महिलांची संख्या लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यांच्या आसपास आहे. तरीही त्यांना बरोबरीचा दर्जा सोडा, पण माणूस म्हणूनही मान मिळत नाही. वर्तमानकाळातील स्त्रियांवरील अत्याचार पाहून मनाचा थरकाप होतो. मागील वर्ष हे महिला अत्याचार वर्ष म्हणून ओळखले जावे इतक्या दुर्दैवी घटना घडत गेल्या. स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, न्यायमूर्ती रानडे, महर्षी कर्वे, महात्मा फुले, संत गाडगेबाबा अशा अनेक विचारवंतांनी महिला, नारी शक्ती याबाबत वेळोवेळी विचार मांडले आहेत. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचा पहिला विवाह २८ डिसेंबर १८७३ रोजी झाला त्याला १४० वष्रे पूर्ण होत आहेत. जोतिबांच्या शिकवणीने मुक्ताबाई, ताराबाई लिहू आणि संघर्ष करू लागल्या.
स्वामी विवेकानंदांचा क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर, आंतरिक विकासावर अधिक विश्वास होता. त्यांच्या विचारांची उजळणी होणे गरजेचे आहे. स्वामींच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती (१५०) वर्षांची सांगता १२ जानेवारी २०१३ रोजी होत आहे. या निमित्ताने कुणीतरी स्वामींचे आणि महात्मा फुले यांच्यासह इतर विचारवंतांचे महिला, नारीशक्तीबाबत विचारधन संकलित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावे ही अपेक्षा.
मुख्य टीकेचा प्रतिवाद हवा होता
‘लोकसत्ता’च्या ‘बोंब महाराष्ट्र’ या अग्रलेखाला मा. उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया वाचली व आपले लोकप्रतिनिधी ‘लोकसत्ता’चे अग्रलेख वाचतात, त्यांची दखल घेतात याचे समाधान वाटले. परंतु त्यांनी आपली प्रतिक्रिया आणखी संयमीपणे मांडायला हवी होती. नव्या उद्योग धोरणातील काही उपयुक्त तरतुदींचा ते दाखला देऊ शकत होते. त्याचबरोबर या उद्योग धोरणावरील जी मुख्य टीका घरबांधणीसंबंधी आहे त्याविषयी त्यांनी प्रतिवाद करायला हवा होता.
शेकडो एकरवर पसरलेल्या सेझमधील काम करणारे कामगार, अभियंते, व्यवस्थापक यांना घरे, शाळा, दवाखाने, करमणुकीचीही आवश्यकता आहे. व त्याकरता त्या जमिनीचा वापर करणे गर नाही. परंतु या तरतुदीचा गरफायदा घेऊन जर काहींनी त्याचा वापर (उद्योगातून नफा कमवण्याऐवजी फक्त घरबांधणीतून पसा मिळवण्यासाठी) करू नये याची काळजी नव्या उद्योग धोरणात घेतली आहे का? शेवटी एवढेच म्हणावे वाटते की उद्योजक हे काही समाजाचे शत्रू नाहीत व त्यांनी नफा कमावणे पाप नाही. परंतु हे करत असताना योग्य मार्गाचा अवलंब व्हावा जेणे करून ज्या शेतकऱ्यांची जमीन सेझखाली गेली आहे त्यांची थट्टा होऊ नये.
किरण काळे.
कालव्यांऐवजी नळ : फुलेंचा ‘असूड’ आणि आजचा लपवाछपवी खाक्या!
‘पाण्याचा सरकारी खाक्या’ या अग्रलेखात (७ जाने.) कालव्यांऐवजी बंद नळाने पाणी वाटप करण्याच्या योजनेचा उल्लेख वाचून म. ज्योतिबा फुले आठवले. ‘दर एक शेतकऱ्याच्या शेताच्या मानाप्रमाणे प्रत्येकास एकेक तोटी करून द्यावी..’ हे ज्योतिबांनी ‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये सांगितले होते.
आज काही प्रकल्पांत बंद नळाने पाणी देण्याचा प्रयोग होतो आहे. पण तो खूप मर्यादित आहे आणि हेतूंबद्दल शंका यावी असा प्रकार काही ठिकाणी आहे. उदाहरणार्थ, उध्र्व मानार मध्यम प्रकल्पावरील अहमदपूर उपसा सिंचन योजना. कालवा व वितरण व्यवस्थेची कामे पूर्ण झाली. पण ती अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली. ते लपविण्यासाठी तेथे बंद नळाने पाणी पुरवठा प्रस्तावित केला गेला.
आता कालव्यातून पाईपलाईन नेणार आणि कालवे बुजवणार! क्या आयडिया सरजी? अनुशेषग्रस्त मागास भागातील अशा खर्चातून दुष्काळ निर्मूलन होणार हा पाण्याचा सरकारी खाक्या!
-प्रदीप पुरंदरे, औरंगाबाद.
डेरेदार वृक्षांच्या शोधात..
‘लेखक बुडाला। लाचारीत॥’ हे श्रीकांत उमरीकर यांचे पत्र (लोकमानस, ७ जाने.) वाचले आणि मनात आले की खरंतर आता उत्सवी मंडळींनी राजकीय नेत्यांसाठीचे साहित्य संमेलन, बिल्डरांसाठीचे साहित्य संमेलन, उद्योगपतींसाठीचे साहित्य संमेलन, धर्ममरतडांसाठीचे साहित्य संमेलन, वगैरे उदंड साहित्य संमेलने भरवावीत. भाट साहित्यिकांना आपल्याकडे तोटा नाही. हवी त्यांना हवी तशी भाषणे, शब्दांकने करून देणारे ‘घोस्ट रायटर्स’ही भरपूर आहेत.
ही संमेलने भरवून उरलेल्या दिवसांत कणा असलेल्या, लाचारीत न बुडालेल्या, उरल्यासुरल्या साहित्यिकांनी आपापल्या चटणी-भाकरीचं गाठोडं तयार ठेवावं, ‘विकासकां’च्या नजरेतून वाचलेल्या एखाद्या डेरेदार वृक्षाखाली जमावं. साहित्यिक चर्चा, वैचारिक आदानप्रदान करावं, चार घटका मनोविनोदनात घालवाव्यात..
.. अगदी आपापल्या खर्चानं.
हवे आहेत असे ‘औदुंबरा’सारखे डेरेदार वृक्ष, नसेल तिथे अध्यक्ष, नसेल तिथे स्वागताध्यक्ष, नसतील तिथे प्रायोजक, असतील तिथे फक्त लेखक आणि चर्चक.. सारस्वत आणि सरस्वतीपूजक.
अशाच वृक्षांच्या शोधात मी एक वाचक..
वीणा गवाणकर, वसई.
बाळासाहेबांचे नाव देण्यात गैर ते काय?
‘साहित्यिकांची बल म्हणून संभावना करणाऱ्या शिवसेनाप्रमुखांचे नाव व्यासपीठाला का?’ ही बातमी (लोकसत्ता, ५ जाने.) वाचली. प्रा. पुष्पा भावे यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. बाळासाहेब ठाकरे हे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार म्हणून गाजलेले आहेत, शिवाय मार्मिकसारखे साप्ताहिक अनेक वर्षे त्यांनी समर्थपणे चालवले. एका राजकीय पक्षाचे प्रमुख म्हणून मराठी भाषेचा आणि भाषिकांचा कैवार घेणारे म्हणूनही अनेकजण त्यांना मानतात. पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार दिल्याबद्दल राजकीय खंत वाटणारे बाळासाहेब पुणे-मुंबई महामार्गाला पु.ल. देशपांडे यांचे नाव देण्याबद्दल आग्रही असतात.
हा त्यांचा राजकारणी आणि साहित्यिक मनप्रवाह आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्या न्यायाने त्यांचे नाव देणे ही गर आणि अप्रस्तुत गोष्ट वाटण्याचे कारण नाही.आपल्याला कोणी अरे म्हटले की आपण का रे म्हटलेच पाहिजे किंवा त्याला कायमचा शत्रू मानले पाहिजे हा पोरकटपणा झाला; तो आपण करावा अशी पुष्पाताई वा अन्य विरोधकांची अपेक्षा आहे काय?
शिवाय साहित्यिक ही अशी कोणी स्वतंत्र जमात नाही, आपल्यातलीच लेखनाची जर जास्त आवड असलेली आणि त्यामुळे वाचनीय मजकूर लिहिणारी ही मंडळी आहेत. सर्व सामान्य माणसासारखेच ते एरवी वागतात, अपमान झाला तरी सरकार दरबारी मानसन्मानाचे प्रसंग आले तर सारे विसरून पुढे धावतात. त्यामुळे बाळासाहेबांचे ते उद्गार ही मंडळी कधीच विसरली असतील.
अनघा गोखले
पुन्हा विपर्यासच
अलिकडे रा.स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांचे भाषण झाले की त्यातील संदर्भहीन व अर्थ न समजता, घाई घाईने, चुकीचे वृत्त देण्याची जणू अहमहमिका लागली आहे. त्यांचे इंदोर येथील परमानंद योग थेरपी इस्पितळाच्या उद्घाटन समारंभातील भाषण हा त्याचा एक नमुना आहे. ज्या गोष्टींवर त्यांनी पाश्चात्य विचारसरणी म्हणून टीका केली आहे, त्याच गोष्टींचे त्यांनी समर्थन केल्याचे वृत्त आपण छापले आहे. ‘स्त्रीने घराचा उंबरठा ओलांडू नये’ असे कुठेही न म्हणताही त्यांच्या तोंडी हे वाक्य घालण्यात आले आहे. ‘विवाह कराराचा भंग झाल्यास पती पत्नीचा त्याग करू शकतो’ असे त्यांनी कोठेही म्हटले नाही. हल्ली तसे केले जाते असे त्यांचे म्हणणे होते. संपूर्ण भाषण न समजून घेता त्याचा विपर्यास केला गेला आहे. समाज भीतीने नवे तर एकात्म भावनेने जोडता येतो हे त्यांनी प्रतिपादित केले.
किशोर मोघे
लाट परतवू ..
‘‘सातच्या आत घरात’ची काळजी’ हा रसिका मुळ्ये यांचा लेख (रविवार विशेष, ६ जाने. ) वाचला. दिल्लीतील सामुदायिक बलात्काराच्या घटनेनंतर आज संपुर्ण भारतातल्या युवतींच्या,स्त्रियांच्या मनात एक अनामिक भितीची लहर निर्माण झालेली आहे. याच भितीच्या छायेखाली साऱ्या युवती,महिला जगत आहेत. ही भितीची लाट समाजाला परतवून लावून एक आश्वासक वातावरण निर्माण करता येत नाही ? सरकारकडे गुन्हेगाराला फक्त कडक शासन करण्याची मागणी करुन समाजाची जबाबदारी संपते?
– धनराज खरटमल, कांजुरमार्ग, मुंबई</strong>