रविवारी टी २० विश्वचषक अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने इंग्लंडवर अतिशय रोमहर्षक विजय मिळवला. विजयानंतर वेस्ट इंडिज संघाने जो जल्लोश केला, तो अविस्मरणीय होता. या जल्लोशाने जगभरातील क्रिकेट रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. किंबहुना हा जल्लोश पाहण्यासाठी बऱ्याच भारतीय क्रिकेट रसिकांनी हा सामना बघितला; परंतु सामन्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार डॅरेन सॅमी याने या संघाचा विश्वचषकापर्यंतचा जो खडतर प्रवास सांगितला तो निश्चितच खडतर, संघर्षमय व प्रेरणादायी आहे. जेव्हा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात आले तेव्हा त्यांच्याजवळ पुरेसे साहित्यदेखील नव्हते. ते त्यांनी भारतात खरेदी केले. अशाही परिस्थितीत या संघाने आपल्या खेळाच्या जिगरबाज प्रदर्शनाने जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली. मुख्यत्वे या संघाने उपांत्य सामन्यात व अंतिम सामन्यात जो खेळ केला तो अविस्मरणीय होता. असा खडतर प्रवास करून विश्वविजेता होणे हे सोपे निश्चितच नाही. या संघाच्या व त्यांच्या या खेळाबरोबरच त्यांनी काही समाजसेवी संस्थेला मदत केली हेही त्यांचे मोठेपण. अशा या संघाला, त्यांच्या जिद्दीला, संघर्षांला सलाम.
-महादेव शहादेव जायभाये, काकडहिरा (जि. बीड)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा