पुलवामा ४० जवान शहीद.. उरी १८.. गडचिरोली १५.. मागील चार वर्षांत एकटय़ा महाराष्ट्रात १४ हजार शेतकरी आत्महत्या अशा बातम्या वाचल्या की अंगाचा थरकाप होतो. इकडे जवानांचे बळी व शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना काही लोकांचे यातही राजकारण चालू आहे. मग ते विरोधी पक्षांतील असोत की सत्ताधारी. यांना ४० आमदार संपर्कात असलेले कळतात, गोमांस घेऊन जाणाऱ्या गाडय़ा कळतात, ‘काँग्रेस मुझे जीने नहीं देगी’ वगैरे सारे कळते! फक्त २०० किलो आरडीएक्स आलेले कळत नाही, सन्याच्या तळावर हल्ला होणार आहे हे कळत नाही. धडक कृती दलाचे पोलीस नक्षली हल्ल्यात मारले जाणार आहे हेही कळत नाही.. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.

बहुतेक नक्षली हे स्थानिक तरुण-तरुणी असतात. त्यांना जंगल आणि आसपासच्या परिसराची खडान्खडा माहिती असते. ते पाठिंबाही स्थानिक आदिवासींकडूनच मिळवतात. जोपर्यंत आदिवासींची पिळवणूक थांबत नाही तोपर्यंत अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी आदिवासींचेच बळी जाणार आहेत. दोन्ही बाजूंनी मरणारा शेवटी आदिवासी असल्यामुळे सरकार कोणाचेही असो, त्यांना समस्येच्या मुळाशी जाऊन समस्या सोडवण्यात काहीही रस असल्याचे दिसत नाही. यावर मारून बदला घेणे उपाय नसून, त्यांच्याशी चर्चा करूनच आपणास हे प्रश्न सोडवावे लागतील.

– सहदेव ज्ञानेश्वर निवळकर, सेलू (जि. परभणी)

मुख्यमंत्र्यांनी कार्यपद्धती बदलण्याची गरज

एरवीही अनेक कारणांमुळे माणसांचे जीव जातात. त्यात पूर, पूल दुर्घटनाही असतात; पण नक्षलवादासारखे आव्हान राज्यापुढे असताना गेली चार वर्षे गृहमंत्री पद स्वत:कडे ठेवून आपले मुख्यमंत्री काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत? स्वतंत्र गृहमंत्री पद देऊन आणि वेगळी धोरणे आखून नक्षलवाद संपवून टाकण्यासाठी काही तरी उपाय केले असते तर ही वेळ आज आली नसती. मुळात गडचिरोलीसारख्या भागात ‘जिल्ह्य़ाच्या उत्तरेला जाळपोळ’ ही बातमी कोणी दिली, ती कितपत खरी आहे, हे माहीत नसताना पोलीस पथकाने बोलेरो गाडीतून जाणे हे सुरक्षिततेची उणीव उघड करणारे आहे. विनाकारण, घाई-गडबड करून आज १५ जवान मृत्यूच्या दारी गेले. राज्यात असे हल्ले होणे थांबले नाही तर लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडेल आणि सगळे खापर ‘गृहमंत्री पदाचा अतिरिक्त कार्यभार’ सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर फुटेल. त्यापेक्षा योग्य वेळी मुत्सद्दीपणा दाखवून मुख्यमंत्र्यांनी आपले कार्य वेगळ्या पद्धतीने करण्याची अत्यंत गरज आहे.

– महादेव सुधाकर भोसले, लातूर

प्रतिबंधासाठी पाळेमुळे उखडावी लागणारच

‘सतत सूडच?’ (३ मे) या संपादकीयाच्या अखेरच्या परिच्छेदांत ‘पुलवामा असो की गडचिरोली, आपण काय फक्त सूडच घ्यायचा की काय?’ असा प्रश्न उपस्थित करून ‘सूड घ्यायची वेळ येणे हेच मुळात सामर्थ्यशून्यतेचे द्योतक’ असे म्हटले आहे. वादासाठी जरी हे ठीक असले तरीसुद्धा अशी वेळ आल्यावर सूड घ्यायला टाळाटाळ करणे, विलंब लावणे, हेही सामर्थ्यहीनतेचेच लक्षण ठरते, हे विसरून चालणार नाही. तसेच ‘खरे सामर्थ्यवान प्रतिबंध करतात’ हे म्हणताना त्या प्रतिबंधासाठीसुद्धा आधी चळवळीची पाळेमुळे अत्यंत कठोरपणे समूळ उखडून टाकावी लागतील, हेही दुर्लक्षिता येणार नाही.

– श्रीकांत पटवर्धन, कांदिवली, मुंबई 

हाफिज सईद मोकळा, आता मसूदही?

‘एक वर्तुळ पूर्ण’ हे विशेष संपादकीय (३ मे) वाचले. दिल्लीतील संसद हल्ला, पुलवामा आणि यांसारख्या अनेक हल्ल्यांचा मोरक्या मसूद अझर यास संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यामुळे भारताच्या अनेक दिवसांच्या प्रयत्नांना अखेर यश आलेच. त्यासाठी भारत सरकार नक्कीच अभिनंदनास पात्र ठरते; पण यानंतर होणार काय? ज्या दहशतवाद्यास संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले असेल त्यास ज्या देशात तो वावरत असेल तेथील सरकारने पकडून तुरुंगात डांबावे लागते आणि त्याची एकूण संपूर्ण संपत्ती जप्त करावी लागते आणि हे करणे त्या देशास बंधनकारक असते. मसूद अझर हा पाकिस्तानात आश्रयाला आहे हे सर्वश्रुत आहेच. मग पाकिस्तानात शरण घेतलेल्या मसूदला पाक सरकार पकडणार काय? हा प्रश्न उद्भवावा यासाठी जागादेखील आहे. कारण हाफिज सईद यालादेखील संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलेले आहे आणि तो आताही पाकिस्तानात निर्भयपणे आणि स्वतंत्र वावरत आहे. त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई पाकिस्तानने केल्याचे वृत्त नाही. थोडक्यात, जर मसूद अझरला दहशतवादी घोषित केल्यानंतर पाक सरकारद्वारे काहीच कारवाई केली गेली नाही तर या घोषणेस काहीच तारतम्य उरणार नाही.

-सुजित रामदास बागाईतकार, मु. निमखेडा, साटक पारशिवनी, नागपूर.

मोटरमनवरील ताण समजून घ्यावा..

उपनगरी गाडीचे मोटरमन लोकेश इंदोरा यांचे हृदयविकाराने निधन होणे ही खरोखर दु:खद बातमी आहे. ‘बफर’ अपघात घडला, म्हणून त्यांना परत प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होते. दररोज मुंबईमध्ये लोकलगाडी चालवीत असताना मोटरमनला येणारा मानसिक ताण किती भयंकर आहे याची कल्पना आपण करू शकत नाही. रूळ ओलांडताना मध्ये आल्यामुळे दररोज मरणारे लोक, गाडय़ा उशिरा धावत असल्यास प्रवाशांचा उद्रेक हे सर्व सहन करीत आपले कर्तव्य करीत राहणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. आपले कर्तव्य पार पाडताना त्यांना मानसिकरीत्या कणखर होता यावे यासाठी प्रयत्न न करता, उलट त्यांच्यामागे कठोर नियमांचा ससेमिरा लावणे हे थांबवले पाहिजे.

-मनोहर शेवडे, मुंबई.