भारतीय सिनेसृष्टीतल्या काही मोजक्याच लोकांना इरफान खानमधील खरे कलागुण हेरता आले, हा मुद्दा (अग्रलेख, ३० एप्रिल) अग्रलेख, ३० एप्रिल) पटला तेव्हाच आणखी एक विरोधाभास आठवला : आपल्याकडील सिनेमांत इरफान कधी गरीब, तर कधी स्वार्थी दुनियेला कंटाळलेल्या मध्यमवर्गीय व्यक्तिरेखांतून समोर आला. याउलट हॉलीवूडसारख्या अवाढव्य आवाका असलेल्या सिनेसृष्टीने म्हणा किंवा आणखी विदेशी चित्रपटसृष्टीने नेहमी एक बडा उद्योजक अथवा एखादा मोठा वैज्ञानिक-तत्त्वज्ञ अशा पात्रासाठी त्याची निवड केली. अर्थात त्याने त्या भूमिका चपखल वठवल्यादेखील. भारतात मात्र त्याला कनिष्ठ अथवा मध्यम मध्यमवर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारा म्हणूनच कायम आपल्यापुढे आणले गेले. विदेशी चित्रपटांत तो यशस्वी भारतीयाच्या भूमिकेत वावरला!
– कल्पेश नयना गोविंद पवार, भिवंडी (ठाणे)
‘रानावि’चा उल्लेख हवा..
‘जसा होता तसा..’ हा अग्रलेख वाचला. हिंदी फिल्म हिरोसारखं आकर्षक रंगरूप नसतानाही केवळ अभिनयाच्या जोरावर इरफान खान यांनी समकालीन अभिनेत्यांच्या रांगेत जवळपास पहिला क्रमांक पटकावला होता हे कुणीही मान्य करील. केवळ हिंदीच नाही तर हॉलीवूड आणि इंग्लिश चित्रपटसृष्टीतही त्यांनी मानाचं स्थान मिळवलं होतं. मला वाटतं त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये (राष्ट्रीय नाटय़ विद्यालय- ‘रानावि’) जे पायाभूत शिक्षण घेतलं त्यामुळेच हे शक्य झालं असावं. त्याचा अग्रलेखात उल्लेख असायला हवा होता.
– मृदुला प्रभुराम जोशी, मुंबई</strong>
सहजपणात प्रवीण.. !
‘जसा होता तसा..’ हा अग्रलेख (३० एप्रिल) वाचला. इरफान खूप वेगळा होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अभिनेता असूनही आपल्यातलाच एक वाटायचा. जो अभिनय वाटत नाही तोच खरा सकस अभिनय असतो, असे म्हणतात. अगदी १९६०-७० च्या दशकांपासून जमाना गाजवणारे अनेक तारेतारका आहेत. त्या काळी त्यांचा ‘अभिनय’ आवडलाही होता; परंतु आज इरफानच्या अभिनयाकडे पाहिले की स्वत:च्याच त्या काळच्या आवडीचे खूप आश्चर्य वाटते खरे. कदाचित तो त्या एकूणच स्वप्नाळू आणि भाबडय़ा काळाचा महिमा असावा.
अशा अनेक तारेतारकांची नक्कल (मिमिक्री) अनेक निष्णात नकलाकार हुबेहूब करून दाखवतात. विशिष्ट पद्धतीने उभे राहिले किंवा एखादा हेल जरी काढला तरी प्रेक्षक ती नक्कल कोणाची, हे सहज ओळखतात. त्यांना इरफानची नक्कल करा म्हटले तर ते काय करतील असा प्रश्न पडतो; कारण त्याच्या अभिनयात इरफान कुठे नसायचाच- असायचे फक्त ते ते पात्र.
बा. भ. बोरकरांच्या एका प्रसिद्ध कवितेत (झीनी झीनी वाजे बीन) ‘सहजपणात प्रवीण’ अशी सुंदर शब्दरचना आहे.
अनेक वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण भूमिका साकारूनही कुठलाही अभिनिवेश नसलेल्या इरफानच्या संदर्भात ती आठवते. कसदार अभिनयाची ती सहजसुंदर ‘बीन’ आता परत कधीच झंकारणार नाही, (आणि याच कवितेतील, ‘अनुदिन चीज नवीन’सुद्धा आता नाही) हे त्याच्या लाखो चाहत्यांकरता फार दु:खदायक आहे.
– विनिता दीक्षित, ठाणे</strong>
हीच का महाराष्ट्राला ‘हीरकमहोत्सवी भेट’?
‘आकाशवाणीच्या प्रादेशिक कार्यक्रमांची गळचेपी’ हे वृत्त (लोकसत्ता, २९ एप्रिल) वाचले. १ एप्रिल २०२० पासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरील मराठी कार्यक्रमांच्या वेळेत कपात करण्यात आली असून मराठी कार्यक्रम फक्त दुपारी ११ ते ४ या वेळेतच प्रक्षेपित करण्यात येतात. सकाळी ७.१० ते ७.३० या वेळेत पुणे येथून प्रक्षेपित होणारे बातमीपत्र सहक्षेपित केले जाते. या व्यतिरिक्त सर्व वेळेत विविध भारतीचे कार्यक्रम प्रक्षेपित होत असतात. असाच बदल ‘दूरदर्शन’च्या ‘मराठी डी.डी.’ या रेडिओ वाहिनीवर करण्यात आलेला आहे. गुजराती डी.डी. वाहिनीवर असा बदल केलेला नाही. इतर भाषिक वाहिन्यांबाबत माहिती नाही. मुंबई केंद्रावरील मराठी कार्यक्रमांच्या वेळेतील कपात ही महाराष्ट्राच्या ६० व्या वर्धापन दिनाची (हीरकमहोत्सवाची) भेट समजावी का?
— अरविंद गुप्ते, मुलुंड पूर्व (मुंबई)
शालेय विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य सरकारने एवढे करावेच!
‘अभ्यासक्रमाला कात्री? पुढील शैक्षणिक वर्षांसाठी शिक्षण विभागाचा विचार’ या वृत्ताने (लोकसत्ता, २९ एप्रिल) शालेय विद्यार्थिजगतापुढे आणखी एक प्रकारची अनिश्चितता आणि विविध बाल मानसशास्त्रीय आव्हाने उभी केली आहेत. त्याकडे वेळीच लक्ष वेधून प्रत्येक शाळेत विद्यार्थी समुपदेशन सेवा उपलब्ध करून देणे नितांत गरजेचे आहे. करोना प्रादुर्भाव आणि टाळेबंदीचा संभाव्य वाढीव कालावधी लक्षात घेता दहावी, बारावीच्या वर्गात प्रविष्ट झालेल्या आणि अन्य इयत्तांमधील विद्यार्थ्यांच्या मनोराज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून प्रदीर्घ काळ चालणारे असंख्य मानसिक, भावनिक ताण आणणारे संघर्ष उभे राहणार आहेत. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना नेमका कोणता अभ्यासक्रम वगळला जाईल, केवळ ऑनलाइन शिक्षणाने ‘दुधाची तहान ताकावर कशी भागवायची’, उच्च शिक्षणासाठी पुढील प्रवेश परीक्षा आणि प्रवेश प्रक्रियेला कसे सामोरे जायचे, तसेच धोकादायक वातावरणात स्वत:चे आरोग्य सांभाळून मर्यादित कालावधीत अनेक अभ्यासविषयक समस्या कशा हाताळायच्या, याबाबत धास्ती, भविष्याची चिंता, चिडचिड आणि असुरक्षितता अशी समस्यागर्भ अवस्था पाहावयास मिळत आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मानसिक आरोग्यमान जोपासणारी शास्त्रशुद्ध समुपदेशन यंत्रणा उभी करणे नितांत गरजेचे आहे.
या शैक्षणिक समस्येची दुसरी बाजू अत्यंत विदारक आहे. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीतील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना प्रशिक्षित शिक्षक समुपदेशक सेवा पुरविणारी ‘व्यवसाय मार्गदर्शन आणि निवड संस्था, मुंबई’ ही प्रशिक्षण संस्था मागील शिक्षणमंत्र्यांच्या चुकीच्या धोरणाची बळी ठरली. ही शासनाची संस्था तेथील अभ्यासक्रम नूतनीकरणाच्या सबबी दाखवून बंद पाडण्यात आली. राज्यभरातून आलेल्या निवडक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना अक्षरश: वर्षभर निराधार राहण्याची वेळ आणली गेली. त्यांची वसतिगृह सुविधा अचानक काढून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, भावनिक आणि वर्तनविषयक समस्यांची शास्त्रशुद्ध उकल करण्यासाठी समुपदेशनाचे दर्जेदार प्रशिक्षण देणारी ती संस्था कटकारस्थाने करून नामशेष करण्यात आली. त्या क्षणापासून विद्यार्थ्यांच्या हक्काची समुपदेशन सेवाही मोडकळीस आली.
संबंधित संस्थेचे काम पुण्यातील एका खासगी संस्थेकडे वळते करण्यात आले. ‘विद्या प्राधिकरण, पुणे’ या सरकारी आस्थापनाची त्याला पुष्टी जोडण्यात आली. २०१६ पासून ‘कलचाचणी’ प्रकल्पांतर्गत अभूतपूर्व प्रचारकी राजकारण करीत राज्यात मागील सरकारचे ‘मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांच्या छबीदार प्रतिमा’ असलेले कल अहवाल शालान्त परीक्षेला बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला गेली चार वर्षे सलग वितरित केले जाऊ लागले. त्या मोबाइल अॅपद्वारे घेतल्या जाणाऱ्या सदोष कलचाचणी, त्याचे अहवाल आणि विश्लेषण करण्याचे काम ‘अविरत ऑनलाइन प्रशिक्षण’ घेत असलेल्या (!) अर्धवट प्रशिक्षित शिक्षकांकडे सोपविले गेले. २०१६ पासून सलग चार वर्षे राज्य शिक्षण मंडळाच्या सुमारे १७ लाख शालान्त परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही कलचाचणी आणि तिचे अहवाल वितरित केले जातात. त्याआधारे केले जाणारे प्रवेश प्रक्रियाकेंद्री मार्गदर्शन अत्यंत संदिग्ध निर्णय देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली जातात. यातून समस्यानिरसन कमी, गोंधळ अधिक अशी परिस्थिती उद्भवते. कलचाचणीच्या निष्कर्षांनुसार किती विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमाला प्रविष्ट झाले याचे कोणतेही स्पष्टीकरण सरकारकडे उपलब्ध नाही. आहेत ते फक्त लाखांच्या घरात विद्यार्थ्यांना कसे कलचाचणीने मार्गदर्शन उपलब्ध करून दिले याचे फुगवलेले आकडे.
शासनाच्या शिक्षक समुपदेशक प्रशिक्षण संस्थेने गेल्या ५५ वर्षांहून अधिक काळ अव्याहतपणे विद्यार्थी आणि पालकांना मोफत समुपदेशन सेवा पुरविली. तिला संपवण्याचे जसे शासकीय प्रयत्न केले गेले, तसेच तिच्या पुनरुज्जीवनासाठीदेखील अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यात तत्कालीन सरकारचे खासगीकरणाचे प्रेम बाधक ठरले.
तरीदेखील, या शासकीय संस्थेची आगामी शालेय पिढय़ांना सतत गरज भासणार आहे हे त्रिकालाबाधित सत्य आहे. वास्तविक केंद्र आणि राज्याचा शिक्षणावरील आर्थिक ताळेबंद पाहता या शिक्षक समुपदेशक प्रशिक्षण संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लागणारा खर्च हा अत्यंत क्षुल्लक ठरणारा आहे. मात्र त्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती विद्यमान शिक्षणमंत्री आणि शासनकर्ते दाखवतील का, हा यक्षप्रश्न आहे.
– जयवंत कुलकर्णी, नेरुळ (नवी मुंबई)
सुनक यांना समजले!
कोरोनापश्चात भारताची अर्थव्यवस्था , हा जनतेच्या आणि पर्यायाने शासनाच्या लेखीही चिंतेचा विषय. त्यातही आपल्याकडल्या शहरी अर्थव्यवस्थेला जास्त प्रमाणात फटका बसला आहे. कारण अर्थव्यस्थेच्या विकासाचा प्रमुख आधार सेवा क्षेत्र! शिवाय गेल्या दोन दशकांपासून (काँग्रेस व भाजप दोहोंच्या कार्यकाळात) गंभीर होत गेलेली बेरोजगारीची समस्या. ग्रामीण, शहरी आणि खुल्या वर्ग बरोबरच आरक्षित वर्गातील तरुणांच्याही नोकरी, व्यवसाय संधी गिळंकृत करणाऱ्या विकासाचे बळी ठरलेली ‘जॉबलेस ग्रोथ’! या पार्श्वभूमीवरइंग्लंडचे तरुण अर्थमंत्री ऋषी सुनक यांचे विचार आणि ‘लघु उद्योजक हे ब्रिटनच्या अर्थ व्यवस्थेचा पाया आहेत ’हे मत तसेच त्यांनी जाहीर केलेली मदत (कोविडोस्कोप- २९ एप्रिल) भारतातील काही जेष्ठ अर्थतज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केलेल्या ‘‘शाश्वत विकासासाठी, औद्योगिक, अभियांत्रिकी क्षेत्राला सेवा क्षेत्र पर्याय होऊ शकत नाही’’ या मताला पुष्टी देणारेठरते . एक मोठा कारखाना आला की परिसराचे रूप पालटते. आसपासच्या जनतेला रोजगार उपलब्ध होतात. कारखान्यावर अवलंबून लहान उद्योग विकसित होतात. सोन्याची कोंबडी वाटणाऱ्या सेवा क्षेत्राबरोबराच औद्योगिक आणि अभियांत्रिकी क्षेत्रालाही सन्मानाने विकासाचे सहकारी होण्याचे भाग्य लाभो! जाता जाता इंग्लंडच्या अर्थ धोरणात महत्त्वाचा वाटा असलेले ऋषी सुनक ‘ शेजारी पडलेल्या फुलांपैकीच’ एक नाहीत का ?
