‘अधिवेशन नावाचा सोपस्कार’ हे संपादकीय (१३ मे) वाचले. चर्चा आणि वादसंवाद ही बाब लोकशाहीमध्ये अनुस्यूतच आहे; परंतु गेल्या दशकभरापासून संसदेत चर्चा आणि वाद-संवादाची जागा कुरघोडीच्या राजकारणाने घेतली आहे. सरकार आणि विरोधक दोघेही यास जबाबदार आहेत. गोंधळ घालणे, आरडाओरड करणे, फलक झळकावणे, जागा सोडून अध्यक्षांसमोर येऊन घोषणाबाजी करणे यामुळे अधिवेशनाचे गांभीर्य हरवत चालले आहे. जीएसटीसारख्या महत्त्वाच्या विधेयकावर साधकबाधक चर्चा होऊ शकते. ३३ टक्के नागरिक दुष्काळाच्या झळा सोसताहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, स्थलांतर, गृहनिर्माण असे किती तरी विषय आहेत, ज्यावर धोरणकर्त्यांनी बोलले पाहिजे. या परिस्थितीत दोन दिवस अगोदरच अधिवेशन गुंडाळणे, ही गोष्ट अयोग्य आहे. न्यायालय कायदेमंडळावर वर्चस्व गाजवू पाहत आहे, अशी आरडाओरड करणाऱ्यांनी स्वत:चे आत्मपरीक्षण करावे. कायदेमंडळ जबाबदारीने, गांभीर्याने स्वत:च्या भूमिका निभावत असेल तर न्यायालय हस्तक्षेप कशासाठी करेल? सर्वोच्च संसदेचे महत्त्व संसदेचे सदस्य स्वत: कमी करीत आहेत.
– भास्करराव म्हस्के, पुणे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा