टिपू सुलतानच्या अनुषंगाने िहदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलेले मुद्दे एकतर्फी असून ते त्यांच्या कोत्या मनोवृत्तीचे निदर्शक आहेत. शिवाजी, राणा प्रताप चालतात, मग अकबर, टिपू सुलतान का चालत नाहीत? अकबराची स्तुती स्वत: न्या. रानडेंनी केली आहे, तर ब्रिटिशांशी शेवटपर्यंत निकराने लढणाऱ्या भारतीय योद्धय़ांपकी एक टिपू सुलतान हा होता. अखेर १७९९ मध्ये तो श्रीरंगपट्टम येथील लढाईत मारला गेला, हा इतिहास आहे. त्यानंतर इंग्रज सनिकांनी मोठा उत्सव साजरा केला. टिपूवर धर्माधपणाचा आरोप केला जातो, पण त्याला सबळ पुरावा नाही.
टिपू मारला गेल्यावर त्याच्याकडील मौल्यवान वस्तू इंग्रज अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या. त्यात हिरे व सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या पेटय़ा होत्या. टिपूचे सोन्याचे सिंहासन फोडण्यात आले. त्या वेळी इंग्रजांनी जी लूट नेली, तिची किंमत १२ कोटी रुपये असावी, असा अंदाज आहे. या वस्तूंमध्ये टिपूची रत्नजडित तलवार, त्याची अंगठी आणि इतर युद्धसाहित्यही होते. टिपूच्या अंगठीचे वैशिष्टय़ म्हणजे या अंगठीवर ‘राम’ अशी अक्षरे कोरलेली आहेत. त्यावरून टिपूची निधर्मी वृत्ती दिसून येते.
विशेष म्हणजे ही अंगठी टिपूचीच असल्याची इतिहासतज्ज्ञांची खात्री असून त्याचा समर्थ प्रतिवाद आजपर्यंत तरी कोणी केलेला नाही. त्याच्या दरबारात मुस्लीम उलेमांप्रमाणे हिंदू पंडितही होते. शिवाजी महाराजांप्रमाणे टिपूलाही स्त्रियांविषयी अतिशय आदर होता. स्त्रियांची प्रतिष्ठा व शील यांचे जतन करण्यासाठी टिपू आवश्यक ते सर्व करायचा. मराठय़ांबरोबरच्या युद्धात दोन वेळा मराठा स्त्रिया त्याच्या हाती लागल्या; पण या दोन्ही प्रसंगी टिपूने त्यांना सन्मानाने वागवून त्यांची निराळ्या छावण्यांत व्यवस्था केली.
तरीही, मला स्वत:ला असे वाटते की, देशातील आजच्या कमालीच्या असहिष्णू व स्फोटक वातावरणात टिपूच्या जयंतीचा घाट घालून कर्नाटकाच्या सरकारने विकतचे श्राद्ध ओढावून घ्यायची आवश्यकता नव्हती. तेव्हा सध्या तरी टिपूला खुदा हाफिजम् करणेच योग्य.
संजय चिटणीस, मुंबई
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा