‘कॉन्टिनेन्टल’ हा विजेता अश्व आजपर्यंत आपल्या धन्यासाठी जीव तोडून धावत असतानाच मरण पावल्याची बातमी (लोकसत्ता, १३ ऑक्टो.) वाचून सुन्न झालो. बिचाऱ्याला आपला शेवटही असा होईल याची पुसटशी कल्पनाही आली नसेल. मानव हा सर्वात घातकी प्राणी आहे, असे जंगलकथेत प्राण्यांच्या तोंडी असणारी मानवाबद्दलची उपेक्षितपणाची वाक्ये आम्ही अशा वागण्याने सार्थ ठरवत आहोत का, अशी परिस्थिती वरील घटनेने निर्माण झाली आहे. अनेक लोक भाकड गाई, म्हशी, म्हातारे घोडे, कुत्रे केवळ वयस्कर झाले म्हणून रस्त्यावर बेवारस सोडून देतात. अशा वेळी त्या मुक्या जिवावर काय परिस्थिती ओढवेल याचा पुसटसा विचारसुद्धा जर मनात येत नसेल, तर आम्ही खरोखर माणूस म्हणायला पात्र आहोत काय?

अशा वेळी स्मरण होते ते वाळवंटात गाढवाला पाणी पाजणाऱ्या एकनाथ महाराजांचे आणि लोक बिरादरी प्रकल्पात अनाथ प्राण्यांची पोटच्या मुलांप्रमाणे काळजी घेणाऱ्या प्रकाशभाऊ आमटे यांच्यासारख्यांचे. ‘कॉन्टिनेन्टल’चा शेवट चटका लावून गेला, तसेच प्राणिमात्रांबद्दलचे हे विचार समाजात रुजत नाहीत याची खंतही बळावली.
– बाळासाहेब बेकनाळकर, कोल्हापूर</strong>
कोकणकडय़ाला वाचवा!

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाला पडलेल्या भेगेबाबतचे वृत्त (२ ऑक्टो.) वाचले. या विषयाकडे लक्ष वेधले याबद्दल सर्वप्रथम ‘लोकसत्ता’चे धन्यवाद. हरिश्चंद्रगडच्या कोकणकडय़ास साहसवीरांच्या जगात खूप महत्त्व आहे. हा कडा म्हणजे निसर्गाने निर्माण केलेले एक अद्भुत रसायन आहे. हा कडा गिर्यारोहणामध्ये खूप वरच्या श्रेणीमध्ये पकडला जातो.अंतर्वक्र स्वरूपाच्या या कडय़ावर क्लायम्बिंग (प्रस्तरारोहण करणे), रॅपलिंग (दोरीच्या साहाय्याने कडा उतरणे), व्हॅली क्रॉसिंग (दोरीच्या साहाय्याने दरी ओलांडणे) आदी साहसी प्रकार सतत सुरू असतात. हे सर्व प्रकार इथे गिर्यारोहकांसाठी सतत आव्हान देणारे असतात. अशा या कडय़ाला भेग पडल्याचे वृत्त वाचल्यानंतर संभाव्य धोक्याची भीती चाटून गेली. काही वर्षांपूर्वी या कडय़ाचा काही भाग कोसळला होता. त्या वेळी काही गिर्यारोहक थोडक्यात बचावले होते. या कडय़ावर रोज अनेक पर्यटक, दुर्गप्रेमी, गिर्यारोहक येत असतात. अशा वेळी या भेगेकडे दुर्लक्ष करणे भविष्यात एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. शासनाने तातडीने या विषयांतील अभ्यासकांच्या मदतीने या कडय़ाला वाचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे वाटते.
– उमेश झिरपे, पुणे</strong>
हा राष्ट्रीय गुन्हाच

हरिश्चंद्रगडाच्या कोकणकडय़ाला पडलेल्या भेगेबाबतचे वृत्त व त्यावरील पत्रव्यवहार (लोकमानस, ९ व १० ऑक्टो.) वाचले. हा गड आणि त्याच्या या कडय़ास महाराष्ट्राच्या दुर्गसंपत्तीमध्ये खूप मानाचे स्थान आहे.
शासनाने तातडीने या कडय़ाला निर्माण झालेल्या या धोक्याचा अभ्यास करून त्यावर उपाय योजणे गरजेचे वाटते; परंतु या जोडीनेच या वृत्तातील अन्य एका विषयाकडे लक्ष वेधू इच्छितो. या कडय़ावर सुरक्षेसाठी लावलेले कठडे काहींनी परस्पर खाली दरीत टाकून दिल्याचेही समजले. ही वृत्ती खूप गंभीर आहे. हे कठडे सगळ्यांच्याच सुरक्षेसाठी लावलेले असतात. तसेच त्यांची उभारणी ही जनतेच्या पैशातून होत असते. असे कठडे कुणाला तरी वाटले म्हणून त्यांनी फेकून देणे हा राष्ट्रीय गुन्हा आहे. या घटनेचाही शोध घेतला जाणे गरजेचे वाटते.
– चंद्रशेखर शेळके
सदस्य, राज्य शासन दुर्ग संवर्धन समिती

जिज्ञासा दाबून टाकणे म्हणजेच खरी गुरुभक्ती?

१५ ऑक्टोबरच्या ‘अभंगधारा’मध्ये शिष्याने सद्गुरूच्या आज्ञेबाहेर जराही असू नये, स्वत:ची वकिली किंवा युक्तिवादही करू नये, असा उपदेश सांगितला आहे. हे सर्व आत्मोन्नतीकडे नेणारे आहे की बौद्धिक गुलामीकडे? यंत्रवत आज्ञा पाळा (तेही कधी कधी आज्ञा पाळत नाही.) हा उपदेश मुळात माणुसकीत बसतो काय?
शंका विचारताना, युक्तिवाद करताना अत्युच्च नम्रतेचा आग्रह रास्त ठरेल, पण स्वत:ची जिज्ञासाच दाबून टाकणे म्हणजेच खरी गुरुभक्ती हे कसे मान्य व्हावे? खुद्द भगवद्गीताही ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्। संशयात्मा विनश्यति।’ असे म्हणत असेल तर त्यास काय म्हणावे? याउलट ‘शंकावान लभते ज्ञानम’ असे म्हणायला हवे, कारण प्रश्न विचारल्याशिवाय नव्याने ज्ञान प्राप्त कसे होणार?
याउलट भगवान बुद्ध यांचा ‘मी जे काही सांगितले म्हणून केवळ विश्वास ठेवू नकोस, कोणी प्रसिद्ध व्यक्ती म्हणते, म्हणून तू ऐकू नकोस. तुझ्या सदसद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटेल त्यावरच विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण कर’ हा उपदेश आजच्या विज्ञानयुगाला साजेसा वाटतो. अर्थात कुठल्या धर्मातील उपदेश सरस हे दाखवून देण्याचा अजिबात उद्देश नाही.
– अनिल मुसळे, ठाणे</strong>

बाहुल्यांचे आकर्षण

सध्या वृत्तपत्रांत दुर्गा, काली अशा मूर्तीचे सुंदर फोटो येतात. विशाल नेत्र, उंचावलेल्या भुवया, रौद्रमुद्रा अशा भव्य अष्टभुजा मूर्ती चौका-चौकांत दिसतील.
दर्शनाला माणसांच्या झुंबडी लोटतील. महिन्यापूर्वी विविध रूपांतील गणेशमूर्ती, लोभसवाण्या गौरी, हिरवी साडी, नाकात नथ, गळ्यात हार, सस्मित मुखावर सात्त्विक भाव. सजावटीत आणखी मूर्ती. या बाहुल्याच बाहुल्या पाहायला अलोट गर्दी झाली. माणसांना मूर्तीचे इतके विलक्षण आकर्षण का? नुसते आकर्षण नव्हे, तर ही देवी आहे.
ती दुष्टांचा नि:पात करील. आमचे रक्षण करील, अशी अनेकांची श्रद्धा असते. याविषयी वैज्ञानिक कार्ल सेगन लिहितात, ‘‘जन्मलेले अर्भक जेव्हा डोळे उघडते तेव्हा त्याला सर्वप्रथम दिसतो आईचा (अथवा दाईचा) सस्मित चेहरा. या अपरिचित जगात ही आपले रक्षण करील असे त्याला वाटते. मानवी चेहरा-कपाळ, कान, नाक, डोळे, तोंड- ही प्रतिमा त्या चिमुकल्या मेंदूत ठसून राहते.’’
मूल मोठे झाल्यावर त्याला माणसाच्या मर्यादा समजतात. आई सदैव माझे रक्षण करू शकणार नाही हे कळते. पण सर्वप्रथम उमटलेली ती आश्वासक प्रतिमा विसरली जात नाही. मग माणूस मूर्ती घडवतो. देवळात स्थापतो. ती शक्तिमान आहे असे मानतो. तिची पूजाअर्चा, प्रार्थना करतो. दुर्गामातेच्या उत्सवाची प्रथा पडते.
-प्रा. य. ना. वालावलकर, पुणे

Story img Loader