‘सामीला नागरिकत्व नकोच’ (लोकसत्ता, २६ ऑक्टो.) हे पत्र वाचले. पत्रलेखक पाकिस्तानी गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व देण्यास विरोध करतात. अर्थात असे करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे; परंतु सामीच्या नागरिकत्वाला विरोध करताना सर्वसामान्य पाक नागरिकांबद्दल आक्षेपार्ह टीकाटिप्पणी करणे योग्य नाही. ‘शेवटी पाकिस्तानी ते पाकिस्तानी’, ‘वाकडे शेपूट सरळ होणार नाही’, ‘कोणत्याही थराला जाऊ शकतात’ अशा प्रकारचे शब्दप्रयोग पाक कलावंत किंवा सामान्य पाक नागरिक यांच्याबद्दल वापरण्यात काय अर्थ आहे?

भारत-पाक या दोन राष्ट्रांत सतत संघर्ष चालू असतो. आत्तापर्यंत भारताची पाकसोबत तीन युद्धे झाली आहेत. एकमेकांचा द्वेष करण्यासाठी आयतीच धर्माची फोडणी हमखास देता येते. भारतीयांचा पाकला जो विरोध आहे तो तेथील सामान्य नागरिक किंवा कलावंत यांना नसून पाकमधील धर्माध राजकीय नेतृत्व आणि लष्कराने पाळलेल्या दहशतवादी संघटना यांना आहे, हे वास्तव आपण प्रथम मान्य केले पाहिजे. काश्मीर प्रश्नावरून तर दोन्ही देशांतील वातावरण नेहमीच तापलेले असते. असे असूनही भारताने पाकसोबतचे किंवा पाकने भारतासोबतचे संबंध कधीही पूर्णत: तोडलेले नाहीत. ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची अधिकृत शत्रुराष्ट्रे नाहीत. या दोन्ही राष्ट्रांत व्यापार सुरळीत चालू असून तो आणखी वाढवण्यासाठी भारत-पाक दोघेही प्रयत्नशील आहेत. दोन्ही देशांत क्रिकेटचे सामने होण्यासाठी ‘बीसीसीआय’ व ‘पीसीबी’ यांच्यात चर्चा चालू आहे. सांस्कृतिक पातळीवर देवाणघेवाण चालू आहे. दोन्ही देशांतील संघर्ष थांबावा, अशीच दोन्हीकडच्या सामान्य नागरिकांची इच्छा असेल. त्यामुळे पाक कलावंतांचे कार्यक्रम उधळणे, पाकिस्तानी नागरिकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे अशा गोष्टींमुळे द्वेष वाढतच जाईल. एकीकडे आपण भारतीय संस्कृती सहिष्णू आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे असहिष्णुतेचे दर्शन घडवायचे, यामुळे आपल्या देशाचेच नाव खराब होईल.
– प्रकाश पोळ, कराड (सातारा)

प्रतिकात्मक तरी बदल हवा!

‘प्रतिभेचा प्रक्षोभ हवा’ हा अग्रलेख (२६ ऑक्टोबर) वाचला. या सरकारच्या बाबतीत प्रतीकात्मक असला तरी काही तरी ठोस दृश्य फरक सर्व जनतेला रोज दिसत राहणे खूप महत्त्वाचे आहे आणि नेमके त्याकडेच दुर्लक्ष होत आहे असे वाटते. दूरगामी आणि चांगला परिणाम साधणारे निर्णय जितके महत्त्वाचे तितकेच (किंबहुना थोडे अधिकच) हेही महत्त्वाचे आहे. नाही तर घराबाहेर पडल्यावर सगळे मागच्या पानावरून तसेच पुढे चालू आहे, अशी भावना सामान्य नागरिकांत लगेच निर्माण होते.
हाती आलेली रिकामी तिजोरी, दुष्काळी परिस्थिती, भाववाढ, अशा नकारात्मक वातावरणात तर याची नितांत गरज आहे. मनोहर जोशींच्या काळात स्थिर भावांची पाटी मंत्रालयावर सतत दिसत होती. नवीन तेलंगणा राज्यात लगेच पोलिसांच्या नव्याकोऱ्या देखण्या गाडय़ा व त्यांचा बदललेला आत्मविश्वासपूर्ण वावर रोज नजरेत भरत होता. फडणवीस सरकारने यातून योग्य ते शिकावे. व्यवस्थापन आणि विपणन शास्त्रातले धडे राजकारणात गिरवण्यात भाजप निष्णात समजला जातो. अशा पक्षाच्या सरकारला ‘्रल्ल२३ंल्ल३ ॠ१ं३्रऋ्रूं३्रल्ल’चे महत्त्व उमगू नये याचे आश्चर्य वाटते.
– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>

सेवा-परीक्षांची चिंता कुणाला?

सुमारे ७५हजार बारबालांच्या उदरनिर्वाहाची चिंता असणाऱ्या फडणवीस सरकारला राज्यातील लाखो होतकरू व पदवीधर बेरोजगार तरुणांच्या उदरनिर्वाहाची काहीच चिंता नसल्याचे या सरकारच्या धोरणांतून दिसत आहे. सरकारी तिजोरीचे कारण देत या सरकारने नोकरभरती बंद केली आहे. त्यामुळे २०१५ सालचे ‘एमपीएससी’चे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले आहे. तसेच २०१६च्या राज्यसेवा परीक्षेची वाट पाहात पाचपाच वष्रे बेरोजगार राहून ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यात या परीक्षांच्या भरतीला ‘प्रादेशिक समतोला’चा मापदंड जोडत, समित्या नेमत विद्यमान सरकार आपल्याच मनमर्जीने निव्वळ वेळकाढूपणा करत असल्याने, या सरकारने एक प्रकारे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा छळवादच मांडला आहे. सहायक विक्रीकर निरीक्षक (एसटीए) परीक्षेनंतर आठ महिने उलटूनही निकाल प्रलंबित आहेत. आयोग म्हणतो, सरकारचे आदेश नाहीत. हे कधी थांबणार? केंद्रात व राज्यात भाजप सरकार निवडून येण्यामध्ये या तरुण पिढीचा मोलाचा वाटा होता, पण निवडून येताच या सरकारने काय केले हे दिसतेच आहे.
– समीर बाबासाहेब काळे, इंदापूर (पुणे)

‘असते’पाशी उत्तरे का थांबतात ?

शरद बेडेकर यांचा ‘नास्तिक म्हणजे दुर्जन?’ हा लेख (२६ ऑक्टो.) वाचून असे वाटते की, जो कर्मकांड करतो तो आस्तिक आणि जो देवाला मानत नाही तो नास्तिक. पण या व्याख्या तोकडय़ा आहेत. प्रत्येक घटना अनुकूल का घडत नाही? आपल्या कर्माला नेहमीच अपेक्षित फळ का मिळत नाही? आपल्या जीवनाचा नेमका उद्देश काय? एखादी शक्य असणारी गोष्ट अशक्य होते वा अशक्य गोष्ट सहज का होते? या व अशा अनेक प्रश्नांवर माणसाने बरेच तर्क केले, खूप विचार केला व असा निष्कर्ष लावला की या जगात अशी एक शक्ती आहे की ज्यावर आपले नियंत्रण चालत नाही, तीच शक्ती हे सर्व जग चालवते.
आजही माणूस जेव्हा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करताना त्याची बुद्धी जेथे थांबते त्या ठिकाणी तो एक ‘नियम’ किंवा ‘सिद्धांत’ तयार करून रिकामा होतो. आणि त्याच नियमानुसार इतर नवीन गोष्टींचा शोध घेतो. झाडावरचे फळ खालीच का पडते? याचे उत्तर देताना माणूस म्हणतो, पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते. या ‘असते’पाशी आमची तर्कबुद्धी थांबते. अरे पण का असते? ही शक्ती निर्माण कोण करतो? धन आणि ऋण प्रभारामध्ये आकर्षण का असते? ऊर्जा निर्माण किंवा नष्ट का होत नाही? एकदा बंद पडलेले हृदय पुन्हा चालू का करता येत नाही? उष्णतेमुळे द्रवावस्था वायू व शीतलतेमुळे वायू अवस्था द्रव का होते? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच असते’ या ठिकाणी संपतात. जेथे नियम व सिद्धांत असतात तेथे ते नियम व सिद्धांत ठरवणारा व बनवणारा कोणी तरी असतो. आणि हा जो ‘कोणी तरी’ आहे त्यालाच मानवाने देव, गॉड, अल्लाह अशी वेगवेगळी नावे दिली. या शक्तीला फक्त माणूसच ओळखू शकतो पशू नाही. यामुळे असा प्रश्न पडू शकतो की, देवाने माणूस निर्माण केला की, माणसाने देव निर्माण केला? याचे उत्तर अगदी सोपे आहे, आई मुलाला जन्म देते का मूल आईला जन्म देते? तर दोघेही एकमेकांना जन्म देतात, कारण मुलामुळेच ती ‘आई’ होते. पूर्वी ती एक फक्त स्त्री असते. तसेच देवाचेही आहे.
माणसातील एक गुण त्याला पशूपासून वेगळे ठरवतो तो म्हणजे ‘कृतज्ञता’. याच कृतज्ञतेतून माणूस देवाची पूजाअर्चना करत असतो. पण आज भक्ती करण्याच्या पद्धती व हेतू पूर्णपणे बदलले आहेत. त्यामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. आस्तिक हा फक्तमाणूसच असू शकतो. याचा अर्थ नास्तिक लोक पशू आहेत असे नाही.
– डॉ. हृषीकेश कवचट (बीड)

मनसे कोणत्या आक्रमकतेचा पुरस्कार करते आणि कसा?

राज ठाकरे यांची विकासाबाबतची तळमळ आणि भ्रष्टाचारविषयीची चीड मला स्वत:ला प्रामाणिक वाटते, पण रविवारी त्यांनी कल्याणच्या प्रचारसभेत शिवसेनेला ‘डरपोक’ ठरवणारी तिच्या बालिशपणाची जी उदाहरणे दिली ती मान्य असली तरी त्यांनी ज्या स्वरूपाच्या आक्रमकतेचा पुरस्कार केला तो मात्र मान्य नाही.
वास्तविक मनसेची आजवरची आक्रमकता ही ‘ गिऱ्हाईक बघून पुडी बांधणे’ असाच प्रकार होता. साहित्यिक, विचारवंत, फेरीवाले, थिएटर मालक यांच्या कानफटात मारणे अगदीच सोप्पे! पण त्यांच्यापकी कोणी सन्यात दाखल होण्याचे सोडाच, पण मुंबईच्या ‘भाईं’पर्यंत पोहोचण्याचे धाडस दाखवले आहे काय? कुळकर्णी यांच्या कानफटात मारण्याऐवजी अशा कार्यक्रमांना परवानगी देणाऱ्या मंत्र्यांच्या कानफटात मारण्याचे धाडस आहे काय? – असे धाडस दाखवावे असे येथे अजिबात सुचवायचे नाही.
किंबहुना त्यांच्या िहसक आंदोलनाविरोधात खटला दाखल केला गेल्यावर ‘ते आमचे कार्यकत्रे नव्हते, पक्षनेतृत्वाचा तसा आदेश नव्हता,’ अशी कातडी बचाऊ भूमिकाच न्यायालयांत कित्येकदा मांडण्यात आली आहे.
– अनिल मुसळे, ठाणे

Story img Loader