‘पुरोगामी कोल्हापूर ऑनर कििलगबाबत शांत’ ही बातमी (लोकसत्ता, १९ डिसें.) वाचली. आंतरजातीय लग्न केले म्हणून भावांनीच आपली बहीण आणि तिच्या नवऱ्याचा क्रूरपणे केलेला खून पाहून आपण मध्ययुगीन मानसिकतेत जगत असल्याची खात्री पटते. राजर्षी शाहूंच्या करवीरनगरीत अशा प्रकारची घटना घडणे धक्कादायक आहे. परंतु त्यापेक्षा धक्कादायक आहे ते पुरोगामी कार्यकत्रे, संघटना यांनी शांत राहणे. बातमीत म्हटल्याप्रमाणे कदाचित हत्या झालेला मुलगा ब्राह्मण असल्याने त्याबाबत आवाज उठवावा असे वाटले नसेल.
आपले हक्क, अधिकार मिळवण्यासाठी ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांशी अनेकदा संघर्ष केला. पूर्वापार चालत आलेल्या या संघर्षांने ब्राह्मण-ब्राह्मणेतरांमध्ये दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे कदाचित ब्राह्मणांच्या गोष्टींशी आपला काय संबंध? त्यांचे ते पाहून घेतील, असाही विचार अनेकांच्या मनात आला असेल.
वस्तुत: कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होतो (विशेषत: जेव्हा जातीचा संदर्भ असेल) तेव्हा सर्व समाजाने एकत्र येऊन त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आजपर्यंत अनेकदा दलितांच्या हत्या झाल्या. अशा वेळीही अपवादवगळता इतर जाती अत्याचार निर्मूलन लढय़ात सामील होत नाहीत. भारतीयांना लागलेला हा जातीचा रोग खूप भयानक आहे. जाती-धर्म व्यवस्थेची चिकित्सा जरूर व्हावी, परंतु जाती-जातीत, धर्मा-धर्मात भांडत बसण्यात अर्थ नाही. ज्या फुले दाम्पत्याला तत्कालीन ब्राह्मणांनी अतोनात त्रास दिला, त्यांना ठार करण्याचे प्रयत्न केले, त्या फुले दाम्पत्यानेच ब्राह्मणांच्या विधवा मुलींची अत्याचार, अनतिक संबंधांतून जन्मलेली मुले सांभाळण्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. इतका मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या फुल्यांचा वारसा जपायचा असेल तर झाले गेले सगळे विसरून जाऊ आणि फुल्यांच्या स्वप्नातील एकमय समाज निर्माण करू. मात्र यासाठी सर्व जाती-धर्मानी मानवतेच्या विचाराने एकत्र यायला हवे.
प्रकाश पोळ, कराड (जि. सातारा)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा