‘अप्रासंगिक’ या संजीव खांडेकर यांच्या सदरातील ‘अ-शोकापासून न-शोकापर्यंत’ (रविवार विशेष, २७ डिसेंबर) हा लेख मनोवृत्तीच्या जडणघडणीवर एका वेगळ्याच दृष्टिकोनातून झगझगीत प्रकाश टाकतो आणि समाजाला शोकातून उन्मादाकडे नेणाऱ्या प्रवृत्तीवर नेमके बोट ठेवतो.
भाल्यावर शत्रूची डोकी मिरवणे असो किंवा मेणबत्त्या, या सर्वामागे संतापाची लाट वा अन्यायाविरुद्धची चीड असतेच. ‘फासावर लटकवा!’ हीसुद्धा भावना अनेक वेळा उफाळून आलेली असते. पण शोकाचे प्रकटीकरण स्फोटक व उग्र असू शकते. ते काबूत ठेवता यावे म्हणून शोक प्रकटीकरणाचे सामाजिक नियम इतिहासाच्या वाटचालीदरम्यान तयार झाले; या संयत वळण लावण्याच्या प्रक्रियेच्या फंदात न पडता भावनिक उद्रेकाचा संकुचित राजकारणासाठी उपयोग केला जातो, काही प्रसारमाध्यमांमधून आक्रमक आणि विद्वेषी भावनेच्या ‘प्रसारा’ला उत्साहात खतपाणी घातले जाते.
आधीच आर्थिक-सामाजिक कारणांमुळे समाजात झुंडशाही प्रकट होत असते. वेश्याव्यवसाय होत असल्याच्या आरोपांवरून जमावाने नागपूरला एका घरात बरीच मोडतोड केली. हिंसेशिवाय न्याय मिळाल्याचे समाधान मिळत नाही/ मिळून दिले जात नाही या वळणावर समाज येऊन ठेपला आहे. दुसऱ्यावर हिंसेचा प्रयोग करणे हे आक्षेपार्ह वाटतच नाही. त्यातच आपल्याकडे संघ, दल, परिषद व सेना वा सनातनी यांच्या व्यासपीठांवरून वा लोकसभेत पोहोचलेल्या साध्वी, साधू, मौलवी यांच्या वक्तव्यांतून अशीच गरळ ओकली जात असते; यातून फोफावणाऱ्या असहिष्णुतेमुळे मतभिन्नतेविरुद्ध केवळ शाब्दिकच नव्हे तर प्रसंगी शारीरिक युद्धसुद्धा पुकारले जाते.
आक्रमकतेची आणि युद्धखोरीची भाषा करून नेते धूर्त खेळी खेळतात, ‘स्फोटक व उग्र प्रकटीकरण काबूत ठेवणे’ अवघड करतात आणि जनतेला सावज बनवितात, हीच मानवी शोकांतिका आहे.
– राजीव जोशी, नेरळ
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा