‘तेल आले, पण डाळ गेली’ हा अग्रलेख (१६ ऑक्टो.) वाचला. ज्या दरिद्रीनारायणाचे आणि शेतकऱ्याचे उठताबसता नाव घेत मोदींनी निवडणूक जिंकली त्याच गरिबाला सत्तेवर येऊन दीड वष्रे होण्याच्या आतच महागाईच्या गत्रेत लोटण्याचा उद्दामपणा त्यांच्या सरकारने केला. यासारखी कृतघ्नता दुसरी कुठलीही नसेल. सरकारला हे माहीत नाही का, की देशाला अवर्षणाचा जबरदस्त फटका बसला आहे? त्यांना माहीत नाही का, देशावर नापिकीची अवकळा पसरली आहे? त्यांना माहीत नाही का, शेतकरी डाळींचे पीक घेण्यास उत्सुक नाही? हे माहीत नसेल, तर त्यांना देशात काय चालले आहे हेच माहीत नसावे. बरे हे माहीत असूनही पुरेशी डाळ आयात न करता डाळींसारख्या रोजच्या खाद्यान्नाचे भाव गगनाला भिडू देण्याचे पातक ज्या अर्थी हे सरकार करते त्या अर्थी सामान्य जनतेच्या जगण्या-मरण्याचे त्यांना थोडेही सोयरसुतक नसावे. एकीकडे शेतकऱ्याला डाळीचे किलोला ३० रुपये मिळतात आणि बाजारात जनतेला २०० रुपये मोजावे लागतात. या बेपर्वा धोरणामुळे साठेबाजांशी या सरकारचे साटेलोटे असावे, असा संशय निश्चितच बळावतो. ‘आता आम्ही हजारो टन डाळ आयात करणार आहोत’ ही घोषणा म्हणजे रोगी मरून गेल्यावर उपचार सुरू करण्यासारखे आहे. तेल आले ते तेलाचे आंतरराष्ट्रीय भाव कोसळल्यामुळे, पण डाळ गेली ती सरकारच्या बेफिकिरीमुळे असेच म्हणावे लागेल. व्हॉट्सअॅपवर सध्या एक जोक फिरतोय – डाळीचे भाव पाहून एका माणसाचा जीव गेला. डॉक्टरने डेथ सर्टिफिकेटमध्ये मृत्यूचे कारण लिहिले ‘नो पल्स’!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा