‘समाजवादाचे शानदार राजकारण!’ हा अन्वयार्थ (२३ नोव्हेंबर) वाचला. नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल पाहूनच मुलायमसिंह २०१७ च्या सुरुवातीला होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवणार हे साहजिकच आहे; परंतु केवळ आपल्या वाढदिवसाच्या ‘नेत्रदीपक’ कार्यक्रमात विविध मित्रपक्षांच्या नेत्यांचे गुणगान गाऊन अन् गोरगरीब रयतेसमोर संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करून बिहारमधील महाआघाडीप्रमाणे विजयाची स्वप्ने पाहणे मुलायमसिंहांच्या समाजवादाला महागात पडू शकते.
बिहारमधील महाआघाडीला विजय मिळवताना नितीशकुमार यांच्या विकासकार्याचे नतिक पाठबळ व विरोधी भाजपचे अनतिक वर्तन यांची मदत झाली. भाजपकडून बिहारची चूक पुन्हा होणे शक्य नाही आणि उत्तर प्रदेशसारख्या विस्तृत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरूनदेखील एखाद्या विकासकामाची पावती मिळवणे अखिलेश सरकारसाठी अशक्य कोटीतले काम आहे.
समाजवादाच्या विरुद्ध वागणुकीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणावे असेच मुलायमसिंहांच्या आजवरच्या समाजवादाचे वर्णन करता येईल. त्यामुळे समाजवादी तत्त्वांच्या पराभवावर स्वत:च्या वैयक्तिक ‘प्रगती’चा(!) मुलामा देऊन सामान्यांना गंडवण्याचा धंदा वेळीच बंद करावा हे बरे.
– किरण बाबासाहेब रणसिंग, नवी दिल्ली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा