देशद्रोहाच्या व्याख्या सापेक्ष?
सध्या चच्रेत असलेला सुवर्ण मंदिरातील स्मारकासंबंधीचा विषय वाचला आणि खूप आश्चर्य वाटले. त्याचबरोबर आपल्या सर्वाचा दुटप्पीपणादेखील उघडा पडला.
तिकडे सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांचे स्मारक उभारण्याची चर्चा होत आहे व देश आणि सरकार शांत आहे. हेच जर मुस्लिमांबाबत असते तर केवढे आकांडतांडव झाले असते. देशद्रोहाच्या व्याख्या सापेक्ष असतात हेच खरे!  
 – किरण काळे

आठवणींत ‘ज्ञानदीप’चा अनुल्लेख निषेधार्हच
 ‘लुटल्या आठवणी.. ’ पत्रातून आकाशानंद यांनी व्यक्त केलेली व्यथा (लोकमानस, १५ ऑक्टोबर) खरी आहे.
ज्ञानदीप ही एक चळवळ होती; नुसता दूरदर्शनवरचा कार्यक्रम नव्हता. त्यातून मनोरंजनाबरोबरच सामाजिक प्रबोधनही होत असे. हा कार्यक्रम मी नेमाने बघत असे, तसेच एप्रिल १९८० मध्ये मी लिहिलेली एक नाटिका ज्ञानदीपमध्ये सादर केली गेली होती. असे अनेक सामाजिक विषय, संघटनांनी केलेली कामे याला ज्ञानदीपने व्यासपीठ मिळवून दिले, प्रसार केला. माझ्या माहितीप्रमाणे आपल्या निवृत्तीनंतरही आकाशानंद या मंडळांचे काम करीत होते. अशा या कामाचा अनुल्लेख नक्कीच निषेधार्ह होता.
– राम ना. गोगटे, वांद्रे (पूर्व).

कर्मविपाक सिद्धांताची आणखी चर्चा व्हावी
प्रशांत दीक्षित यांच्या ‘आकलन’ सदरातील ‘आर्थिक अस्थिरता आणि कर्मयोगशास्त्र’ हा लेख (९ ऑक्टोबर) वाचला. सध्या परदेशातील गोष्टींचे गोडवे गाण्याची स्पर्धा सुरू आहे, त्या पाश्र्वभूमीवर ‘टिळक आणि गीतारहस्य’ हा विषय म्हणजे सुखद धक्का होता. या सदरातून त्यावर आणखी चर्चा व्हावी, असे वाटले.
‘सुख-दु:ख माणसाच्या वाटय़ाला का येते?’ आणि ‘दोन्ही परिस्थितींत विवेकाने का वागावे’ हे समजून घेण्यासाठी कर्मयोगशास्त्र ज्या ‘कर्मविपाक’ सिद्धांतावर आधारित आहे, तो सिद्धांत समजून घ्यावा लागेल. कर्मविपाक (सोप्या शब्दांत : ‘पेरावे तसे उगवते’) ही हिंदू धर्माने सृष्टीला दिलेली देणगी आहे. कर्मविपाक हा कार्यकारण भावावर अधिष्ठित आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी ‘कर्मविपाक आणि आत्मस्वातंत्र्य’ हे गीतारहस्यातील प्रकरण आणि बळवंत काशीकर यांनी अनुवादित केलेले (मूळ लेखक : हिराभाई ठक्कर) ‘कर्माचा सिद्धांत’ हे पुस्तक उपयुक्त आहे.
– केदार केळकर

पाइप गॅसवर र्निबध आहेतच, त्यात भर
पाइप गॅसदेखील तथाकथित सबसिडी मधून बाहेर काढल्याचे वृत्त (लोकसत्ता, १५ ऑक्टो.) वाचले. मुळातच पाइप गॅसचे दर हे वापरातील गॅसच्या वजनावर आधारित आहेत. ‘जास्त वापर जास्त किंमत’ असेच प्रमाण सध्याआहे. हे दर तीन स्लॅबवरच सध्याही आधारित आहेत. त्यावर पुढे आणखी र्निबधांची भर घालणार, म्हणजे हा अस्मानी सुलतानी हाच प्रकार आहे.
एलपीजी बॉटिलगसाठी, तसेच त्याचे गॅसधारकाच्या घरापर्यंतचे वितरणासाठी इ. चा खर्च हा पाइप गॅस च्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, म्हणून पाइप गॅस हा एलपीजीपेक्षा कमी खर्चात उपलब्ध होत असतो. हा मुद्दा विचारात घेतला जावा. परंतु सध्याचे केंद्र सरकार २०१४ मधील निवडणुकांमध्ये ‘आम आदमी’वर डोळा ठेवून जो हताश मध्यमवर्ग सहज लुबाडता येण्याजोगा व कमीत कमी उपद्रवमूल्य असलेला आहे, त्याच्याच खिशावर डल्ला मारत आहे. बहुधा सामान्य जनता ही असंघटित असल्याचाच हा परिणाम आहे. बघायचे आणखी काय काय होते ते!
जयंत पाटील , नौपाडा, ठाणे</strong>

..त्यापेक्षा बिहारमध्येच रुग्णालय उभारावे!
टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार करवून घेण्यासाठी बिहारहून येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मुंबईत राहण्यासाठी होणारी गरसोय टाळण्यासाठी मुंबईत ‘बिहार भवन’ उभारणीस जागा देण्याची बिहारच्या आरोग्यमंत्र्यांची मागणी संतापाची ठिणगी उडवणारीच होय. बिहारी जनतेला, विशेषत: युवकांना बिहारमध्येच रोजगार उत्पन्न करून देण्याद्वारे अन्य राज्यांत, प्रामुख्याने मुंबई-महाराष्ट्रात जाणाऱ्या लोंढय़ाला आवर घातल्याचे जाहीर करून बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आपलीच पाठ थोपटली होती ( व तसे दृश्य परिणाम दिसूनही येत होते ) या पाश्र्वभूमीवर तेथील आरोग्यमंत्र्यांनी कर्करोगाचे कारण पुढे करत मुंबईत ‘ बिहार भवन’ची मागणी करण्याऐवजी बिहारमध्येच सुसज्ज कर्करोग रुग्णालय उभारावे जेणेकरून बिहारी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा येण्याजाण्याचा त्रासही वाचेल!     
– किरण प्र. चौधरी, वसई.

अहेवनवमी किंवा ‘सुभगा-नवमी’!
‘‘अविधवा’ शब्द नको’ या पत्राद्वारे  (लोकमानस, १३ ऑक्टोबर) विलास पाटील यांनी मांडलेली सूचना  स्वागतार्ह आहे. नाही तरी पंचांगातला शब्द रुचत नसल्याने महिलांनी त्या शब्दाचं रूपांतर अहेव-नवमी असं करून टाकलंच आहे. मात्र पाटील यांनी सुचवलेल्या सौभाग्यवती-नवमी या लांब शब्दापेक्षा सुभगा-नवमी म्हणावं असं सुचवावंसं वाटतं.
– मनोहर राईलकर, पुणे.

लोकप्रियता हीच आपल्या राज्यकर्त्यांची पात्रता!
‘अन्यथा’मधील ‘शेजारशिकवण’ हा लेख वाचला.  भारत व चीनच्या राज्यकर्त्यांची तुलना होऊच शकत नाही! भारत १९४७ साली पारतंत्र्य आणि राजेशाहीतून एकाएकी लोकशाहीत आला. त्यामुळे ज्याला जास्त लोक ओळखतात तो शहाणा हे समीकरण बनलेले आहे.  
आज जर एपीजे अब्दुल कलाम आणि शाहरुख खान निवडणुकीला उभे राहिले तर शाहरुख खान निवडून येईल. हा अनुभव देवकीनंदन बहुगुणा विरुद्ध अमिताभ बच्चन किंवा राम नाईक विरुद्ध गोिवदा या निवडणुकीतून आलेला आहे. हे चीनमध्ये नाही. योग्यतेऐवजी लोकप्रियता हा भारतातला राज्यकर्ता होण्याचा निकष आहे.
आपल्या राज्यकर्त्यांना सत्ता सोडून इतर व्यवसाय नसल्याने, किंवा सत्तेतून येणाऱ्या व्यवसायातच ते असल्यामुळे म्हणा, ते सत्तेला चिकटून राहतात. चीनमध्ये राज्यकर्त्यांचे व्यवसाय काय आहेत हे माहीत नाही. म्हणून आपण चिनी राज्यकत्रे आणि भारतीय राज्यकत्रे अशी तुलना करणे योग्य नाही.
– नरेंद्र थत्ते

शेजारशिकवण घ्यायचीच असती, तर..
‘चीनकडून काहीतरी शिकायला हवं’ हे ‘अन्यथा’मधील शेवटचं वाक्य खरंच अंतर्मुख करायला लावणारं आहे. भारतात आज चिनी बनावटीच्या पिन ते पियानो अशा सर्वच वस्तू स्वस्त व आकर्षक असल्याने मुबलक विकल्या जात आहेत. भारतीय बाजारपेठेसोबतच, भारतीय सीमांवर चीनची मुसंडी वेगाने येत आहे.
इतिहासात आपण डोकावले तर चीन व भारताने एकाच वेळी राजकीय प्रवासाला स्वतंत्रपणे सुरुवात केली. ६५ वर्षांनंतर चीन ५० वर्षे आपल्या पुढे सर्वच क्षेत्रांत प्रगतीपथावर आहे. आपण फक्त इतिहासातील सोन्याचा धूर निघणारा देश अशी शेखी मिरवायची आणि आपलीच पाठ थोपटायची. तरुण जनतेवर अति वृद्धांनी राज्य करायचे. इथे पाण्यात पसा डुबणार तेथे पाण्यावर ४० किलोमीटरचा सागरी सेतू दोन वर्षांत व मंजूर रकमेपेक्षा कमी खर्चात बांधून पुरा होतो. आपण फक्त काल बांधून आज पडलेल्या पुलाच्या कथा पेपरात वाचायच्या. घोटाळ्यांच्या या महान लोकशाहीत शासनातला प्रत्येक घटक आपल्या देशासाठी काम करतोय हे स्वप्नरंजन आहे हे सामान्य नागरिकाला समजतंय. आपण मागे का तर आम्ही लोकशाहीचे पुरस्कत्रे! चिनी शासनकत्रे जे लोकशाही मानत नाहीत त्यांनी २५ वर्षांपूर्वी त्यांच्या धोरणात बदल करून त्याप्रमाणे वाटचाल केली म्हणून आज ते जगात सर्वच आघाडय़ांवर नंबर वन बनत आहेत. चीनशी आपली तुलना अशक्य हे शाळकरी मूलदेखील सांगेल. चीनकडून आपण कधीच व काहीच शिकणार नाही.
शेजारशिकवण घ्यायची असती तर १९६२ नंतर आपण ती घेऊ शकलो असतो व तसे झाले असते तर हे अरण्यरुदन करावे लागले नसते.
– विद्याधर शास्त्री

Story img Loader