– अनिल ओढेकर, नाशिक
१९१८ च्या साथीने तरी कुठे काय बदलले?
‘..पुढे काय?’ हा श्रुती तांबे यांचा लेख (‘चतु:सूत्र’, ३० एप्रिल) वाचला. सद्य:कालीनतेचा भ्रम हा अनेक फसव्या संकल्पनांना जन्म देत असतो. डिजिटल, इलेक्ट्रॉनिक व समाजमाध्यमांच्या गदारोळामुळे या भ्रमात भर पडत असते आणि सद्य:काळातील संकटाचे स्वरूप आहे त्यापेक्षा किती तरी अधिक पटीने वाढवून सांगितले जाते. १९१८ साली आलेल्या ‘स्पॅनिश फ्लू’ या साथीचे स्वरूप अतिभयानक असे म्हणता येईल. तत्कालीन भारतात त्या साथीने एक कोटीपेक्षा अधिक- म्हणजेच तत्कालीन लोकसंख्येच्या पाच टक्के इतक्या प्रचंड प्रमाणात बळी गेले. जगभरात या बळींची संख्या पाच कोटी होती असे सांगितले जाते आणि ही साथ जानेवारी १९१८ ते डिसेंबर १९२० अशी तब्बल तीन वर्षे पृथ्वीवर ठाण मांडून होती. तरीही या साथीने जगात किंवा भारतात कुठल्या नव्या प्रारूपास जन्म दिला? रशियन क्रांती तर ही साथ यायच्या अगोदरच होऊन गेलेली होती. भारतात गांधीयुग सुरू झाले व स्वत: गांधीजींनाही या रोगाचा फटका बसलाच होता. तरीही गांधीजींचे स्वातंत्र्य आंदोलन या साथीमुळे पुकारले गेले असे म्हणता येईल का? यानंतरच्या १०० वर्षांत या साथीच्या स्मृती पार पुसल्या गेल्या होत्या व करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला नसता तर त्या आता जागृतही झाल्या नसत्या.
करोना संकट म्हणजे जगबुडी नव्हे हे निश्चित. त्यातील बळींची संख्या १९१८ च्या साथीच्या तुलनेत कमी लक्षणीय आहे. तिचे नक्की स्वरूप अद्यापपर्यंत पूर्णत: उलगडले नसले, तरीही ती एखाद्या नवीन प्रारूपाला जन्म देईल असे निश्चितपणे सांगता येत नाही. या साथीचा वेगाने प्रसार झाला याचे कारण युरोपीय देश व अमेरिका यांनी सुरुवातीला याची गांभीर्याने दखल घेतली नाही हे आहे.
भविष्यात चीनचा प्रभाव वाढू शकतो याचे मुख्य कारण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी आपणहून जागतिक नेतृत्वाची धुरा सोडून दिली हे आहे. ट्रम्प हे एक बांधकाम उद्योगपती आहेत व राजकारणाचा त्यांना फारसा अनुभव नाही. विक्षिप्त स्वभावामुळे त्यांनी या साथीच्या विरुद्ध उपाययोजना करताना अकार्यक्षमतेचे प्रदर्शन केले व त्यामुळे अमेरिकेत या साथीची तीव्रता मोठय़ा प्रमाणात वाढली. भविष्यातील अमेरिकी अध्यक्ष याची दुरुस्ती करून अमेरिकेचा प्रभाव परत वाढवू शकतात. करोनामुळे अमेरिका संपली असे मानण्यात काही अर्थ नाही, तसेच चीनचे नेतृत्व सर्वमान्य होईल असेही मानण्याचे काही कारण नाही.
करोना संकटाचा काहीच परिणाम पडणार नाही असे म्हणता येत नसले, तरी ‘स्मॉल इज ब्यूटिफुल’वर आधारित अर्थव्यवस्था व जीवनपद्धती हे केवळ स्वप्नरंजन झाले. पुढील एक वर्षांच्या आत या रोगावर उपाय वैज्ञानिकांनी शोधून काढला तर ही साथही १९१८ च्या साथीप्रमाणेच विस्मृतीच्या पडद्याआड जाऊ शकते. आणि इ.स. २१२० सालच्या इतिहासात या साथीची नोंद कशी होईल, हे आज तरी निश्चितपणे सांगता येणे अवघड आहे!
– प्रमोद पाटील, नाशिक
पर्यायी उपचार पद्धतींबाबत सजगपणेच निर्णय घ्या..
‘अॅपल’ आणि ‘मॅकिंटॉश’ या बलाढय़ संगणक-कंपन्यांचे प्रवर्तक, महाधनवान अमेरिकन स्टीव्ह जॉब्ज यांना वयाच्या ४७व्या वर्षी कर्करोग असल्याचे निदान अगदी प्राथमिक अवस्थेत करण्यात आले होते; पण अमेरिकेतील तज्ज्ञ डॉक्टर्स व उत्तम रुग्णालये यांचा सल्ला न मानता जॉब्स यांनी पर्यायी उपचार पद्धती सुरू केल्या. यात शुद्ध शाकाहार, अॅक्युपंक्चर, उपवास, विरेचन चिकित्सा, झाडपाल्याची औषधे, वनस्पतींचे रस, असे उपचार होते. एका मांत्रिकाचाही सल्ला घेण्यात आला. असे नऊ महिने गेले, पण उपयोग शून्य. अखेर आधुनिक उपचार चालू केले, यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. पुढे सात वर्षांनी, वयाच्या ५७व्या वर्षी जॉब्स यांचे निधन झाले..
.. हे आज आठवण्याचे कारण भारतात करोनाच्या साथीबरोबरच अनेक घरगुती आणि अवैज्ञानिक उपचार सुचवणाऱ्यांची लाट आली आहे. यात गरम पाणी, मिठाच्या गुळण्या, हळद, कापूर, नाकात मोहरीचे तेल असे नानाविध उपाय ‘व्हॉट्सअॅप विद्यापीठा’द्वारे प्रसारित केले जात आहेत.
जरा विचार करा, जगभर शेकडो संशोधक, हजारो केंद्रांत, लाखो डॉलर खर्च करून, वैज्ञानिक पद्धती वापरून नवी औषधे शोधून काढतात, त्याच्या कडक कसोटय़ा पार केल्यावर ती वापरली जातात. अशी औषधे वा उपचार घ्यावेत की कोणी बुवा/बाबा, वैद्यबुवा, किंवा जुनी पोथी सांगते म्हणून तुळशीपत्र, अग्निहोत्र, गोमूत्र स्वीकारावे? तुम्हीच ठरवा.
तीच गोष्ट प्रतिकारशक्तीची. सकाळी व्हिटामिन सी ची गोळी घेतली की संध्याकाळी प्रतिकारशक्ती वाढली असे होत नाही. त्यासाठी काही महिने लागतात आणि संतुलित प्रथिनयुक्त आहार, जीवनसत्त्वे, व्यायाम, योग्य वजन, विश्रांती, व्यसन नसणे, चिंता नसणे, सकारात्मक आनंदी दृष्टिकोन, मधुमेह वा रक्तदाब नसणे वा नियंत्रित असणे, या सर्वाची जरुरी असते.
– डॉ. शरद अभ्यंकर, वाई
अमेरिका-इटली नव्हे, इराणच्या मार्गाने..
आज भारतात करोनाबाधितांची संख्या जवळपास ३०,००० झाली आहे. आजवर ८०० पेक्षा जास्त लोक या रोगाला बळी पडले आहेत. हे आकडे काळजी वाटावी असे आहेत, यात शंका नाही. पण तरीही अमेरिकेच्या आणि अनेक युरोपीय देशांच्या मानाने अद्याप तरी बरेच कमी आहेत. अमेरिकेत करोनाबाधितांची संख्या १० लाखांच्या घरात पोहोचली आहे आणि ५०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. इटली, स्पेन, ब्रिटन यांसारख्या देशांत करोनाने असेच थैमान घातले आहे. त्याचा विचार करता आपल्या देशाची स्थिती इतकी वाईट नाही, असे म्हणावे लागेल. पण भविष्यकाळात काय होईल? आपली परिस्थिती सध्या आहे तशीच राहील की ती झपाटय़ाने बिघडून आपण त्यांच्या रांगेत जाऊन बसू, या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करून पाहू..
पाच हजार करोनाबाधित रुग्णांचा आकडा भारताने ८ एप्रिल रोजी गाठला. तो १४ एप्रिलला दुप्पट म्हणजे १०,८०० झाला आणि २२ एप्रिलला २०,७०० झाला. म्हणजे तो दुपटीने व चौपटीने वाढायला आणखी सहा आणि आठ दिवस लागले. रुग्णांची संख्या सुरुवातीला दररोज १३ टक्क्यांनी वाढत होती. पुढच्या आठवडय़ात हा दर काहीसा कमी म्हणजे आठ टक्के झाला. २२ एप्रिलनंतर गेल्या चार-पाच दिवसांत तो आणखी कमी होऊन आता सहा टक्क्यांवर आला आहे. त्या मानाने युरोप-अमेरिकेत सुरुवातीला, म्हणजे पाच हजारचे १० हजार आणि १० हजारचे २० हजार होताना, करोनाने बाधित होण्याचा वेग फारच जास्त होता. आपल्या तिप्पट.
इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनने पाच हजारचा आकडा आपल्या आधी महिनाभर गाठला. मार्चच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ात. तो दुप्पट आणि चौपट व्हायला या देशांना फक्त तीन ते चार दिवस लागले. म्हणजे आपल्याला जिथे दोन आठवडे लागले, तिथे इटली आणि स्पेनला फक्त काही दिवस लागले. अमेरिकेत तर करोनाबाधितांची संख्या दोन दिवसांत दुप्पट आणि चार दिवसांत चौपट झाली. या चार दिवसांत बाधितांची संख्या वाढायचा वेग अमेरिकेत दररोज ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. पुढील काही दिवसांतही तो काहीसा असाच राहिला. साहजिकच महिन्याभरात या सर्व देशांनी कित्येक लाखांचे आकडे गाठले.
आपण सावधगिरी बाळगली आणि सध्याचा वेग वाढू दिला नाही, तर आपले भविष्य अमेरिका किंवा युरोपीय देशांइतके काळेकुट्ट असणार नाही. मात्र त्यासाठी काही गोष्टी कराव्याच लागतील. एक तर टाळेबंदी एकदम न काढता हळूहळू, टप्प्याटप्प्याने शिथिल करावी लागेल. मुख्य म्हणजे, पुढेही अत्यंत कठोर शिस्त पाळावी लागेल. मंडई, दुकाने, धार्मिक स्थळे या ठिकाणी गर्दी करणे टाळायला हवे. २२ मार्चला जनता संचारबंदी संपल्यावर जसा जल्लोष केला, मिरवणुका काढल्या, तसा वेडेपणा अजिबात करता कामा नये.
याबाबतीत इराणमध्ये काय झाले, यावर एक नजर टाकू या. पाच हजारचा आकडा गाठल्यावर तो दुपटीने वाढायला इराणला पाच, तर चौपटीने वाढायला नऊ दिवस लागले. म्हणजे बरोबर अगदी भारतासारखी स्थिती. फक्त भारताच्या आधी साधारणपणे एक महिना. म्हणजे एक महिन्यानंतर भारताची काय स्थिती असेल, याचा अंदाज आजची इराणची स्थिती बघून करता येईल. आज इराणची करोनाबाधितांची संख्या आहे सुमारे ९० हजार. पण वाढीचा दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. रोज सुमारे हजार लोक बाधित होत असले, तरी तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त बरे होत आहेत. म्हणून ‘अॅक्टिव्ह’ रुग्णांची संख्या वाढत नाहीये, उलट कमी होतेय. नव्या रुग्णांची संख्या वाढली, तरी ज्यांच्यापासून संपर्क होतो अशा लोकांची संख्या मात्र कमी होतेय. भारतात महिन्याभराने ही स्थिती येऊ शकेल.
जर आपण काळजी घेतली तर! जर आपण सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन केले तर आणि तरच! ते केले तर अमेरिका-इटलीची वाट टाळून आपल्याला इराणने दाखवलेल्या दिशेने वाटचाल करता येऊ शकेल.
– सुबोध जावडेकर, पुणे