कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार केवळ १२ टक्क्यांनी तुरीचे उत्पादन कमी झालेले असताना डाळीचे भाव १०० टक्के कसे वाढले? या प्रश्नाचे उत्तर ‘साठेबाजीमुळे’ असे देण्यास ना कोण्या ज्योतिषाची गरज आहे, ना अर्थशास्त्राचा विशेष अभ्यास असण्याची; परंतु ‘साठेबाजी’ची व्याख्याच केलेली नसल्याने व्यापाऱ्यांनी मनसोक्त साठा केला, खूप पसे कमवून घेतले व नंतर शासनाने विशेष अध्यादेश काढून साठेबाजीची व्याख्या जाहीर केली. नंतर लगेचच धडाधड छापे टाकून ठिकठिकाणी तुरीची डाळ जप्त केली. आपण जेवढी डाळ आयात करणार होतो त्याच्या दहा पटीहून अधिक डाळ जप्त केल्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या.
आता भरपूर तुरीची डाळ बाजारात येईल व स्वस्त होईल, अशा भाबडय़ा समजुतीने सामान्य मध्यमवर्गीय व गरीब जनता खूश झाली. तेव्हा, आता ही जप्त केलेली तूरडाळ बाजारात केव्हा येते याकडे जनता डोळे लावून बसली आहे. कायदेशीर अडचणींचे सव्यापसव्य करता करता जप्त केलेली महाप्रचंड तूरडाळ गोदामातच सडून न जावो, अशी जनतेची अपेक्षा आहे. शासनाने याबाबतचे धोरण जाहीर करावे.
– प्रफुल्ल चिकेरूर, नाशिक
उशिराचे शहाणपण..
‘सरकारची डाळ शिजेना..’ हा ‘अन्वयार्थ’ (२२ ऑक्टोबर) वाचला. तसेच प्रशांत कुलकर्णी यांनी ‘काय चाललंय काय’खाली काढलेलं ‘साठेबाज हातावर ‘तुरी’ देऊन पळाले’ हे व्यंगचित्र त्याला अगदी पूरक आहे.
मुळात उद्योगधंदे, व्यापारी, बिल्डर, रस्ते-पूल बांधणारे कंत्राटदार यांच्या बाबतीत त्या त्या लोकांचं उखळ पांढरं होऊ देण्यात आपले आíथक हितसंबंध जपण्याची परंपरा मोडून काढली, तर जनतेला आपण सरकार बदलल्याचं सार्थक झालं असं वाटेल, हे भाजपनं कायम लक्षात ठेवलं पाहिजे असं वाटतं.
पावसामुळे सर्वच प्रकारच्या डाळींचं उत्पादन सर्वच ठिकाणी कमी झालेलं आहे हे उघड दिसत असताना, साठेबाजीचा प्रयत्न होणार हे सरकारला वेळीच लक्षात आलं नाही का आणि आलं असेल तरी ‘मूग गिळून गप्प’ बसण्यात कोणाला फायदा आहे, असे प्रश्न पडतात. साठेबाजीमुळे वाढलेल्या दरात माल घेण्यास किरकोळ विक्रेतेही अनुत्सुक होतात आणि नागरिकही ते पदार्थ नित्याच्या आहारात वापरण्याचं कमी करतात; पण हे किती दिवस चालणार अन् याच मानसिकतेचा फायदा काही जण घेतात, ही खेदजनक बाब आहे. ‘तहान लागल्यावर विहीर खणण्याची सरकारची मनोवृत्ती’ बदलणं आवश्यक आहे. स्मार्ट शहरं बनवण्याच्या खटाटोपात जीवनावश्यक अन्नपदार्थ सर्वसामान्यांच्या आमदनीच्या आवाक्याबाहेर जाणे याकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. त्यासाठी पिकं घेतली जातात तेव्हापासूनच, त्यांच्या उत्पादनाची आकडेवारी जमवणं आणि ठिकठिकाणी योग्य वेळी योग्य भावात वितरण होण्याची जबाबदारी निश्चित करणं, उत्पादकांना खेडी-शहरं इथपर्यंत माल वाहतुकीची सोय रास्त दरांत करून देणं, किरकोळ विक्रेत्यांकडे तसेच रास्त भाव दुकानांतही सर्वसामान्यांना परवडतील अशा भावात धान्य-डाळी उपलब्ध होत आहेत ना हे पाहणं यासाठीचं व्यवस्थापन हातात घेतलं गेलं पाहिजे.
– श्रीपाद पु. कुलकर्णी, पुणे</strong>
चटका लावणारी निवृत्ती
काही दिवसांपूर्वी झहीर खान निवृत्त झाला. पाठोपाठ ‘वीरू’ने निवृत्ती जाहीर केली आणि क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला. राहून राहून वाटते, जशी सचिनला मानाने निवृत्ती मिळाली तशी ‘वीरू’लासुद्धा मिळाली असती तर किती बरं वाटलं असतं, कारण त्या मानाचा तो हक्कदार आहे. आऊट झालो तरी किंवा कितीही काहीही झालं ‘तरी मी माझा आक्रमक खेळ सोडणार नाही’ या त्याच्या वृत्तीने त्याने आपला एक चाहता वर्ग तयार केला होता. शिवाय असं भाग्य सर्वानाच लाभत नाही, जसं सचिन आऊट झाल्याबरोबर त्याचे चाहते दूरदर्शन संच बंद करून आपल्या दुसऱ्या कामाला लागायचे. सामना फििक्सग प्रकरण किंवा प्रसिद्धीने डोक्यात हवा जाणे अशा गोष्टींपासून तो चार हात दूरच असायचा. त्याचं खेळणं जरी आक्रमक असलं तरी खिलाडूवृत्तीला कधी त्याने धक्का लागू दिला नाही. म्हणूनच तो चाहत्यांच्या गळय़ातील ताईत बनला होता. म्हणून त्याची उणीव भरून काढणे टीम इंडियाला शक्य नाही. ‘वीरू’सारखा खेळाडू होणे नाही.
– रवींद्र गुरव, विरार
दसरा मेळाव्याचे फलित
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर काल पार पडला. शिवसेना केंद्रात आणि राज्यातही भाजपबरोबर सत्तेत आहे; परंतु शिवसेनेला एका गोष्टीची खंत नेहमीच वाटत आलेली आहे, ती म्हणजे भाजपने सत्तेवर येताच आपले पूर्वी वेळोवेळी जाहीर केलेले परराष्ट्रीय आणि पाकिस्तानबद्दलचे धोरण आता पूर्णपणे बदललेले आहे. तसेच िहदू-मुस्लीम विषयात भाजप आता काय आणि कशी भूमिका घेतो हेदेखील त्यांनी सोदाहरण दाखवून दिले. त्यातल्या त्यात भारत हे िहदू राष्ट्र म्हणून जाहीर करणे आणि समान नागरी कायदा अमलात आणणे आणि घटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणे या प्रमुख भूमिकांवर आता त्यांनी सपशेल यू टर्न घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांबद्दलची भाजपची भूमिकाही पूर्वीपेक्षा अचंबित करणारी ठरत आहे. पूर्वी उद्धवनी टीका केली की, वर्तमानपत्रातील टीकेला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही, अशी भूमिका जाहीर करून भाजप नेते अनुल्लेखाने मारायचे ठरविले होते. आता पक्षप्रमुखांची भूमिका तर जगजाहीर झाली आहे. आता यासाठी भाजपकडे काय उत्तर असणार? भाजपला आपल्या पूर्वीच्या भूमिकेची आठवण करून देणे हे या वर्षीच्या दसरा मेळाव्याचे फलित आहे. राजकीय फायदे-तोटे होत राहतील तरीही महाराष्ट्रात राजकीय अस्थर्य आणून राज्याचे नुकसान आम्ही करू इच्छित नाही, हादेखील संदेश त्यातून मिळाला आहे.
– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)
सकारात्मक उन्माद का नाही वाढत?
मोदी सरकार आल्यापासून धार्मिक उन्माद, विशेषत: िहदुत्ववाद्यांचा उन्माद खूप वाढत आहे. पूर्वी समाजमाध्यमांमधून कुणी धार्मिक अथवा सामाजिक सुधारणेबाबत बोलले, तर त्याला धर्मद्रोही, देशद्रोही म्हणण्यापासून त्याला पाकिस्तानचा हस्तक ठरवण्यापर्यंत कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया दिली जायची. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून ‘चालते व्हा’चा नारा सुरू झाला. तुम्हाला आमचे म्हणणे ऐकायचे नसेल, तर पाकिस्तानला जा, अशा स्वरूपाची दमबाजी सुरू झाली. गणेशोत्सवाच्या काळात ‘ज्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो त्यांनी पाकिस्तानला जावे’ अशा पोस्ट फिरत होत्या. अलीकडे अमक्या रस्त्यावरून गाईंनी भरलेला ट्रक निघाला आहे. त्या भागातील लोकांना सतर्क करण्यासाठी हा मेसेज पुढे पाठवा, अशा पोस्ट फिरत आहेत. आता तर उघडपणे माणसे मारणे सुरू झाले आहे आणि त्याचे समर्थनही केले जात आहे. हा सगळा वाढत्या धार्मिक उन्मादाचा परिणाम आहे. खरे तर हा उन्माद मोदी सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियान, गॅस अनुदान परत करण्याची मोहीम अशा सकारात्मक बाबतींत दिसायला पाहिजे होता; पण इथे मात्र अंधभक्तांनी आपली भक्ती दाखवली नाही. इथे कोणाचाही द्वेष करायला मिळत नाही, हे तर त्याचे कारण नसावे?
– वाघेश साळुंखे, वेजेगाव, ता. खानापूर (सांगली)