल विक्री किंमत. परंतु किरकोळ व्यापारी याचा सरळ अर्थ असा घेतात की, ती वस्तू त्याच किमतीत विकावयाची. तेलाची पिशवी ग्रामीण भागात वा शहरातील किरकोळ दुकानात छापील एमआरपी किमतीतच विकतात. या प्रकारांमुळे शहरांपेक्षा खेडी अधिक महाग झाली आहेत आणि त्यात गरीब भरडला जात आहे.
वाढीव एमआरपीच्या नावाखाली अर्निबध नफेखोरी होते आहे. बिग बझार, डी मार्ट यांसारखी मोठी दुकाने मोठय़ा प्रमाणात माल खरेदी करतात. म्हणून त्यांना कमी किमतीत माल मिळत असेल म्हणून रु. १८०५चा तेलाचा बुधला ते रु. १२७५ला विकू शकतात ही किरकोळ दुकानदारांची सबब मान्य केली तर एक प्रश्न निर्माण होतो. जर मोठी दुकाने एखादी वस्तू रु. १२७५ला विकत असतील तर त्यामध्ये त्यांचा नफा समाविष्ट असणार. वातानुकूलन यंत्रणा, भरपूर स्टाफ, संगणकाचा वापर होत असल्यामुळे प्रत्येक विक्री केलेल्या वस्तूची नोंद होत असल्यामुळे भरावा लागणारा कर (थोडक्यात सर्व इमानदारीत व्यवसाय करूनही) यामुळे किमान १० ते १५ टक्के नफा घेऊनच विक्री करत असतील हे गृहीत धरल्यास मुद्दा हा उपस्थित होतो की, याची मूळ किंमत साधारण रु. एक हजार ते रु. ११०० असणार. मग तीच वस्तू जेव्हा इतर ठिकाणी एमआरपी किमतीत विकली जाते तेव्हा नाफेखोरीचे प्रमाण किती?
आजकालचे ग्राहक सजग आहेत, असे नेहमी म्हटले जाते; पण प्रत्यक्षात त्याचे प्रतििबब बाजारात उमटताना दिसत नाही. अन्यथा मिठाईच्या दरातच ४०/५० ग्रॅमचा बॉक्स निमूटपणे घेतला नसता. सोन्या-चांदीची विक्री करताना १० टक्के केली जाणारी घट निमूटपणे सहन करणारे ग्राहक ‘सजगतेच्या’ कोणत्या संज्ञेत बसतात? ‘एकावर तीन फ्री’ योजनेत एका वस्तूच्या किमतीत तीन वस्तू फुकट मिळविल्याचा आनंद मानणारे ग्राहक खऱ्या अर्थाने ‘सुशिक्षित’ म्हणावयाचे का? ग्राहकहितासाठी एफडीआयची भलामण करणारे आणि तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी अश्रू ढाळणारे या दोघांनीही ‘स्वदेशी व्यवस्था आणि किरकोळ लूट’ यावरही विचार करावा.
– सुधीर ल. दाणी, बेलापूर, नवी मुंबई.
‘डिस्काऊंट’चे नुकसान कोण सहन करते?
'डिस्काऊंट'चे नुकसान कोण सहन करते?दिवाळीच्या दिवसांत विविध 'डिस्काऊंट' ऑफर बाजारात झळकतात. कुठलाही व्यापारी 'ग्राहकहितासाठी' आपले नुकसान करून माल विकणार नाही हे साधे सूत्र. या सूत्रावर मात करण्यासाठी वाढीव 'एमआरपी'चा जाणीवपूर्वक वापर केलेला दिसतो. उदाहरणच घ्यावयाचे झाले तर फॉच्र्युन सनफ्लॉवर १५ …
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-11-2012 at 11:52 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokmanas letter to editor emails to editor