‘विदर्भाची ‘अणे’वारी’ हे अनेक संदर्भासहित वेगळ्या विदर्भाची बाजू मांडणारे संपादकीय (८ डिसेंबर) वाचले. परंतु १५ वर्षांपूर्वी वेगळा विदर्भ का नको, आर्थिकदृष्टय़ा तो व्यवहार्य व सक्षम कसा होणार नाही, अशी अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे उच्चविद्याविभूषित विदर्भपुत्र डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचाही उल्लेख यायला हवा होता. त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे जर आजही विदर्भाचा अनुशेष दूर झालेला नसेल तर डॉ. जिचकारांची वेगळा विदर्भ नको ही त्या वेळची भूमिका आजच्या काळातही सुसंगत अशीच आहे. त्यांनी म्हटले होते की, विदर्भ स्वतंत्र झाला तर पहिल्या दिवसापासून राज्य चालवायला पसे नसतील.
कोळशाच्या व इतर खनिजांच्या खाणी, कापूस, संत्री, जंगल आदींचे मिळणारे तुटपुंजे उत्पन्न विदर्भाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे होणार नाही. महाराष्ट्रात राहूनच विदर्भाचे पालन-पोषण चांगल्या प्रकारे होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पंचावन्न वर्षांतील सुमारे बारा वष्रे म्हणजे एकचतुर्थाश काळ, आजच्या मुख्यमंत्र्यांसहित विदर्भाचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे विदर्भाच्या मागासलेपणाला तेही तितकेच जबाबदार आहेत. खरे तर विजनवासात गेलेली काही राजकीय मंडळी मूठभर शेटजींच्या जिवावर वेगळ्या विदर्भाची मागणी करीत आहेत. त्यामुळे चुकून जर वेगळा विदर्भ झालाच तर सामान्य वैदर्भीयांना ‘श्रीहरी श्रीहरी’ करायची वेळ येईल. त्यामुळे वेगळा विदर्भ नकोच.
प्रदीप शंकर मोरे, अंधेरी पूर्व (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा