दिल्लीत घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकली. घडली घटना अत्यंत लाजिरवाणी, हादरवणारी, अपमानास्पद होती, यात शंका नाही. ही घटना घडल्यानंतर आणि त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही संताप, उद्वेग, हळहळ, अपमान या सगळ्या भावना मनात दाटून आल्या. संवेदना जाग्या असलेल्या कोणाही सामान्य माणसाला असंच वाटलं असेल. पण ‘अवघा देश शोकसागरात बुडाला’, ‘देश की बेटी का बलिदान व्यर्थ न होने दे’ वगरे ठळक मथळे वृत्तवाहिन्या दाखवत होत्या, तो मात्र असह्य़ प्रकार होता. सदर मुलगी दुर्दैवी ठरली, तिच्या झालेल्या अपमानाबद्दल आमची तिला पूर्ण सहानुभूती होती, तिने लढाई लढण्यासाठी मदत मागितली असती तर ती तिला नक्की मिळाली असती. तिच्यावर उत्तमातले उत्तम उपचार करण्याचा पूर्ण प्रयत्न केला गेला असे घटनाक्रम सांगतो. पण तिच्या दुर्दैवी मृत्यूला बलिदान म्हणणे किंवा तिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची मागणी करणे ही मात्र अकलेची दिवाळखोरीच म्हणावी लागेल. समाजासाठी किंवा देशासाठी काही तरी अपूर्व कृत्य करताना आलेले मरण हे बलिदान असते. जसे युद्धात धारातीर्थी पडलेले सनिक, शहरी दंगा शमवत असताना किंवा घातपाती कारवायांना तोंड देत असताना मरण पावलेले पोलीस कर्मचारी. एक सामान्य मुलगी अत्यंत अपमानास्पद रीतीने मरण पावली, तर त्याची शरम बाळगायची सोडून नाटकं कसली करताहेत हे लोक? उद्या तिचे स्मारक उभे करा, अशी मागणी पुढे येईल आणि दिल्ली बघायला येणाऱ्या पर्यटकांना दाखवण्याचं एक ठिकाण होईल. ‘बघा लोकहो, भारतीय स्त्रियांची सुरक्षितता इथे चिरविश्रांती घेते आहे.’ स्त्रियांचं सुरक्षित आयुष्य पणाला लागलेलं असताना मूळ समस्येला बगल देण्याची ही नवीच पद्धत शोधून काढलेली दिसते या बेशरम लोकांनी. (नाही तरी स्मारक उभारणं ही आपल्याकडे एक फॅशनच झाली आहे.)
नीरजा गोंधळेकर
मनावरला ताबा कुणाकडे?
विनयभंग, बलात्कार, खून आणि गुन्हेगारीच्या बातम्यांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. खरे तर, बलात्कारासारख्या गुन्ह्यांत आर्थिक लाभ काहीच नसतो. सामाजिक प्रतिष्ठा हे प्रलोभनही नसते. काही मिनिटांचे (लैंगिक) सुख मिळवण्यासाठी ही मंडळी (बहुतेक वेळा तरुणच) वाट्टेल ते करतात.. बलात्कार, खूनही. लैंगिक भावना एवढी प्रबळ का होते आहे? खरे उत्तर असे आहे की, ही भावना चाळवली जात आहे. हा चाळवाचाळवीचा अतिरेक मनोरंजनाच्या नावाखाली चालला आहे. राक्षसी मन जिंकते, हा फक्त ‘त्या क्षणाचा’ परिणाम नसून अनेक वर्षांत तयार झालेला मनाचा सांगाडाच त्यामागे आहे. आजच्या या अत्याचारी गुन्हेगारांचे वय विचारात घेतले तर, त्यांच्या जन्मापासूनच ते टीव्ही आणि त्यावरील अर्धनग्न नाचणारी ‘सुंदर’ शरीरे पाहात आले आहेत. दोन केस गळाले, पांढरे झाले, तारुण्यपीटिका आल्या तर काय महाभयंकर घटना झाली असे जाहिरातींमध्ये दाखवले जाते. त्यामुळे समाजाची मानसिकताच बदलून गेली आहे. संस्कार ही केवळ पालकांची जबाबदारी, असे आजही मानले जाते पण तरुण मनांचा ताबा पालकांकडे नसून ‘एंटरटेन्मेंट इंडस्ट्री’कडेच आहे. व्यावसायिक समुपदेशक आता संख्येने पुरे पडूच शकणार नाहीत, एवढा हा प्रश्न गंभीर झाला आहे.
डॉ. हेमंत बेलसरे (कन्सल्टिंग सायकॅट्रिस्ट)
फक्त कायदेच? जागरूकता, संस्कार नकोत?
दिल्लीमधील सामूहिक बलात्कार घटनेनंतर उत्स्फूर्त जनआंदोलन बघायला मिळाले. ते आवश्यकच होते. आता खरंच वेळ आली आहे असे गुन्हे आणि त्यामागील कारणांचा विचार करायची. केवळ फाशी देऊन असे गुन्हे कमी होणार आहेत का? आपण मूळ कारणांचा विचार का नाही करत?
ज्या देशात काही कोटीहून अधिक खटले कोर्टात केवळ पुढची तारीख घेऊन पडून आहेत त्या देशात भ्रष्टाचार, खून, बलात्कार, विनयभंग अशा गुन्ह्यांना आळा कसा बसणार? कायदा कठोर व्हायलाच हवा, पण त्या कठोर कायद्याचा धाक आणि दहशत गुन्हेगारावर नसेल, तर अशा कायद्यांचा काय उपयोग? इथे कायद्याचा धाकच गुन्हेगारांना नाही. आमची न्यायपालिका अधिक कार्यक्षम व्हावी आणि गुन्हेगारांना कमी वेळात शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन व्हायला पाहिजे. तरच कायद्याचा धाक बसेल आणि गुन्हे कमी होऊ शकतील.
दुसरा मुद्दा येतो तो जागरूकतेचा. दिल्लीसारख्या काही शहरांत खासगी बसगाडय़ा, रस्त्यावरील कमी प्रकाश, कमी पोलीस ही कारणे आहेत.
तिसरा मुद्दा म्हणजे संस्काराचा. अलीकडे पालक मुलांच्या आणि पर्यायाने आपण समाजाच्या संस्काराला दुय्यम महत्त्व देतोय असं मला वाटतं. दारू पिणे, पाटर्य़ा करणे, रेव्ह पार्टी या गोष्टी सर्रास व्हायला लागल्या आहेत. माहितीच्या महाजालावर (इंटरनेट) पोर्न साइट्स आणि चित्रपट पाहून आमची तरुण पिढी वयात येतायेताच बिघडत आहे. त्यामुळेही विनयभंग आणि बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. याचा आपण कधी विचार करणार? या गोष्टींनाही आळा घालणे आवश्यक आहे. कारण या सर्व ठिकाणी स्त्री ही एक भोग्यवस्तू म्हणून दाखवली जाते.
आपण जर आजपासून शाळांमधून स्त्रियांचा आणि एकूणच व्यक्तीचा मान ठेवायच्या संस्कारांवर विशेष भर दिला तर दहा वर्षांनी समाज अधिक सुंदर असेल असे मला वाटते. केवळ पोलीस, न्यायपालिका आणि प्रत्यक्ष गुन्हेगार यांनाही दोष देण्यात अर्थ नाही असे मला वाटते. तो गुन्हेगार आपल्याच समाजाने घडवलेला असत नाही का?
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते .. असे म्हणता म्हणता हे काय झाले या देशात? त्या ऐवजी आपापल्या धर्माची शिकवण आणि धार्मिक अस्मितांऐवजी आध्यात्मिकता वाढवण्याची गरज आहे. सर्व धर्मामध्ये स्त्रीला अत्यंत आदर देण्याचीच शिकवण आहे आणि ती पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजातील सर्व घटकांनीच देण्याची गरज आहे.
यापुढील मुद्दा स्त्री सुरक्षेचा. अधिकाधिक मुलींनी स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षित होण्याची गरज आहे. निदान अलीकडच्या काळातील घटना बघता असा प्रचार व्हायला पाहिजे. तरी रात्री बेरात्री कुठल्याही काळातील आणि भागातील स्त्री पूर्ण सुरक्षित नसते, हे सत्यही नव्या पिढीच्या अति-आत्मविश्वास असणाऱ्या मुलींनी स्वीकारायला पाहिजे.
महेश कुलकर्णी, कोलबाड, ठाणे.
तरच तिच्या आत्म्याला शांती लाभेल!
दिल्लीच्या अत्याचार प्रकरणातील तरुणीचा अंत झाला. आपण तिच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना करीत आहोत, पण त्या आत्म्याला अशी शांती लाभणार नाही.
बलात्कार म्हणजे बळजबरी, दहशत, दडपशाही, शारीरिक आणि मानसिक छळ आणि अत्याचार. आणि पाशवी वासना शमवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या भावनांचा विचार न करता त्या व्यक्तीला आयुष्यातून उठायला लावणारी भयंकर कृती. एकूण बलात्काराचा इतिहास पाहिला तर अति वासना आणि त्यामुळे आलेले क्षणिक पशुत्व यातून घडलेल्या गुन्ह्य़ांची संख्या तुलनेने कमी आहे. बरेचसे गुन्हे हे सत्ता, अधिकार, आíथक ताकद याचा फायदा घेऊन घडलेले आहेत.
आपल्या हाताखालील कर्मचारी, मजूर, मोलकरीण, शाळेतील विद्याíथनी, वसतिगृहातील मुलगी, आश्रमशाळेतील निराधार परित्यक्ता, आदिवासी, मोलमजुरी करणारी अबला. आज आपल्या देशात असे न दाखल केलेले हजारो गुन्हे असतील, ते शोधण्याची जबाबदारी आपली सर्वाची आहे.
ज्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे आणि त्यामुळे असे पाशवी अत्याचार करण्यास जे प्रवृत्त होत असतील अशा गुन्ह्य़ांची हाताळणी मनोवैज्ञानिक उपाययोजना अवलंबून करायला लागेल. पण जे मजा म्हणून, माज म्हणून, पशाची मस्ती म्हणून, अधिकाराची गुर्मी म्हणून, आपल्या गुंडशाहीची दहशत म्हणून असे गुन्हे करीत असतील अशांना प्रथम जेरबंद करावे, त्यांची िधड काढावी, त्यांची नावे आणि छायाचित्रे प्रसारमाध्यमांतून प्रकाशित करावीत. असे केले तरच त्या धाडसी, पण दुर्दैवी तरुणीच्या आत्म्याला शांती लाभेल.
शिरीष धारवाडकर, औरंगाबाद</p>
सरकारनेच हे राजकीय हेतूसाठी केले
अखेर दिल्लीतील पीडित तरुणीचे दुर्दैवी निधन झाले. तिची परिस्थिती पाहता ती जगणे नव्हती हे उघड होते, पण हेही खरे की दिल्ली आणि केंद्र सरकार यात सर्वच बाबतीत कमी पडले. तिला ते सुरक्षा तर देऊ शकले नाहीतच पण तिच्या नाजूक अवस्थेत तिला सिंगापूरला हलवण्याचा अताíकक निर्णय घेऊन तिची गंभीर शारीरिक स्थिती अधिक चिंताग्रस्त बनवली. सिंगापूर हे काही प्रत्यारोपणासाठी प्रसिद्ध ठिकाण नाही. शिवाय दिल्लीतील तज्ज्ञही काही कमी नाहीत. असो. देशात तिचे बरेवाईट झाले तर जनतेचा क्षोभ अधिक होईल, कदाचित रुग्णालायची सुरक्षा धोक्यात येऊ शकेल असे काही मंडळींना वाटले असण्याची शक्यता आहे; पण त्यासाठी हा अमानवतावादी निर्णय घेणे केवळ क्रूर आहे. एखाद्या जिवाला आपण आपल्या राजकीय हेतूसाठी पणाला लावायचे हे कर्तृत्व सत्ताधाऱ्यांच्या अंगलट येणार हे नक्की. परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता सरकारने केलेली ही नौटंकीही या वर्षांतील दिल्लीश्वरांची भारतीय जनतेला सर्वात ओंगळवाणी आणि भेसूर भेट आहे.
अनघा गोखले, मुंबई.