‘मोदींचा खरा चेहरा हिंदुत्वाचाच’ पत्र वाचले. शेजारीच गिरीश कुबेरांचा लेख आहे, त्यात आपल्या समाजात विज्ञाननिष्ठता कशी रुजलेली नाही, याचे विवेचन आहे. त्या अवैज्ञानिक मानसिकतेचा परिणाम संस्कृती, परंपरेतल्या अवैज्ञानिक गोष्टींचे अस्मितेच्या नावाखाली समर्थन करण्यात होतो. पंतप्रधानपदावरून मोदी अत्यंत अवैज्ञानिक अशी विधानं करतात, हे दुर्दैवी आहे, पण याची दुसरी बाजू पाहायला गेलं तर; आज समाज जो धार्मिक एकांगतेकडे, ध्रुवीकरणाकडे झुकलेला दिसतो, त्याची बीजं स्वातंत्र्यापासूनच हळूहळू पेरली जात होती, असे वाटते. ‘मोदी सरकार’ हे ‘कारण’ नसून ‘परिणती’ आहे. कारण गेली कित्येक दशकं कोणत्याही राज्य अथवा केंद्र सरकारनं निखळ धर्मनिरपेक्ष, विज्ञानवादी, बुद्धिवादी भूमिका घेतल्याचं माहिती नाही. वेळोवेळी पुस्तकांवर बंदी घालणं, सिनेमांवर र्निबध घालणं, वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय फिरवणं, जादूटोणाविरोधी कायदा संमत न करणं, असले आचरट चाळे ‘निधर्मी राज्यघटना’ मानणाऱ्या पक्षांच्या सरकारांनी केले आहेत. हे मतांसाठीचे लांगूलचालन कधी मुस्लिमांचे झाले तर कधी हिंदूंचे. ‘भावना दुखावल्याच्या’ नावाखाली आंदोलने, हिंसा केली की कोणतेही सरकार नमते घेते, हे या लोकांना कळले आहे. हे अगदी वंदे मातरम्च्या काटछाटीपासून, आताच्या गोहत्या बंदीपर्यंत चालू आहे. प्रत्येक प्रसंगातील तपशिलात फरक असला तरी, प्रतिगामी शक्तींना बळ देण्याचे कार्य हे धर्मनिरपेक्ष सरकारांनीच पार पाडले आहे. शिवाय सरकारी अथवा बिगरसरकारी पातळीवरून विज्ञानाचा प्रसार, तुरळक अपवाद वगळता, कधी जोमाने झालाच नाही. या सर्वाचा परिणाम म्हणजे समाज विज्ञानवादी होण्यापेक्षा धार्मिक, परंपरावादी होण्यात जास्त समाधान मानतो. या मानसिकतेच्या अतिरेकी प्रवृत्ती वाढत आहेत. त्याचेच परिणाम आपण भोवती पाहतो आहोत.
त्यामुळे, मोदीविरोधक ‘संघप्रचारक’ मोदींना हरवू शकतील; पण समाजाचा लंबक जो आधीच कट्टरतेकडे झुकला आहे, तो जागेवर कसा आणतील? मोदी सत्तेवरून गेल्याने सर्व काही आलबेल होईल असे मानणे, हा एक तर भोळेपणा आहे किंवा वेड पांघरून पेडगाव गाठण्याचा प्रकार आहे. निधर्मी, विज्ञानवादी राष्ट्रवाद जोपासायचा असेल तर; पुरोगामी शक्तींनी ‘मोदी सरकार’ हे ‘कारण’ नसून स्वातंत्र्यापासून आतापर्यंत झालेल्या बेगडी, स्वार्थी आणि संधिसाधू राजकारणाचा ‘परिणाम’ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
आशीष चासकर, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा