‘सूरक्षेत्र’ वरील आशाताई व राज ठाकरे यांच्यातील वादाच्या मुद्दय़ावरून आपण काही शिकणे आवश्यक वाटते. पाकिस्तानकडे आपण जोपर्यंत ‘शत्रुराष्ट्र’ म्हणून पाहत आहोत; तोपर्यंत आपण शत्रुत्वाचे जीवन जगत आहोत. अशा जगण्यातून दहशतवाद, घातपात, हिंसक कारवाया घडवून आणण्यास आपणच प्रोत्साहन देत आहोत. सर्व ‘शेजारी’ राष्ट्रांसमवेत पाकिस्तानलाही आपण मानवतेच्या दृष्टीने पाहिल्याशिवाय आपल्याला शांतता मिळणे शक्य नाही. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची दृष्टी ही सच्च्या कलावंताची, म्हणूनच निखळ प्रेमाची आहे. त्यांचे राजवर जितके प्रेम आहे, तितकेच पाकिस्तानी कलावंत, खेळाडू व जगातील सर्व रसिकांवर आहे. प्रेमानेच प्रेम वाढत राहते, शत्रुत्वाने नाही; परकेपणाने नाही; दुराग्रह ठेवल्याने नाही. संगीताने माणसे जोडली जातात. राष्ट्रा-राष्ट्रांतील सीमारेषा तोडून अखिल मानवजात एक करण्याचे अमूल्य कार्य आजवर आशाताईंसारख्या कलावंतांनी केले आहे, म्हणून आज आपण आनंदी जीवन जगू शकतो हे लक्षात घ्यायला हवे. राष्ट्रांच्या सीमारेषा आपल्या मनात आहेत. आपल्या स्वार्थप्रेरित शिक्षणातून त्या आपल्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. म्हणून आज आपल्याच देशापुरता, प्रांतापुरता, कुटुंबापुरता संकुचित विचार करण्यातून आपण माणसांना दूर लोटत आहोत. मानवतेचे जीवन जगण्याची संधी आपण चुकवत आहोत. अवघ्या जगावर अखंड प्रेमवर्षांव करणाऱ्या आशाताईंच्या कोमल कंठातील निरागसता जेव्हा आपली मने टिपून घेतील, तेव्हाच या जगात मानवतेचे ‘आशा-राज’ नांदेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा