‘वाढता वाढे असहिष्णुता’ या लेखात (८ सप्टेंबर) धार्मिक असहिष्णुता कशी वाढत चालली आहे याचे अनेक दाखले पी. चिदंबरम यांनी दिलेले आहेत, परंतु दोन महत्त्वाच्या मुद्दय़ांना स्पर्श केलेला नाही. पहिला मुद्दा म्हणजे दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा चिदंबरम यांचा पक्ष आणि त्यांचेच सहकारी पक्ष राज्य करीत होते (केंद्रात आणि राज्यात). त्यामुळे ‘आपण कायद्याच्या कक्षेत येऊ शकत नाही, असा विश्वास धर्माध व्यक्तींमध्ये का निर्माण होतो,’ या प्रश्नाचे उत्तर चिदम्बरम यांच्याकडून अपेक्षित होते.. प्रश्न नव्हे. दुसरा जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असहिष्णुता फक्त धार्मिक राहिलेली नाही. एकतर्फी प्रेमाला नकार दिला म्हणून खून करणे, रहदारी किंवा पाìकगसारख्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीमधून बेदम मारहाण होणे, अशा अनेक गोष्टींमधून असहिष्णुतेचा प्रादुर्भाव किती सर्वदूर आणि खोलवर पसरलेला आहे ते दिसून येते. धार्मिक असहिष्णुता हे त्याचे केवळ एक अंग आहे हे विसरून चालणार नाही.
लोक इतके ‘शीघ्रकोपी’ (शॉर्ट टेम्पर्ड) झाले आहेत याचे कारण कायद्याचे राज्य साध्यासाध्या गोष्टींतसुद्धा दिसत नाही. त्यातून मग ‘जंगलच्या कायद्याची’ आदिम प्रेरणा उफाळून वर येत असावी. सहिष्णुतेला पोषक ठरणारे कायद्याचे स्पष्टपणे दिसून येणारे राज्य आपल्याकडे का नाही याची जाण अर्थ, गृह, अशी अनेक महत्त्वाची मंत्रिपदे भूषवणाऱ्या चिदंबरम यांना असणारच. ‘समोरच्या बाकावरून’ सर्वसामान्यांना पडणारेच प्रश्न न विचारता त्यांची उत्तरे पुढे यावीत अशी अपेक्षा आहे.
– प्रसाद दीक्षित, ठाणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा