‘साहित्यक्षेत्रात ठाकरे यांचे योगदान काय- प्रज्ञा पवार’ व या नावाचे समर्थन करणारे अनघा गोखले यांचे पत्र (दोन्ही ८ जाने.) वाचले. ठाकरे यांच्या नावाला विरोध करण्याचे धर्य दाखवल्याबद्दल पवार आणि पुष्पा भावे या कौतुकास पात्र आहेत. ठाकरे व्यंगचित्रकार/ पत्रकार म्हणून थोर आहेत, ते कुशल राजकारणी होते, लोकप्रिय नेते होते याचा अर्थ ते साहित्यिक होते, असा कसा काढता येईल?
या दृष्टीने तर सर्वच संपादक, पत्रकार हे साहित्यिक आहेत असे म्हटले तर ते योग्य होईल का? ठाकरे स्वत:लासुद्धा साहित्यिक समजत नव्हते अन्यथा त्यांनी साहित्यिकांना ‘बल’ म्हटलेच नसते.
यात कुणाला तात्कालिक अथवा कायमचा शत्रू समजण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र प्रज्ञा पवार आणि संभाजी ब्रिगेड यांनी परशुराम व त्याच्या कुऱ्हाडीच्या चित्राला केलेला विरोध हा जातीय दृष्टीने केलेला आहे असेच मला तरी वाटते. कोकणभूमी ही परशुराम भूमी म्हणूनच पूर्वीपासून ओळखली जाते. त्याची जात कुणाच्या लक्षातही येत नव्हती. परशुराम हे कोकणचे प्रतीक आहे. केवळ कुठल्या जातीचे नव्हे. मग विनाकारण समाजातले वातावरण गढूळ करायचे काम प्रज्ञाताईंसमान विचारवंतांनी तरी करू नये.

पुतळय़ासाठी कोटींचा खर्च का?
मुंबईनजीक अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याची तयारी आता पुन्हा सुरू झाली असून त्यासाठी मुंबईनजीकच्या एका खडकाला पर्यावरण खात्याची मंजुरी मिळावी असे प्रयत्न होणार आहेत. परंतु पर्यावरण खात्याने यापूर्वी याच पुतळय़ाला परवानगी नाकारली होती. शिवाय, गेटवे ऑफ इंडिया येथे छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा असताना या स्मारकासाठी कोटय़वधींची उधळपट्टी का?
छत्रपती शिवाजी महाराजांनाही असा अनाठायी खर्च आवडला नसता. जनतेच्याच पैशावर ही उधळपट्टी होणार, हे उघड आहे. याच पैशांतून गरिबांसाठी धर्मादाय हॉस्पिटल, शाळा बांधल्या गेल्या तर खर्च सत्कारणी लागल्याचा आनंद मिळेल.
अनंत एस. कानडे, ठाकुरद्वार, मुंबई

भारत बौद्धमय होणार
‘ओबीसी बांधव धर्मातराच्या वाटेवर’ ही बातमी (लोकसत्ता २ जाने.) वाचली. एका प्रभावी व परिवर्तन घडवणाऱ्या प्रक्रियेचा वेध ‘लोकसत्ता’ने घेतला, असे वाटले; परंतु ३ जानेवारीला जयंत साळगावकर यांची प्रतिक्रिया ‘हिंदू धर्मात आणखी फूट नको’ या शीर्षकाखाली वाचली. त्याचप्रमाणे ४ जानेवारीला लक्ष्मण ढवळे, संजय सोनवणी व केदार अरुण केळकर या मान्यवरांचीही प्रतिक्रिया वाचण्यात आली. या सर्व प्रतिक्रियांचा धर्मातरास विरोध आहे.
परंतु पुण्यात ६ जानेवारीस झालेल्या मेळाव्यात हनुमंत उपरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही मोहीम यशस्वी होणार, अशी खात्री वाटू लागली आहे. कारण, भारतात जसजशी सद्विवेक बुद्धिमत्ता लोकांमध्ये जागृत होईल तसतसे धार्मिक गुलामगिरी व धार्मिक पाखंडाचे पांघरूण काढून फेकण्यासाठी भारतातील ओबीसी नक्कीच पुढाकार घेतील व हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तवल्याप्रमाणे नक्कीच बौद्धमय होणार, ही खात्री आहे.
– अजय साहारे, नागपूर</strong>

‘शिवभारत’ हा ऐतिहासिक पुरावा नाही
‘शिवरायांचे दैवत परशुरामाबद्दल वाद अनावश्यक’ हे पांडुरंग बलकवडे यांचे पत्र (लोकमानस, ९ जाने.) वाचले. बलकवडे म्हणतात त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी परशुरामाचे दर्शन राज्याभिषेकापूर्वी घेतले याचा एकदाच उल्लेख येतो, तो परमानंदाच्या शिवभारतमध्ये. त्याच वेळेस राज्याभिषेकापूर्वी शिवाजी महाराजांनी परशुरामाबरोबरच अन्यही अनेक देवतांच्या मंदिरांत जाऊन दर्शन घेतले होते असे परमानंदच लिहितो हे मात्र बलकवडे सांगायला विसरलेले दिसतात व सरळ परशुराम हे शिवरायांचे जणू एकमेव दैवत होते असा आविर्भाव आणत धादांत खोटा इतिहास सांगतात.
दुसरे म्हणजे कोणीही इतिहासकार परमानंदकृत शिवभारताचा शिवचरित्रासाठीही विश्वासार्ह पुरावा म्हणून वापर करत नाही.. मुळात हे उपमा-अलंकारांनी सजवलेले काव्य असून महाभारताच्या प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेले आहे. अन्य कोणत्याही समकालीन साधनांत शिवरायांनी परशुरामचे दर्शन घेतल्याचा उल्लेख आढळून येत नाही त्यामुळे बलकवडेंचे पत्रच मुळात अनतिहासिकतेने भरलेले स्पष्ट दिसते.
 परशुरामाला आक्षेप असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची िहसक व मातृघातकी अशी जनमानसात रुजलेली खल-प्रतिमा असूनही काही विशिष्ट समाजघटक जाणीवपूर्वक त्याचे स्तोम माजवत आहेत हे आहे, पण हे लक्षात न घेता एका अनतिहासिक काव्यग्रंथाचा वापर ते परशुरामाला शिवरायांचे दैवत ठरवण्यासाठी आणि सध्याच्या वादाकडून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी, परशुराम माहात्म्य गाजवण्यासाठी करत आहेत ही बाब निषेधार्ह आहे.
संजय सोनवणी

कोकण विकासाचे मृगजळ आणि वस्तुस्थिती
नवीन उद्योग धोरण व ग्लोबल कोकण महोत्सवात मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांनी जे मृगजळ दाखविले आहे त्याबद्दल खालील वस्तुस्थिती माझ्यापरीने स्पष्ट करावीशी वाटते :
१) डिझेलची दरवाढ करते वेळी पंतप्रधानांच्या अहवालानुसार डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी भारताच्या किनारपट्टीवरील लघुबंदरांतून किनारा जलवाहतूक सुरू करण्याची सूचना केली गेली आहे. याची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेतली गेली. परंतु उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार खात्यांचे मंत्री नारायण राणे यांच्या बंदर खात्याने पत्राचे उत्तरही दिले नाही. राणे यांच्या मतदारसंघातील देवगड, मालवण व वेंगुर्ला ही बंदरे ४० वर्षे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या आश्वासनांच्या गाणात रुतत चालली आहेत. कोकणातील जलवाहतूक का सुरू होत नाही. याबद्दल राणे यांनी स्पष्टीकरण द्यावे.
२) टूरिझम सुरू केल्याने थायलंड-मलेशियापासून इजिप्तपर्यंत मोठी पर्यटनवृद्धी झाली आहे. समुद्री पर्यटनाची सर्व अंगे दाखवणारी सिंधुदुर्ग ही जगातील एकमेव किनारपट्टी आहे. परंतु पर्यटक बोट-सेवा नसल्याने त्याचा विकास होत नाही, याचे कारण नारायण राणे यांच्या बंदर खात्याकडे महाराष्ट्रासाठी ‘क्र्रूझ पॉलिसी’ नाही.
३) सिंधुदुर्गातील ‘वायमन गार्डन’ कारखाना अस्तित्वाची झुंज देत असताना सिंधुदुर्गच्या कोणत्याही नेत्याने मदत केली नाही. आज कुडाळच्या औद्योगिक वसाहतीत धनदांडग्यांचे बंगले उभे राहिले आहते. कोकणातील पुढारी ‘उद्योजक’ होऊन करोडपती होतात, पण कोकणातील उद्योग बंद पडतात.
४) पाच वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या ‘कोकण पॅकेज’मधील ३०० कोटी रुपये कोठे गेले व त्यातून काय विकास झाला, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी.
मुंबईत पंचतारांकित कोकण महोत्सव भरवण्यामागील बिल्डरांचे अर्थकारण यापूर्वी ‘लोकसत्ता’ने उघड केले होते. असे पंचतारांकित ‘ग्लोबल’ महोत्सव भरवणाऱ्या मंडळींनी जमल्यास कधी कोकणात यावे आणि वॉटरस्पोर्ट, स्कूबा डायव्हिंगचे परवाने देण्यासाठी मच्छीमारांना शासनाकडून कसा त्रास दिला जातो याचाही अनुभव घ्यावा.
आनंद हुले, कुर्ला (पूर्व).

दबलेल्या कैक अनाम कथा..
सर्वानाच सुन्न करणारी एक घटना दिल्लीत घडली,  त्यातून अनेक अत्याचारांच्या तक्रारींना प्रसिद्धीमाध्यमांचा प्रकाश दिसला, पण अशा कितीतरी घटना आज आपल्या देशात घडत आहेत. काही मोजक्याच उघडकीस येतात आणि वर्तमानपत्रांपर्यंत पोहोचतात. उच्च असो मध्यवर्ग असो वा गरीब.. समाजाच्या प्रत्येक स्तरावर या ना त्या प्रकारे, स्त्रीत्वाच्या अपमानाचे हे प्रकार घडत आहेत.
स्त्रियांनी असे केलेले कोणाला कधी आठवते का हो? किंवा वाचले का कधी, की एखाद्या तरुणीचा प्रेमभंग झाला किंवा तिचे कुणातरी पुरुषावर एकतर्फी प्रेम आहे,  म्हणून त्या पुरुषावर तिने अॅसिड फेकले किंवा चाकूने भोसकून ती पळून गेली?
याउलट, एखाद्या साधारण किंवा उच्चशिक्षित तरुणीला प्रेमाची, लग्नाची स्वप्ने दाखवून तिचा फायदा घेऊन मग तिला अध्र्या वाटेवर एकटे सोडून दुसऱ्या कुणाशी व्यावहारिक तडजोड म्हणून पुरुष लग्न करतो, तेव्हा त्या स्त्रीच्या मनाची काय अवस्था होते हा विचार कुणी केला आहे का? अशाही वेळी त्या पुरुषाला जगातून उठवण्याचा विचार स्त्री करत नाही.  मग एकटय़ा स्त्रीवर असे हल्ले का? जर स्त्रियांनीही असे हल्ले केले, तर पुरुष वर्गाचे काय होईल?
हार्मोनमधील बदल आणि लैंगिक भावनांचा उद्भव हे स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही शरीरांमध्ये घडत असते. तरीही स्त्रीवर- अगदी दोनतीन वर्षांच्या बालिकेवरही अत्याचार करून वासना विझवण्याचा अधिकार पुरुषांना निसर्गाने कसा दिला?
माधुरी गायकवाड, कल्याण</strong>
pratikriya@expressindia.com

Story img Loader