चिपळूण येथे ११ ते १३ जानेवारी २०१३ रोजी होणाऱ्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘साहित्य संमेलन हे राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही,’ असे पुण्यातील भाषणात म्हटल्याची बातमी ‘लोकसत्ता’ने (१ जानेवारी) दिली आहे. आपले जीवनच राजकारणाने ग्रासलेले असल्याने साहित्य संमेलनासारख्या ठिकाणीही त्याचे प्रतिबिंब पडणारच, असे कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन होते. मात्र कोत्तापल्ले यांच्या ‘राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही’ या विधानामुळे राजकारण्यांना एक प्रकारे, साहित्य संमेलनाला उपस्थित राहून मिरवण्याचा हक्कच बहाल केल्यासारखे वाटू शकते.
साहित्य संमेलन हे राजकारण्यांशी भांडण्याचे ठिकाण नाही हे ठीक, पण त्यांना चार खडे बोल सुनावण्याचे ठिकाण ते नक्कीच आहे. राजकारण्यांनी संमेलनाच्या मांडवात फिरकूच नये असेही कुणी म्हणणार नाही.. परंतु राजकारणी राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा वापर जर साहित्य संमेलनाच्या मांडवातही स्वत:चे महत्त्व वाढवण्यासाठी करू लागले तर तो दिवस दूर नाही जेव्हा संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक असण्याऐवजी एखादा राजकारणीच असेल आणि साहित्यिकांना फार तर ‘उपाध्यक्ष’ पद देऊन बोळवण केली जाईल!
तेव्हा संमेलनाध्यक्षांना विनंती आहे की, आपण आपल्या अध्यक्षीय भाषणात निदान सुनावण्याचे काम तरी कराल, अशी माफक अपेक्षा बाळगून आम्ही समस्त साहित्यरसिक आपल्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत आहोत.
– प्रा. दत्तात्रेय चितळे, ठाणे.

आवाज क्षीणच, हे सत्य स्वीकारले पाहिजे
बंदिस्त सभागृहातील व्यासपीठावरून सुधारकांनी समाजाला संयमाचे, शांततेचे, शहाणपणाचे कितीही बोल ऐकवले तरी सभागृहाबाहेरील सनातन्यांच्या जमावाने घातलेल्या हैदोसापुढे आणि त्यांच्या तुताऱ्यांच्या गगनभेदी आवाजापुढे या आधुनिकतावाद्यांचा आवाज क्षीण आहे.
ईश्वरी अवतार, संतांचे चमत्कार, ज्योतिषशास्त्र, फेंगशुई, मंत्रोपचार, होमहवन, कर्मकांडे या सर्वाचे इथल्या सुशिक्षितांना जबर आकर्षण आहे. सतत राजकीय कोलांटउडय़ा मारणारे भ्रष्ट आणि तत्त्वशून्य नेते, िहसक पुराणपुरुष ही या समाजाची दैवते आहेत.
पुरोगामी विचारांची कुचेष्टा करणे, स्वत:ची बुद्धी आणि तारतम्य गहाण ठेवून इतरांच्या कुविचारांना शरण जाणे, गुंड नेत्यांचे उदात्तीकरण करणे, बंदच्या नावाखाली संपूर्ण शहरावर बलात्कार करून सार्वजनिक संपत्तीची मोडतोड, जाळपोळ करणे आणि त्यालाच राजकीय आंदोलन म्हणणे, नेत्यांचे पुतळे आणि स्मारके उभारण्यात धन्यता मानणे, आवाजी आणि गलिच्छ शैलीत सण-सोहळे साजरे करणे, उथळ संगीत आणि हिडीस नृत्याविष्कारांना कला मानणे आणि  आयुष्यभर अभ्यास आणि वाचनशून्य हालचालीत रमून जाणे ही आजची इथली संस्कृती आहे.
वैचारिक आदळआपट न करता आता हे सत्य आपण सर्वानी स्वीकारले पाहिजे.
– अवधूत परळकर, माहीम, मुंबई</strong>

विचारांचे इंधन आणि झुंडशाहीची कुऱ्हाड
चिपळूणची ओळख लेखक, विचारवंतांमध्ये ‘हमीद दलवाईंचे गाव’ अशी आहे.. या गोष्टींचा उल्लेख प्रकांडपंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी चिपळूण येथेच एका व्याख्यानात केला होता. लेखक, विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते अशा विविध नात्यांनी अल्पायुष्यात कामगिरी केलेल्या हमीद दलवाईंच्या ‘इंधन’ या कादंबरीचा समावेश अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत (मरणोत्तर) करण्यात आला. ही कादंबरी वाचून चिपळूण-मिरजोळीचा परिसर बघण्यासाठी विविध ठिकाणांहून विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक येत असतात.
असे असताना, येथे होणाऱ्या ८६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात चिपळूणचे प्रख्यात सुपुत्र यांच्या मिरजोळी येथील घरापासून ग्रंथदिंडी निघणार होती. तथापि पारंपरिक विचारांच्या काही लोकांनी विरोध केल्याने संयोजकांनी अचानकपणे, तात्काळ या दिंडीचा कार्यक्रम बदलला. ही गोष्ट अत्यंत खेदजनक व क्लेशकारक आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लेखक-विचारवंत व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
हमीद दलवाईंचे सगळेच विचार सर्वानाच पटतील वा पटावेत असे नाही. पण ते मराठीतील एक प्रतिभावंत लेखक होते, यावर वाद होण्याचे कारण नाही. तशी मान्यता समीक्षक, अभ्यासक तसेच विचारवंतांकडून त्यांना यापूर्वीच मिळालेली आहे. या लेखकाच्या घरापासून दिंडी काढण्यास वा त्याचे ग्रंथ पालखीत ठेवण्यास काही सनातनी लोक आणि त्यांचा विरोध होताच हा कार्यक्रम बदलणारे संयोजक या दोघांनीही दलवाईंना साहित्यक्षेत्रात मिळालेल्या व्यापक मान्यतेलाच हरताळ फासला आहे. हे मला क्लेशकारक वाटते.
दलवाईंखेरीज अन्य दोन प्रकरणांत संयोजकांनी जी भूमिका घेतली, त्यापैकी परशुरामाच्या प्रतिमेला विरोध ‘संभाजी ब्रिगेड’ने केला होता आणि ‘संमेलन उधळून लावू’ अशी झुंडशाहीची भाषाही या विरोधातच होती. ती ऐकून त्या प्रतिमेचा आग्रह संयोजकांनी सोडून दिला. दिवंगत शिवसेनाप्रमुखांचे नाव साहित्य-मंचाला देण्यास होणारा विरोध वैचारिक होता, तो मात्र संयोजकांनी फेटाळून लावला.
झुंडशाही, सनातनी वृत्ती यांची ‘कुऱ्हाड’ अखेर सदसद्विवेकबुद्धीवर पडल्याचे दिसले.  
– सुरेश पाथरे, चिपळूण.

.. मग रेल्वे कर्मचाऱ्यांना बोनस कशाकरता ?
भारतीय रेल्वे वीस हजार कोटी रुपयांच्या तोटय़ात आहे आणि त्यामुळेच प्रवासी भाडेवाढ अत्यावश्यक आहे, असे रेल्वेमंत्री सांगत आहेत.. रेल्वे एवढय़ा तोटय़ात असताना रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘बोनस’ कशासाठी दिला जातो, हे कोडेच आहे! ‘बोनस’ म्हणजे नफ्यातील वाटा कामगार व कर्मचाऱ्यांना देणे. रेल्वे जर तोटय़ातच आहे, तर हा बोनसचा वाटा कुठून काढला जातो?
सहाव्या वेतन आयोगानुसार रेल्वे कर्मचाऱ्यांचे पगार आज बऱ्यापैकी वाढलेले आहेत. तरीही ते समाधानी नाहीत. निवृत्तीनंतरही लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचे दोन पास, कामावर असताना मोफत रेल्वेप्रवास व तीन पास आदी सुविधा त्यांना मिळतच असतात. तरीही बोनसची मागणी संघटनांनी केली म्हणून वा न करताच सरकारने दरवर्षी पुरवलेली आहे, याचा अर्थ काय? रेल्वे ही फक्त कर्मचाऱ्यांचेच हित जपण्यासाठी आहे का? तसे नसेल तर आधी रेल्वेचा तोटा कमी करावा आणि वरकड फायदा झाल्यास त्यातूनच कर्मचाऱ्यांच्या बोनसचा विचार करावा.
– यशवंत भागवत

निषेध निष्क्रियांचा, तसेच अतिअहिंसा, लांगूलचालनाचा
‘निष्क्रियांचा निषेध’ या अग्रलेखात (१० जाने.) पाकिस्तानच्या दुसाहसाचा वस्तुस्थितीदर्शक आढावा घेण्यात आला आहे. आपल्या देशातील तथाकथित पाकप्रेमींनाही या अग्रलेखाने चांगलेच फटकारले आहे. मात्र अशा बाबतीत राजकीय नेतृत्वाचा कणखरपणा किंवा संवेदनशीलता अभावानेच दिसून येते. गेली कित्येक वष्रे हीच परिस्थिती आहे.
इस्त्रायलला कितीही दोष दिला तरी त्या टिचभर देशाचा कणखरपणा मला भावतो तो याचसाठी. त्या देशाच्या बाबतीत असे घडले असते तर एव्हाना शत्रूच्या कित्येक सनिकांचे मुडदे पडले असते.
आत्यंतिक अिहसा वादामुळे व अल्पसंख्यांक समाजाचे लांगूलचालन करण्याच्या वृत्तीमुळे यात सुधारणा होणे शक्य नाही. शत्रूने काही भाग गिळंकृत केला आहेच, तो न वाढो हीच इच्छा.
– अभय दातार, मुंबई.

बापूंचा राखीप्रयोग
बलात्कारांबाबत दोन बापू आपापल्या भक्तांना उपाय सुचवत आहेत. पैकी एका ‘बापूं’नी आपल्या प्रवचनात, राखीचा उपाय सुचवला आहे.. या राख्या वर्षभर, रात्रीबेरात्री अगदी पानवाल्याकडे उपलब्ध होतील याची काळजी शासनाने घेतली पाहिजे. निदान पोलिस ठाण्यात त्या सशुल्क मिळायला हव्यात.डोंबिवली बलात्कार प्रकरणात तर जन्मदाता पिता मुलीवर, तर भाऊ बहिणीवर बलात्कार करीत होता. अशा प्रसंगांमध्ये राखीचे काय करावे, याचेही मार्गदर्शन संबंधित बापूंनी करावे.
– सुधीर सुदाम चोपडेकर, डोंगरी, मुंबई.

Story img Loader