‘काँग्रेस-डाव्यांची वैचारिक असहिष्णुता!’ ही बातमी (लोकसत्ता, २ नोव्हें.) वाचली. सध्या देशात काही ठिकाणी धार्मिक विद्वेषातून सुरू असलेल्या हिंसक घटना आणि त्याविरुद्ध समाजातील सर्व स्तरांतून उमटणारा निषेधाचा सूर यावर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात की, काँग्रेस-डावे विचारवंत, तसेच काही सामाजिक कार्यकत्रे यांना भाजप सत्तेत येणे सहन झालेले नाही. त्यामुळेच भाजप व पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात वैचारिक असहिष्णुता दाखवली जात आहे.
जेटली यांचे वरील विधान एक वेळ खरे मानता येईल. कारण काँग्रेस-डाव्यांनाही या घटनांचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वैचारिक असहिष्णुता दाखवली जाणे शक्य आहे. आता काँग्रेस व डाव्यांची भूमिका भाजपला ढोंगी वाटणे साहजिक आहे. परंतु मूडीज, रघुराम राजन, इन्फोसिसचे नारायणमूर्ती हे लोक काही काँग्रेस अथवा डाव्यांचे पाठीराखे नाहीत किंवा त्यांना काही राजकारण करायचे आहे, असेही दिसत नाही. या तिघांच्या बोलण्याचे सार एकच आहे, ते म्हणजे सध्या भारतात जे काही चालले आहे ते देशाच्या प्रगतीला खीळ घालणारे आहे आणि सरकारने ही परिस्थिती बदलण्यासाठी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. तेव्हा मोदी, जेटली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वरील लोकांच्या मतांचा तरी ‘गांभीर्याने’ विचार करावा.
जेटली पुढे म्हणतात की, काही ठिकाणी विद्यापीठे, शैक्षणिक संस्था व सांस्कृतिक संस्थांवर काँग्रेस व डाव्यांचे वर्चस्व असून, तिथे दुसऱ्यांचे मतही ही मंडळी विचारात घेत नाहीत. काँग्रेस वा डाव्यांनी अनेक संस्थांचे राजकीयीकरण केले ही गोष्ट सत्यच आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत भाजप नेहमी ‘आम्ही काँग्रेस-डाव्यांपेक्षा कसे वेगळे आहोत’ हे ठसवण्यासाठी प्रयत्न करीत होता. असे असेल तर काँग्रेस-डाव्यांनी ज्या चुका केल्या त्या भाजप का करीत आहे? काँग्रेस-डाव्यांनी जसे अनेक संस्थांमध्ये आपल्या विचाराचे लोक घुसवले तोच प्रकार भाजप सध्या प्रत्येक संस्थेच्या ‘संघीकरणा’द्वारे करीत आहे. काँग्रेस-डाव्यांना नाकारून जनतेने भाजपला बहुमत दिले असताना स्वत: वेगळी (पण सकारात्मक) वाट चोखाळायची सोडून भाजप काँग्रेस-डाव्यांच्याच मार्गाने जात आहे. मग काँग्रेस-डावे आणि भाजप यांच्यात फरक तो काय?
जेटली असाही आरोप करतात की, काँग्रेस/ डावे आणि समाजातील काही विचारवंत हे भारत हा असहिष्णू समाज असल्याचा गरप्रचार करीत आहेत. जेटलींचा हा दावाही हास्यास्पद आहे. कारण असहिष्णू असल्याचा आरोप भाजप, संघ परिवार आणि धार्मिक उन्माद करणाऱ्यांवर केला जातो आहे, संपूर्ण भारतीय समाजावर नाही. परंतु भाजपवर टीका म्हणजे देशावर आणि सर्व समाजावर टीका अशा प्रकारचा आभास भाजप व त्यांचे नेते करू पाहत आहेत. निवडणुकीत जरी जनतेने भाजपला जनादेश दिला असला तरी भाजप म्हणजे सर्व समाज नव्हे.
त्यामुळे असहिष्णुतेचा आरोप होत आहे तो भाजप, संघ परिवार आणि त्यांच्या वाचाळवीरांवर याची जाणीव भाजपने ठेवावी. परंतु येनकेनप्रकारेण समाजाची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो आहे. काँग्रेस-डाव्यांवर भाजपने टीका करावीच परंतु आपले वेगळेपण विकासाच्या मार्गाने दाखवून द्यावे, अशीच समस्त भारतीयांची इच्छा आहे.
– प्रकाश लालासाहेब पोळ, कराड (सातारा)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा