दहशतवादामुळे भारत, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड अशा अनेक देशांना दहशतवादी कारवायांचा त्रास भोगावा लागला. दहशतवादी अड्डय़ांचे केंद्रस्थान पाकिस्तान असून त्याची झळ पाकिस्तानला सोसावी लागल्याचे पंतप्रधान इम्रान खान कबूल करतात. ते म्हणतात, ‘‘दहशतवादामुळे पाकिस्तानचे १०० अब्ज डॉलरचे नुकसान झाले. ७० हजार लोक मारले गेले.’’ हे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करणे त्यांना धर्माध शक्तींमुळे अशक्य होते. भारतीय हवाई दलाच्या १२ विमानांनी बालाकोट, चाकोटी, मुझफ्फराबाद ठिकाणचे दहशतवादी अड्डे नष्ट केल्यामुळे त्यांच्यावरील दहशतवादाचे संकट मोठय़ा प्रमाणात नष्ट झाले. म्हणून पाकिस्तानने भारतीय लष्कराचे आभार मानून अभिनंदन करावे. तसे न करता पाक सरकार मसूद अझर व अनेक दहशतवाद्यांना आयएसआयद्वारे संरक्षण पुरविते. पण हे दहशतवादी विंचू ते भारताविरुद्ध कारवायांसाठीची महाशक्ती म्हणून नेहमी वापरते, हे दुर्दैवी आहे.

– मिच्छद्र पिराजी भोरे, बेलापूर (नवी मुंबई)

 

संयमातूनच यश मिळते

‘संयमाचे स्वागत’ हा अग्रलेख (२७ फेब्रु.) वाचला. खरोखर भारताने कठीण व अत्यंत भावनात्मक स्थितीला संयमाने हाताळत शांत मनाने १४ फेब्रुवारीचे दु:ख पचवीत १२ दिवस काढले. नंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला ही खरी कूटनीती होय. ‘अति घाई – संकटात नेई’ हे खरेच आहे. जर आपण लगेच हल्ला केला असता तर हेतू साध्य झाला नसता. भारताच्या हवाई दलाचे तर कौतुक करायलाच हवे. शेवटी हा संयमाचा विजय आहे. आता पाक गप्प बसणार नाही याचे भान सैन्यदल व सरकारला ठेवावे लागेल. आपण गाफील राहता कामा नये.

– धोंडिरामसिंह राजपूत, वैजापूर (औरंगाबाद)

 

संयम हाच भारताचा इतिहास

‘संयमाचे स्वागत’ हा अग्रलेख वाचला. जैश ए मोहम्मद किंवा लष्कर ए तय्यबाच्या दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हवाई हल्ल्याचा अभिमान वाटतो. या कारवाईने भारत काय करू शकतो हे लक्षात आले. १९७१ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी अमेरिकेच्या दबावाला न जुमानता पाकचे दोन तुकडे केले होते. त्या वेळी भारत अवघा २४ वर्षांचा कालावधी पार करत होता आणि आता मात्र शस्त्रसज्ज भारत ७२ वर्षांचा आहे. तरीही तो अशी कारवाई पुन्हा करू शकतो हे प्रधानमंत्री मोदी यांनी दाखवून दिले आहे.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर

 

हवाई हल्ल्याचे राजकारण करू नये!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील महत्त्वाच्या मुद्दय़ांवरून मतदारांचे लक्ष विचलित करण्यासाठी राममंदिराचा आणि पाकिस्तानबरोबर युद्धाचा वापर केला जाईल, अशी अटकळ राजकीय जाणकारांनी बांधलीच होती ती आता खरी ठरत आहे! सर्वत्र फक्त आणि फक्त युद्धजन्य भाषा केली जात आहे! त्यामुळे निवडणुकीचे मुद्दे देशप्रेमाच्या लाटेत बुडून जात आहेत.

राममंदिराचा विंचू भाजपने शिवसेनेच्या वहाणेने मारून पाहिला, परंतु मंदिर कार्ड यशस्वी होणार नाही याची जाणीव झाल्यावर पाकिस्तान कार्डचा वापर भाजप सरकार जाणीवपूर्वक मतदारांना भुलवण्यासाठी करत आहे हे भारतीय लोकशाहीला साजेसं नव्हे!

सध्या नवराष्ट्रवाद्यांबरोबर सामान्य माणूसही पाकिस्तानला कसं चिरडून टाकावं याची चर्चा करत आहे! असंच वातावरण निर्माण होत राहिलं, तर गोमातेच्या रक्षणार्थ जशा प्रकारे रस्त्यावर निकाल लागले, तसेच निकाल मुस्लीमविरोधी भावना भडकून, काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करून लागू शकतात!

ज्यांच्याकडे गमावण्यासारखं काही नाही त्यांच्यासोबत लढाई करून आपली अर्थव्यवस्था धोक्यात आणणे आपल्याला परवडणारे नाही! त्यामुळे तरुणांनी देशभक्त जरूर व्हावे, परंतु देशप्रेमाच्या नावाखाली निवडणुकीचा प्रचारक होऊ नये ही अपेक्षा!

-नीलेश शिंदे पाटील, शिंदेवाडी, अणे, जुन्नर (पुणे)

 

प्रचारसभांमध्येही असाच संयम दिसावा

‘संयमाचे स्वागत’ हा अग्रलेख वाचला. ‘सुडाचा आक्रोश देशभर घुमत असताना त्यास बळी न पडता दाखवलेल्या संयमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन.’ या अग्रलेखातील सलामीच्या वाक्याशी पूर्णपणे सहमत. आता असाच संयम पंतप्रधान मोदी निवडणूक प्रचारसभांमध्ये दाखवतील इतकीच अपेक्षा. या हवाई हल्ल्याबद्दल भारतीय हवाई दल व लष्कराचेही अभिनंदन.

– संजय जगताप, ठाणे</strong>

 

सावरकरांना वाहिलेली श्रद्धांजलीच

‘संयमाचे स्वागत’ हा अग्रलेख वाचला. मंगळवारचा दिवस महन्मंगल म्हणून साजरा करण्याची सुसंधी १३० कोटी भारतीयांना दिली म्हणून भारतीय वायू दलाचे व नरेंद्र मोदींच्या संयमाचे अभिनंदन. हा दिवस म्हणजे स्वा.वीर सावरकरांची पुण्यतिथी. या दिवसाचे औचित्य साधून पाकिस्तानवरील हल्ला म्हणजे खऱ्या अर्थाने सावरकरांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे. ज्या दिवशी पाक आतंकवाद्यांनी पुलवामामध्ये अमानुष हल्ला केला, त्याच दिवशी मोदींनी देशाला हुतात्म्यांच्या बलिदानाचा बदला घेण्याचे वचन दिले होते. तो शब्द त्यांनी सन्याच्या मदतीने पूर्णपणे पाळला असे म्हणता येईल.

– श्रीनिवास जोशी, डोंबिवली (पूर्व)

 

पाकची दुटप्पी भूमिका

भारताने केलेल्या हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘योग्य वेळी पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल’ असे वक्तव्य (२७ फेब्रु.) केल्याचे वाचले. भारताने केलेला हल्ला हा पाकव्याप्त काश्मीरमधील ‘जैश-ए-महम्मद’च्या दहशतवादीवादी केंद्रांवर होता. ही लष्करी कारवाई नव्हतीच. मग पाकिस्तान प्रत्युत्तराची भाषा कोणत्या आधारावर करते? यावरून असे दिसून येते की, एकीकडे दहशतवादाला आम्ही विरोध करतो असा ऊर बडवत फिरायचे आणि दुसरीकडे भारताने अशी दहशतवाद्यांच्या विरोधात कारवाई केली की पाकिस्तानने कायमच त्यांच्या मागे उभे राहायचे, यावरून पाकची भूमिका किती दुटप्पी आहे हे स्पष्ट दिसते. भारतीय हवाई दलाने केलेली कारवाई अभिमानास्पद आहे.

– आकाश सानप, नाशिक

 

आता दाऊदविरोधात कारवाई करावी

भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा जसा बदला घेतला, तसाच १९९३ च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडलेल्या ३५७ निरपराध लोकांच्या मृत्यूचा बदला आता घ्यायला हवा. आज २६ वर्षांनंतरही त्या बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद पाकिस्तानात आरामात जगत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने दाऊदच्या विरोधात सर्व पुरावे सादर करूनही पाकिस्तानने दाऊदला अद्याप भारताच्या स्वाधीन केलेले नाही. दाऊदला भारताच्या ताब्यात द्या म्हणून विनवण्या करण्यापेक्षा मंगळवारसारखी एखादी कारवाई आता अपेक्षित आहे.

– मधुकर हरी बसनकर, करी रोड (मुंबई)

 

धार्मिक पुनरुत्थानाचं कार्य हाती घ्यावं

पुलवामा हत्याकांडानंतर इस्लाम धर्माने विचार करावा अशी एक उणीव या ठिकाणी जाणवली. दहशतवाद हा दहशतवादच असतो. कमी किंवा जास्त या संख्यात्मक परिमाणात त्याचं मोजमाप करणं शक्यच नाही तर अयोग्यसुद्धा आहे. आंधळ्या धर्माच्या नावाखालीच धर्माध टोळ्या तालिबान, अल कायदा किंवा जैश ए मोहम्मद अशा नावाखाली दहशतवादाचा क्रूर आणि अमानवी असा प्रसार व प्रचारच करत नाहीत तर क्रौर्याची सीमा ओलांडून ते सर्वसामान्य माणसाला आयुष्यातूनच उठवतात. ज्या तरुणांच्या हाती पुस्तकं व लेखणी द्यायची, त्यांच्या हातात ते बंदूक व बॉम्ब देत आहेत. तरुणांच्या धार्मिक भावनांचा आपल्या स्वार्थी हेतूंसाठी जाणीवपूर्वक ते वापर करून घेत आहेत. प्रश्न हा आहे की मुस्लीम तरुण हातात शस्त्र उचलून जिहादची भाषा का बोलू पाहतोय? आपलं सुख कथित अशा जन्नतमध्येच तो का शोधतो आहे? इस्लाम धर्मात इतर धर्माच्या तुलनेत धर्मपुनरुत्थान किंवा धर्मसुधारणा या तुरळकच झालेल्या आहेत.

सर सय्यद अहमद खान आणि मौलाना अबुल कलाम आझाद यांनीच थोडी काय ती धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. स्वतंत्र भारतात तेचं कार्य हमीद दलवाई हे करू पाहात होते. तर त्यांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं. धर्मसुधारणा हा या ठिकाणी कळीचा मुद्दा आहे. मध्ययुगीन काळात अखंड भारतावर आपलं साम्राज्य होतं, पण आज ते नाही हे विसरायलाच मुस्लीम समाज पुरेसा तयार नाही. परिणामी, धर्माध लोक त्याचंच धार्मिक भांडवल करून दहशतवाद पसरवण्यात यशस्वी होत आहेत. इस्लाममधील बुद्धिवादी आणि विचारवंतांनी एकत्र येऊन हे धार्मिक पुनरुत्थानाचं पवित्र कार्य हाती घ्यावं. प्रत्येक वेळी तलवारीचे उत्तर तलवारीनेच देणं योग्य नाही. ढाल असलेली केव्हाही बरी. धार्मिक पुनरुत्थान ही ती ढाल आहे.

– राहुल प्रल्हाद काळे, शहापूर (बुलडाणा)

Story img Loader