‘आमचे सनिक मारले जात असताना पाकडय़ांना पायघडय़ा कशाला?’ असे म्हणत पाकिस्तानी कलाकार, खेळाडू यांच्याविरोधात शिवसेना ‘सध्या’ भलतीच आक्रमक झालीय. पण सेनेची व सेनेच्या या देशाभिमानी विचारांवर फिदा असणारांची अमेरिकेबाबत काय भूमिका आहे?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१४ लढाऊ, तर ५९ प्रशिक्षण विमाने आणि ३७४ रणगाडे या वर्षी अमेरिकेने पाकिस्तानला विकल्याची बातमी ताजी आहे. एफ १६ ही विमाने अद्याप विकलेली नाहीत, असे अमेरिका म्हणते (पण विकणारच नाहीत असेही नाही). ही खरेदी संग्रहालयात ठेवण्यासाठी पाकिस्तान करते आहे का? नुसते पुस्तक प्रसिद्ध करताहेत म्हणून शाई फेकलीत. इथे तर शस्त्रेच विकलीत. आणि हे वर्षांनुवष्रे चालले आहे. काय म्हणणे आहे यावर या देशभक्तांचे?
नथुरामची जयंती साजरी करणारे यावर म्हणतील, यात अमेरिकेचा काय दोष? त्यांनी फक्त व्यवहार केला- त्या शस्त्रांचे पाकने काय करावे हे अमेरिका कसे काय ठरवील? अमेरिका-गांधी ही तुलना अस्थानी आहे, पण ५५ कोटी पाकला द्या म्हणणारे गांधी (‘त्या पैशांचे त्यांनी काय करावे हे ते ठरवतील’, यापेक्षा) वेगळे काय सांगत होते? तरीही ‘५५ कोटींचे बळी’ म्हणत गांधी खुनाचे आजही समर्थन नथुरामसमर्थक करतात ना? मग जो न्याय गांधींना लावलात तोच बराक ओबामांना लावणार का?
तिकडे पाकला हाताशी धरून चीनची अरेरावीही सुरूच आहे आणि केंद्र सरकारने एक सेझ प्रकल्पच चीनला देऊन टाकलाय! सेना सत्तेत आहे ना, विचारले आहे कधी?
– आनंद भंडारे, वरळी

‘आम्ही म्हणतो, नको’ हे
समांतर सत्तास्थानाचे लक्षण

गुलाम अली नकोत! कसुरी नकोत! पाक क्रिकेट नको! कारण काय, तर म्हणे ते सर्व दहशतवादी राष्ट्रातून येणार म्हणून! खरे तर ही सर्व देशातील लोकांनी, लोकांसाठी लोकनियुक्त सरकारने धोरणात्मक निर्णय घ्यायची बाब. राजकारण वेगळे, कला वेगळी, मैत्री वेगळी. पण एखादे समांतर सत्तास्थान निर्माण होते; तेव्हा ‘असं का हो? असं कसं हो?’ प्रश्न केला, तर उत्तर येते- ‘आम्ही म्हणतो म्हणून!’ नाझींचा उदय असाच झाला होता हे आपण सोयीस्कर विसरतो.
– रवी कुलकर्णी, पुणे</strong>

दाऊद आला असता, तर?

‘छोटा राजनला अटक’ (लोकसत्ता, २७ ऑक्टो.) या बातमीत पुढे म्हटले आहे की, दाऊदलाही भारतात परतायचे होते, पण त्याच्या काही अटी सरकारला मान्य झाल्या नाहीत. झाले ते एका अर्थाने बरेच! अन्यथा दाऊद भारतात आला असता व त्याच्यावर वर्षांनुवष्रे खटला चालला असता. शिवाय ‘मी चुकलो, मला क्षमा करा’, अशी याचना त्याने केली असती, तर येथील यच्चयावत बुद्धिवंत, माध्यम-पंडित, पुरोगामी मंडळी आणि िहदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याला फाशी न देण्याबद्दल साकडे घातले असते व बॉम्बस्फोटात जी शेकडो माणसे मेली, त्यांचे कुटुंबीय मूकपणे बघत बसले असते.
– अभय दातार, ऑपेरा हाऊस (मुंबई)
मग देशद्रोहाची नेमकी व्याख्या काय..?

‘दादरीची जखम खोलच..’ या योगेंद्र यादवांच्या लेखात (‘देशकाल, २१ ऑक्टो.) स्पष्टपणे लिहिलेले आहे की, ‘संघ परिवार या देशाच्या राज्यघटनेलाच मानायला तयार नाही.. त्यांचे स्वप्न भारताला पाकिस्तानसारखे एककल्ली बनवण्याचे आहे. बहुसंख्याकांचे वर्चस्व असलेल्या ‘िहदू पाकिस्तान’ची निर्मिती त्यांना करायची आहे’.
राज्यघटनेला न मानणे हा देशद्रोह नसेल, तर देशद्रोहाची नेमकी व्याख्या काय? योगेंद्र यादवांच्या त्या वाक्याला संघाने विरोध केल्याचे वाचण्यात आलेले नाही. आठवडा उलटला तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही; म्हणजे काय समजायचे..?
राज्यघटनेला न मानणे तर सोडाच, भ्रष्टाचारी अधिकारी व राजकारण्यांनासुद्धा देशद्रोहीच समजले पाहिजे. राष्ट्रध्वजाला सलामी देणे ‘एवढीच’ देशभक्ती हा जो विचार आहे तो बदलला पाहिजे. नंतरही भ्रष्ट व्यवहार सुरूच राहात असतील तर तो राष्ट्रध्वजाचा खरा अपमान आहे, हा विचार या देशात जोपर्यंत रुजत नाही तोवर न्याय प्रस्थापित होणार नाही.
– सय्यद मारुफ सय्यद महेमूद, नांदेड</strong>

महाराष्ट्रीय एकमेकांचा विचार करतात?

गोढाळा (चाकूर, जि. लातूर) या गावातील, ११वीत शिकणाऱ्या स्वाती विठ्ठल पिटले या विद्यार्थिनीने महाविद्यालयात जाण्यासाठी एस.टी. पासाला पसे नसल्याने व गरिबीला कंटाळून आत्महत्या केली ही घटना मनाला वेदना देणारीच होय. एकीकडे शहरे वा काही गावातीलही महाविद्यालयीन विद्यार्थी दहा-वीस हजाराचे मोबाइल, तीस-चाळीस हजारांचे लॅपटॉप, स्वतचे वाहन वापरतात, तर खेडय़ात एक विद्यार्थिनी दोन-अडीचशे रुपये मिळत नसल्याने मृत्यूला कवटाळते, याला काय म्हणावे?
आपल्या महाराष्ट्रात जनतेकडून एकमेकांच्या परिस्थितीचा, भावभावनांचा विचार होत नाही, असे दिसते. एकीकडे दुष्काळ आणि शहरात पाण्याचा अपव्यय, एकीकडे गरिबी तर दुसरीकडे श्रीमंती बेजबाबदारपणा! आठ-दहा दिवस होऊनही कुणीही लोकप्रतिनिधी गोढाळा गावापर्यंत पोहोचले नाहीत, यावरून आमच्या नेत्यांची तत्परताही दिसून येते.
– मनमोहन रो. रोगे, ठाणे.
‘असते’पाशी उत्तरे थांबत नाहीत..

‘‘असते’पाशी उत्तरे का थांबतात?’ या शीर्षकाचे आणि हा प्रश्न विज्ञानाबाबतही उपस्थित करणारे पत्र (लोकमानस, २७ ऑक्टो.) गुरुत्वाकर्षणासह अनेक बाबींमध्ये ‘असते’पाशी मानवी तर्कबुद्धी थांबते, असे पत्रलेखकाने म्हटले आहे. या मताच्या समर्थनार्थ त्यांनी काही प्रश्नरूपी उदाहरणेही दिली आहेत.
पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती असते, या ‘असते’पाशी माणसाची तर्कबुद्धी कधीच थांबलेली नाही. आइन्स्टाइनसह अनेकांनी गुरुत्वाकर्षण शक्तीची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी वेगवेगळे तर्क मांडले आहेत. गुरुत्वाकर्षण शक्तीला कारणीभूत ठरणारे अतिसूक्ष्म कण असावेत, असाही तर्क केला गेला आहे. स्वित्र्झलड येथील ‘लार्ज ह्रेडॉन कोलायडर’ या अवाढव्य यंत्राद्वारे अशाच काही अतिसूक्ष्म कणांचा शोध घेतला जात आहे. तो तर्क खरा ठरला तरीही गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल विचार करणे, तर्क करणे संपेल असे मात्र नाही.
हे अतिसूक्ष्म कण अस्तित्वात कसे आले, ते ठरावीक पद्धतीने का वागतात, वगरे कुतूहले माणसाच्या मनात उद्भवतीलच. अशा शंकांवर उत्तरे शोधण्यासाठी नवीन तर्क केले जातील. त्यांचा पडताळा घेण्यासाठी नवीन प्रयोग केले जातील. याच अनुषंगाने पत्रलेखकाने उदाहरणादाखल मांडलेल्या इतर प्रश्नांबाबत विचार करता येईल.
मुळात तर्क करण्याच्या प्रक्रियेला कधीही पूर्णविराम नसतो. एखादा तर्क एक तर बरोबर ठरू शकतो किंवा चुकीचा ठरू शकतो. तर्क चुकीचा ठरला तरी तो पर्यायी तर्क मांडण्यासाठी प्रवृत्त करतो. यातून अचूक तर्कापर्यंत किंवा सत्यापर्यंत पोहोचण्यास मदतच होते.
समस्येचे उत्तर तथाकथित ‘कुठल्या तरी शक्तीच्या नियंत्रणात’ आहे, असे म्हटले तर असा तर्क शेवटचा असेल. मग माणूस समस्या मुळापासून सोडविण्याच्या दृष्टीने इतर तर्क करणेच सोडून देईल. समस्या सुटण्यासाठी पुढे तो प्रयत्नच करणार नाही. यातून नुकसान शेवटी माणसाचेच होईल.
थोडक्यात, तर्कबुद्धी आपले काम कधीही थांबवत नाही. तिचे काम अविरत चालत राहणारे आहे. यातूनच पुंजभौतिकीसारख्या नवनवीन विज्ञानशाखा निर्माण होतात.
यामुळेच ‘अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच असते’ या ठिकाणी संपतात,’ म्हणण्याऐवजी; ‘अनेक प्रश्नांची उत्तरे ‘हे असेच का असते?’ असा प्रतिप्रश्न विचारून मिळवता आलेली आहेत आणि येतात,’ असे म्हणायला हवे.
– सुशील चव्हाण, कुर्ला पूर्व (मुंबई)