‘वावदुकी वापसी’ या अग्रलेखात (३० ऑक्टो.) आपण पुरस्कारवापसीच्या षड्यंत्राचा खरपूस समाचार घेऊन मंत्र्यांच्या विदूषकी वक्तव्याला वेसण घालण्यात पंतप्रधान कमी पडत आहेत हेही निक्षून सांगितलेत ते बरे झाले. पुरस्कारवापसी ही एक बेजबाबदार आणि निष्क्रिय प्रतिक्रिया आहे. यातून असहिष्णुता कमी होत नसून उलट त्यात तेल ओतण्याचेच काम होत आहे. या मंडळींना हे वातावरण असेच तापत ठेवायचे आहे असे दिसते. शास्त्रज्ञ आणि इतिहासकार हे कोणत्याही निष्कर्षांला पोहोचण्यापूर्वी सबळ पुराव्याची मागणी करतात आणि मगच एखादा सिद्धान्त मांडतात किंवा इतिहास सांगतात. पण इथे मात्र थोडे काल्पनिक, थोडे अतिशयोक्तीपूर्ण असे पुरावे ग्राह्य़ मानून वातावरण फार दूषित झाले आहे, असे छातीठोकपणे सांगत आहेत ही त्यांच्या ज्ञानाशी आणि व्यासंगाशी त्यांनीच केलेली प्रतारणा ठरते (तेव्हा अशा भोंगळ इतिहासकारांनी आणि शास्त्रज्ञांनी पुरस्कार परत केले ते बरेच झाले.). एरवी अभिजन अल्पसंख्य असतात असा टेंभा मिरवणारी मंडळी १०० जणांनी पुरस्कार परत केले, १५० लोकांनी निषेध केला असे सांगतात तेव्हा या देशात सत्तेत आलेले सरकार हे बहुसंख्यांनी निवडून दिलेले सरकार आहे हे मात्र सोयीस्करपणे विसरतात. विरोधी राजकीय पक्षाला आपला अजेंडा राबवण्याचे मोकळे रान मिळू नये, अशी राजनीती आखण्यात हे सरकार कमी पडते आहे. घाऊक पुरस्कारवापसीचा हाही अर्थ निघतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा