परवाच चत्री नवरात्रासाठी सार्वजनिक जागेत एका मंडळातर्फे देवी बसवण्याच्या कार्यक्रमाविषयी ऐकले. प्रत्येक घरगुती उत्सवाला सार्वजनिक रूप देण्याचे हे लोण पसरतच चालले असून ते व्यवस्थेच्या चिंधडय़ा उडवणारे ठरत आहे. भाद्रपदातील गणपतीनंतर साखरचौथीलाही गणपती बसू लागले आहेत. भाद्रपदातील गणपतिउत्सवातसुद्धा फक्त विसर्जनाच्या मिरवणुकीस परवानगी असावी. आगमनाला मिरवणूक कशाला हवी? बरे या आगमनमिरवणुका एकाच दिवशी निघत नाहीत. दरदिवशी कुठल्या ना कुठल्या मंडळाची मिरवणूक तीन तीन तास सुरू असते. दसऱ्याला मेळावे भरतात, क्वचित कोठे मिरवणुका निघतात. आश्विन नवरात्र आता अधिकाधिक धूमधडाक्याने मोठय़ात मोठय़ा आवाजाने, आगमना-निर्गमनाच्या मिरवणुकांसह वाहतूककोंडीनिशी साजरे होते. दिवाळीत फटाके घरोघरी उडवण्यापेक्षा एका सार्वजनिक जागी उडवणे सुरू झाले आहे.. घरोघरचे थांबले नाहीतच; उलट ही नवी सार्वजनिक दिवाळी सुरू झाली. सार्वजनिक सत्यनारायण धडाक्यानेच होतात. पूर्वी माघातला गणपतीजन्म सार्वजनिक नव्हता. आता सार्वजनिक जागी मूर्ती बसवतात. फाल्गुनात शिवजयंतीचे व एरवीही विविध उत्सवीमंडप रस्ते अडवून आणि (बहुतेक वेळा) सार्वजनिक विजेतून तीन दिवस लखलखत असतात.
गुढीपाडव्याला शोभायात्रा निघू लागून जुन्या झाल्या. आता हे चत्री नवरात्र. सरकारने या नवनव्या सार्वजनिकीकरणाला अजिबात परवानगी देऊ नये. दर वेळी मंडपासाठी खोदाखोद करणे, विजेच्या दिव्यांच्या फर्लागभर माळा लावणे, ध्वनिवर्धकामुळे लोकांची झोप उडवणे, वाहतुकीचा खोळंबा करणे, किती सहन करावे?
या सगळ्याला परवानगी मिळू नये.
– राधा नेरकर, विलेपार्ले पूर्व (मुंबई)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा