‘वावदुकी वापसी’ या अग्रलेखात (३० ऑक्टो.) आपण पुरस्कारवापसीच्या षड्यंत्राचा खरपूस समाचार घेऊन मंत्र्यांच्या विदूषकी वक्तव्याला वेसण घालण्यात पंतप्रधान कमी पडत आहेत हेही निक्षून सांगितलेत ते बरे झाले. पुरस्कारवापसी ही एक बेजबाबदार आणि निष्क्रिय प्रतिक्रिया आहे. यातून असहिष्णुता कमी होत नसून उलट त्यात तेल ओतण्याचेच काम होत आहे. या मंडळींना हे वातावरण असेच तापत ठेवायचे आहे असे दिसते. शास्त्रज्ञ आणि इतिहासकार हे कोणत्याही निष्कर्षांला पोहोचण्यापूर्वी सबळ पुराव्याची मागणी करतात आणि मगच एखादा सिद्धान्त मांडतात किंवा इतिहास सांगतात. पण इथे मात्र थोडे काल्पनिक, थोडे अतिशयोक्तीपूर्ण असे पुरावे ग्राह्य़ मानून वातावरण फार दूषित झाले आहे, असे छातीठोकपणे सांगत आहेत ही त्यांच्या ज्ञानाशी आणि व्यासंगाशी त्यांनीच केलेली प्रतारणा ठरते (तेव्हा अशा भोंगळ इतिहासकारांनी आणि शास्त्रज्ञांनी पुरस्कार परत केले ते बरेच झाले.). एरवी अभिजन अल्पसंख्य असतात असा टेंभा मिरवणारी मंडळी १०० जणांनी पुरस्कार परत केले, १५० लोकांनी निषेध केला असे सांगतात तेव्हा या देशात सत्तेत आलेले सरकार हे बहुसंख्यांनी निवडून दिलेले सरकार आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. विरोधी राजकीय पक्षाला आपला अजेंडा राबवण्याचे मोकळे रान मिळू नये, अशी राजनीती आखण्यात हे सरकार कमी पडते आहे. घाऊक पुरस्कारवापसीचा हाही अर्थ निघतो.

– गार्गी बनहट्टी, दादर (मुंबई)
आंदोलनातूनच शिक्षण

‘वावदुकी वापसी’ हा अग्रलेख खूप एकांगी वाटला. एफटीआयआय ही संस्था केंद्रात भाजप सत्तेत आली तेव्हाच त्यांच्या हाती गेली. भाजपमध्ये अनुपम खेर आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यासारखी अनुभवी मंडळी असताना गजेंद्र सिंग सारख्या दुय्यम दर्जाच्या माणसाची या संस्थेवर वर्णी लागते ही बाब तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीला किंचितही स्पर्श करत नाही ?ही संस्था अप्रत्यक्षपणे सरकार म्हणजे लोकाश्रयावर चालते ना की कोणाच्या राजकीय भिकेवर! विद्यार्थीच्या गुणवत्तेवर आपण उठवलेला प्रश्न बिनबुडाचा आहे. कारण निवड परीक्षेच्या वेगवेगळ्या टप्प्यातून स्वतला सिद्ध करून त्यांना प्रवेश मिळाला आहे. राहिला प्रश्न तो आंदोलनाचे १४० दिवस व्यर्थ जाण्याचा. तर विद्यार्थीदशेतच कलेच्या वेगवेगळ्या माध्यमातून सरकापर्यंत आपला आवाज पोहोचवण्याचे तंत्र या दिवसांतच आत्मसात केले. आंदोलनालाच अभ्यासक्रम समजून या काळात चित्रपट, नाटके, कलाकृती, संगीत व अभिनयाद्वारे स्वत:मधील कलागुणही विकसित केले आहेत.

– अतुल पोठपोडे, नितीन सोनवणे
खेळता येईना,खेळपट्टी वाकडी..!

सध्या भारतीय क्रिकेट संघाची कृती ‘खेळता येईना..’ या धर्तीवर सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताला घरच्या मदानांवर पराभव स्वीकारावा लागला. त्यातील राजकोट व मुंबईतील खेळपट्टय़ा (जिथे भारताचा पराभव झाला) चच्रेत आल्या.
राजकोट येथील खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करताना खेळपट्टी नंतर संथ होत गेली. त्यामुळे विराटला व मला धावा काढता आल्या नाहीत, असे स्पष्टीकरण सामन्यानंतर धोनीने दिले. तर वानखेडेची खेळपट्टी खूपच पाटा होती. त्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाजांना कोणतीच मदत मिळत नव्हती. आफ्रिकेने धावांचा डोंगर उभारला व आपला पराभव झाला, असे स्पष्टीकरण दिले. तसेच अशी पाटा खेळपट्टी बनवल्यामुळे रवी शास्त्रीने सुधीर नाईक यांना अपशब्द वापरून नवीन वाद निर्माण केला. चेन्नईतील सामन्यात नाणेफेक जिंकावी म्हणून धोनीने (शकुन म्हणून) नाणेफेक उजव्या हाताने न उडवता डाव्या हाताने उडवली. या सर्व बाबींवरून असे लक्षात येते की, भारतीय संघ त्यांच्यातील खेळ-कौशल्याने सामने जिंकण्याऐवजी खेळपट्टी, नाणेफेक अशा गोष्टींवर जास्त अवलंबून आहे. या गोष्टींचा विचार पाहुण्या संघाने करणे एक वेळ समजू शकतो; परंतु स्वत:च्या घरात आयुष्यभर ज्या मदानांवर आपण खेळतो, तिथे अशा गोष्टींवर जास्त अवलंबून राहणे योग्य नाही.
त्यात अजून एक बाब सांगाविशी वाटते की, धर्मशाला येथे झालेल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात पंचांचा निर्णय चुकल्याने भारताचा पराभव झाला, असे सांगून भारतीय संघाने पंचांची तक्रार बीसीसीआयकडे केली आहे. कितीही मोठा पंच असला तरी कधी तरी चुका होणारच. पंच चुकतात म्हणून डीआरएसएस तंत्रज्ञान आणले गेले. त्यालाही सर्वाधिक विरोध भारतीय संघाचाच आहे. डीआरएसएस तंत्रज्ञान हे १००% अचूक नाही. त्यामुळे त्याला भारतीय संघाचा विरोध आहे. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय त्यातील दोष कसे समजणार?
– गणेश मारुती तांबे, उरुळी कांचन (पुणे )

सहृदयी लेखिका

प्रसिद्ध लेखिका, मराठी-कन्नड अनुवादिका मीना वांगीकर यांच्या निधनाने मराठी-कानडी सारस्वतातील एक अतिशय संवेदनशील सहृदयी आणि भाषाहितैषी स्नेही गमाविल्याचे शल्य निश्चितच मनात कायम जाणवत राहील. समरसता साहित्य परिषदेच्या सुरुवातीच्या काळातल्या बैठका या मीनाताईंच्या जंगली महाराज रोडवरील घरी होत असत. दरमहा त्या न कंटाळता बैठकीसाठी अल्पोपाहाराची व्यवस्था करीत. साहित्यविषयक तसेच साहित्य वर्तुळातील चर्चेबरोबरच कर्नाटकी पद्धतीची पुरणपोळी, इडली-सांबर, आप्पे असे नवनवीन खाद्यपदार्थ उपस्थितांना खाऊ घालण्यासाठी त्यांची कायम लगबग चालत असे. त्या नेहमी आपल्या मतावर ठाम असत. परंतु कोणत्याही परिस्थितीत बैठकीतल्या चर्चा/निर्णयावर अधिक्षेप, अतिक्रमण होणार नाही, याचीही त्या काळजी घेत. त्यांची मातृभाषा कन्नड असूनही त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या कादंबऱ्या वाचताना ‘यें हृदयीचे ते हृदयी’ अशा भाव-भावनांचा मनस्वी प्रत्यय येतो. यातून त्यांचे मराठीवरले प्रभुत्व आणि प्रेमच दिसते. पुण्यात झालेल्या पाचव्या समरसता साहित्य संमेलनात ‘स्त्री साहित्य आणि समरसता’ या विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण भाषणही अजून स्मरते. मराठी-कन्नड या भाषा भगिनींविषयी प्रचंड आस्था असलेल्या मीनाताईंना, कन्नड-मराठी भाषा संवर्धनाचे पुरस्कर्ते आणि पु. ल. देशपांडे यांच्या सर्व साहित्याचे कन्नड अनुवादक डॉ. अ. रा. तोरो यांच्याबद्दलही विशेष आपुलकी होती.
– सुनील भंडगे, पुणे</strong>

Story img Loader