‘इतिहासात आज दिनांक’ या सदरात ५ नोव्हेंबरच्या रंगभूमी दिनाचे महत्त्व सांगण्यासाठी ‘१८४३ : विष्णुदास भावे यांनी सीतास्वयंवर नाटकाचा पहिला प्रयोग सांगलीच्या दरबारात केला’ असा चुकीचा उल्लेख आला आहे. वास्तविक, भावे यांनी त्या वर्षी हा प्रयोग कधी केला, याची तारीख संशोधकांनाही उपलब्ध झालेली नाही. रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरच का? केव्हापासून? त्याचे ज्ञात उत्तर असे :
१९४३ मध्ये सांगली येथे मराठी नाटकाचा शतसांवत्सरिक उत्सव व नाटय़संमेलन भरले. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन संस्थानिक श्रीमंत अप्पासाहेब पटवर्धन (चिंतामणरावांचे नातू, यांचेही नाव हिज हायनेस चिंतामणराव) यांनी ‘नाटय़ विद्यामंदिर’ स्थापन करण्यासाठी गावातील मध्यवर्ती जागा दिली व तेथील इमारतीचा कोनशिला समारंभ पाच नोव्हेंबर १९४३ रोजी झाला. सध्या या जागी ‘विष्णुदास भावे नाटय़गृह’ आणि ‘अखिल भारतीय नाटय़ विद्यामंदिर समिती’चे कार्यालय आहे. नाटय़ महोत्सवातील हा महत्त्वाचा दिवस, त्यामुळे दरवर्षी नटराजपूजन करून ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन पाळला जावा, असा ठराव केला गेला. ५ नोव्हेंबर १९४३ पासूनच हा ‘रंगभूमी दिन’ पाळला जातो. अ. भा. मराठी नाटय़ विद्यामंदिर समितीच्या १९६०च्या अहवालात याचा पुनरुच्चार केला आहे. विष्णुदासांचा पहिला ‘सीतास्वयंवरा’चा नाटय़प्रयोग त्या दिवशी झाल्याचा अस्सल पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. नाटय़ाभ्यासकांच्या मनात चुकीची नोंद होऊ नये, म्हणून हा खुलासा.
– डॉ. तारा भवाळकर, सांगली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा