‘बंडोबा की थंडोबा?’ या केवळ संपादकीय (२४ जून) शीर्षकातूनच शिवसेनेचे बंडखोर हे स्वत: थंड होणार नसून शिवसेनेस थंड करणार आहेत हा वास्तव अर्थ प्रतिध्वनित झाला आहे हे नक्की! बंडखोरांना हस्ते- परहस्ते पुरेपूर रसद पुरवून आपले ईप्सित साध्य करू पाहणाऱ्या भाजपचे तर, ‘गरज सरो, वैद्य मरो’ आणि ‘वापरा व फेकून द्या’ ही अलीकडील ब्रीदवाक्येच झाली आहेत जणू! चर्चादी मार्ग सोडून, ‘एक घाव, दोन तुकडे’ करू पाहणारे शिंदे आणि मंडळी यांची चाल सध्या यशस्वी ठरेलही, परंतु मुळात शिवसेना ही भावनेवर चालणारी पक्षसंघटना असल्याने सध्याच्या या क्लेशकारक व धक्कादायक घटनेने सर्वसामान्य नागरिकांची सहानुभूती मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच वळणार हे सांगावयास कुणा ज्योतिषाची गरज नाही. या कामी बाळासाहेबांची पुण्याई आणि त्यांजवरील विपुल प्रेम उपयोगी ठरणार आहे. बंडखोरांची तात्पुरती उपयुक्तता व उपद्रवक्षमता लोप पावल्यावर चाणाक्ष भाजप त्यांना बेदखल करणार हे काय सांगावयास हवे? क्षणिक स्वार्थापोटी आपण मराठीच लोक आपल्याच मुळावर उठलोय याचा परप्रांतीयांना झालेला अपूर्व आनंद दिसूच नये, हेही आणखी एक दुर्दैवच नव्हे काय? मराठी जनांस मिळालेला दुहीचा शाप अजून किती काळ पिच्छा पुरवणार कोण जाणे!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा