८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या झालेल्या विजयाला विध्वंसक झुंडशाहीची किनार आहे (लोकमानस – ५ नोव्हें.) असे मुंबई येथील अनघा गोखले यांचे प्रतिपादन मनाला न पटणारे व समस्त वाचकांची दिशाभूल करणारे आहे. कुठल्या तरी संघटनेच्या दबावाला बळी पडून मतदान करणारे मतदार इतके दुबळे असतील असे वाटत नाही. साहित्य क्षेत्रातील मतदार स्वतंत्र विचारांचा असतो. तात्कालिक घटनांचा त्याच्यावर फारसा प्रभाव पडत नाही. तसे असते तर डॉ. कोत्तापल्ले (५८४-१६४ = ४२०) इतक्या मोठय़ा मताधिक्याने निवडूनच आले नसते. अर्थात यामुळे ह. मो. मराठे यांची उंची कमी होत नाही. त्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व वादातीत आहे. त्यांच्यासाठी ही वेळ वाईट होती; बस इतकेच. त्यांच्या कथित आक्षेपार्ह विधानांबद्दल काही संघटनांनी विरोध केला होता, अनघाताईंच्या भाषेत धमकी दिली होती. म्हणून ही संपूर्ण निवडणूकच दहशतीच्या सावटाखाली झाली आणि सगळे मतदार भयभीत झाले, असे मानणे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे.
हा महाराष्ट्र आहे; बिहार किंवा आसाम नव्हे. या निवडणुकीचा मतदार स्वतंत्र प्रज्ञेचा प्रज्ञावंत आहे. तो कुणाच्याही धमकीला भीक घालणारा नाही. आपल्या महाराष्ट्रात अजून लोकशाही आहे. जनमताचा आदर राखत लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या शांत, समन्वयी, निगर्वी व अजातशत्रू अशा डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा स्वीकार करणे हे आपले सांस्कृतिक कर्तव्यच आहे.
शिवाय डॉ. कोत्तापल्ले हे केवळ विद्वान समीक्षक – संशोधकच नव्हे, तर अभिजात लेखकही आहेत. कथा, कादंबरी व काव्य या माध्यमातून त्यांनी साठोत्तर काळात सर्जनशील लेखन केलेले आहे. अनघा गोखले यांची ठसठसणारी वेदना न समजण्याइतपत मराठी साहित्य रसिक इतका दुधखुळा नाही. विद्वान, समीक्षक, प्राध्यापक असणारी व्यक्ती तेवढय़ा आत्मीयतेने रसिक स्वीकारत नाहीत, हे अनघाताईंचे विचार तर्काच्या कोणत्याच कसोटीवर उतरत नाहीत. मराठी रसिक बहुश्रुत आहे. विचारवंतांचे त्याला वावडे नाही. भूतकाळात अशा अनेक विद्वानांचे याच अध्यक्षपदावर मनापासून स्वागत झालेले आहे. चतुरस्र मराठी रसिकांचा साहित्य क्षेत्रावर चांगला दबदबा आहे. लेखक, समीक्षक, संशोधक अशी व्यक्ती साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असेल तर संपूर्ण राज्याला एक वैचारिक दिशा मिळते. डॉ. कोत्तापल्ले या अपेक्षापूर्तीसाठी नक्की पात्र आहेत असे मला वाटते.
– प्रा. डॉ. आनंदा गांगुर्डे, विद्या प्रतिष्ठान, बारामती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा